डिचोलीतील अपघातात एक ठारवाठादेव -सर्वण येथील झांट्ये महाविद्यालयाजवळ एका मालवाहू ट्रॉलीने मोटरसायकल धडक दिल्याने झालेल्या अपघातात श्याम जयदेव मातोंडकर (38) हे वाठादेव येथील तरुण ठार झाले. सर्वत्र तुलसी विवाहाची गडबड चालू असताना काळाने घाला घातल्याने वाठादेव गावात शोककळा पसरली आहे. काल दुपारी पावणेतीनच्या सुमारास एचएच डी 8335 या क्रमांकांच्या ट्रॉलीने जीए 04 ए 6353 या क्रमांकाची मोटरसायकल घेऊन सर्वण येथे कामाला जाणाऱ्या श्याम मातोंडकर यांना जबर धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते ठार झाले. डिचोली आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले. या अपघातानंतर ट्रॉली घटनास्थळी न थांबता सरळ डिचोलीकडे भरवेगाने गेली. मात्र चालकाला डिचोलीत अटक करण्यात आली. चालक सुरेशकुमार लक्ष्मीनारायण हा हरयानाचा आहे. श्री. मातोंडकर सकाळी झांट्ये महाविद्यालयात व सायंकाळी सर्वण येथील सोसायटीत काम करायचे. काल दुपारी ते वाठादेव येथून सर्वण येथे जात असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. श्याम मातोंडकर यांना लहान मुले असून त्यांच्या कुटुंबातील आधारस्तंभ गेल्याने फार मोठी आपत्ती कोसळली आहे. पोलीस उपनिरीक्षक रितेश तारी व गणेश राऊत यांनी पंचनामा करून मृतदेह बांबोळी येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. |