खासदार सौदेबाजीप्रकरणी काल दिल्ली पोलिसांनी समाजवादी पक्षाचे एकेकाळचे नेते अमरसिंग यांची चौकशी केली. यावेळी श्री. सिंग यांनी आपण सन २००८ मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावाच्या आधी कॉंग्रेस सदस्यांच्या संपर्कात होतो, अशी कबुली दिली आहे. मात्र, आपले हे संबंध केवळ राजकीय पातळीवर होते, असे त्यांनी सांगितले.
अमरसिंग यांची पोलिसांनी जवळजवळ तीन तास सखोल चौकशी केली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांना यावेळी विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांनीही साह्य केले. खासदार सौदेबाजी प्रकरणात सुहैल हिंदुस्थानी आणि संजीव सक्सेना यांना यापूर्वीच चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी सक्सेना हे आपले कर्मचारी नव्हते, असे सिंग यांनी पोलिसांना सांगितले.
अमरसिंग यांना पुढील आठवड्यात पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. भाजपा खासदार अशोक अर्गल यांना मात्र सोमवारी चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. भाजपाचे नेते सुधींद्र कुलकर्णी यांनाही चौकशीच्या घेर्यात आणले जाण्याची शक्यता आहे.
मनमोहनसिंग यांना विश्वासदर्शक ठराव जिंकता यावा यासाठी कॉंग्रेसच्या वतीने अमरसिंग यांनी सौदेबाजी केली असा आरोप आहे. त्यांनी भाजपाच्या तीन खासदारांना लाच पाठवली असा आरोप तिघा खासदारांनी संसदेत नोटा सादर करून केला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी गेली तीन वर्षे संथगतीने तपासकाम केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भात खरडपट्टी काढल्याने पुन्हा तपासकामाला वेग आला आहे. या प्रकरणात अटक झालेला सुहैल हिंदुस्थानी आणि संजीव सक्सेना यांनी अमरसिंग यांनीच आपल्याला भाजपा खासदारांस लांच देण्यास सांगितले होते असा आरोप केलेला आहे. कॉंग्रेसचे एक ज्येष्ठ नेते अमरसिंग यांच्या संपर्कात होते असेही हिंदुस्थानी याने सांगितले आहे.



