मयेतील स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या शासकीय पातळीवरील त्रुटी आहेत त्याबाबत गांभीर्याने विचार करून लवकरच विशेष बैठक बोलावली जाणार असल्याची घोषणा काल मये मतदारसंघातील कॉंग्रेसच्या जनजागृती मेळाव्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केली.
माहिती हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार त्वरित पाउले उचलून सरकारच्या नावावर असलेली जमीन शेतकर्यांच्या नावावर करून मयेवासियांना समस्यामुक्त करणार असे ते पुढे बोलताना म्हणाले.
मेळाव्यात सभापती प्रतापसिंह राणे यांनी कस्टोडीयनचा प्रश्न सोडवणे शक्य असल्याचे सांगितले. ओकुपंट्स कॉलममध्ये चुकून सरकारचे नाव लागल्याने घोळ झालेला आहे. कायदेशीर सल्लामसलत करून मत्रिमंडळाने याबाबत वटहुकूम काढून शेतकर्यांना त्यांच्या हक्काची जमीन देऊन हा प्रश्न त्वरित निकालात काढण्याची मागणी प्रतापसिंह राणे यांनी केली. त्यास असुसरून मुख्यमंत्री कामत यांनी हा प्रश्न गंभीरपणे घेऊन सोडवला जाईल, असे आश्वासन दिले.
हिराबाई झांट्ये सभागृहात आयोजित जनजागृती अभियान मेळाव्यात केंद्रीय कॉंग्रेसचे जगमितसिंग ब्रार, श्री. रेड्डी, सभापती प्रतापसिंह राणे, विश्वजीत राणे, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, युवा नेते प्रवीण झांट्ये, रायू सावंत, जिल्हा पंचायत सदस्य फोंडू सावंत, जयदेव परब गांवकर, सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी मये मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी कॉंग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले. माध्यम भाषाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी इंग्रजीचे समर्थन करताना कोणताही अन्याय केलेला नाही. भाजपाची टिका निरर्थक असल्याचे सांगितले.
जगमितसिंग ब्रार
यांची टीका
भाषा माध्यमप्रश्नी शशिकला काकोडकर यांच्यावर टीका करताना कॉंग्रेसने केंद्रीय जगमितसिंग यांनी सांगितले, प्रांतीय भाषाचे सर्वप्रकारे संरक्षण करण्यास आपला पक्ष देशपातळीवर पूर्णपणे काळजी घेत आहे.
विश्वजीत राणेंनी विकासकामांची माहिती देऊन पुन्हा कॉंग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.
या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली होती. युवा नेते प्रवीण हरीष झांट्ये यांच्या कार्याचे व संघटनात्मक कामाचे यावेळी मुख्यमंत्री, सभापती तसेच केंद्रीय निरिक्षकांनी कौतुक केले. प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी कॉंग्रेसच्या कार्याचा आढावा घेतला व भाषा प्रश्नी काळे बावटे दाखवणार्यांबद्दल नाराजी व्यक्त करताना आम्ही सर्व भाषांचा पर्याय खुला ठेवलेला असून भाजपाने अकारण राजकारण करण्याचा प्रयत्न केला असून अयोग्य असल्याचे सांगितले. प्रवीण झांट्ये यानी स्वागतपर भाषणात मये मतदारसंघातील जनतेने दिलेल्या भरीव सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. रायू सावंत यांनी आभार मानले.



