ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांचे निधन

वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर "ज्ञानपीठ' या सर्वोच्च साहित्य सन्मानाने सन्मानित झालेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक विंदा करंदीकर यांचे काल सकाळी मुंबईत भाभा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. कविता, बालकविता, साहित्यसमीक्षा, अनुवाद, तत्त्वचिंतन अशा विविध साहित्यप्रांतांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या विंदांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्र्वात शोककळा पसरली आहे. पुण्यात होणार असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन विंदांच्या हस्ते होणार होते.
गोविंद विनायक करंदीकर तथा विंदा करंदीकर यांच्या विविधांगी लेखनाने मराठी साहित्याचे एक दालन समृद्ध झाले आहे. त्यांच्या "अष्टदर्शने' साठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने 2003 साली सन्मानित करण्यात आले होते. जनस्थान पुरस्कार, कबीर सन्मान, कोणार्क सन्मान, केशवसूत पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आणि कित्येक विद्यापीठांच्या मानद डी. लिट. पदव्यांनी गौरवले गेलेल्या विंदांचे विपुल वाङ्‌मय साहित्यक्षेत्रात दीर्घकाळ आपला ठसा उमटवून राहिले आहे. विंदांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालवण या गावी झाला. विंदांचे वडिल विनायक करंदीकर हे देवगडजवळच्या पोंभुर्ल्याचे. विंदांचे शिक्षण कोल्हापूर येथे झाले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतल्याने विंदांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. महाविद्यालयीन अध्यापन करीत असतानाच विंदांची साहित्य प्रतिभा चहुअंगांनी बहरली. मराठी नवकवितेचा घाट घेऊन त्यांची कविता मराठी साहित्यशारदेच्या दरबारात प्रकटली तेव्हा तिचे रसिकांनी स्वागतच केले. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या तिघांचे एकत्रित काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम गावोगावी होत असत. "स्वेदगंगा' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1949 साली आला. त्यानंतर "मृद्‌गंध', "धृपद', "जातक', "विरूपिका', "अष्टदर्शने' हे त्यांचे काव्यसंग्रह रसिकांनी उचलून धरले. "संहिता', "आदिमाया' या संकलित काव्यसंग्रहांच्या संपादनासाठीही त्यांनी सहयोग दिला होता. बालसाहित्यामध्येही विंदांनी मोठी भर घातली आहे. "राणीची बाग', "एकदा काय झाले', "एटू लोकांचा देश', "सशाचे कान', "परी ग परी', "अजबखाना', "सर्कसवाला', "पिशी मावशी आणि तिची भुतावळ', "अडम तडम', "टॉप' असे त्यांचे बालसाहित्य प्रसिद्ध आहे. "स्पर्शाची पालवी', "आकाशाचा अर्थ', "करंदीकरांचे समग्र लघुनिबंध' असे त्यांच्या लघुनिबंधांचे संग्रहही निघाले आहेत. समीक्षेच्या क्षेत्रातही विंदांचे मोठे योगदान आहे. "परंपरा आणि नवता' या त्यांच्या 1967 साली प्रकाशित झालेल्या समीक्षा ग्रंथाने मान्यता मिळवलेली आहे. "ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र', "फाऊस्ट', "राजा लिअर' असे त्यांचे अनुवादही प्रसिद्ध आहेत. काही इंग्रजी समीक्षाग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. करंदीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वांद्रे येथील साहित्य सहवासमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांनी देहदानाची इच्छा मृत्यूपूर्वी व्यक्त केली असल्याने पार्थिव वैद्यकीय संशोधनासाठी दान केले जाणार आहे.

साहित्यिक, समीक्षकांची प्रतिक्रिया

मराठी कवितेचा एक कालखंड अस्तंगत

ज्ञानपीठ विजेते कवी विंदा करंदीकर हे बा. सी. मर्ढेकरांनंतरचे एक अत्यंत प्रतिभाशाली असे कवी होते. त्यांच्या जाण्याने मराठी कवितेचा एक कालखंड समाप्त झाला आहे. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि करंदीकर या तिघांनी मराठी कविता घरोघरी नेली होती, अशा शब्दांत गोव्यातील विविध साहित्यिक व समीक्षकांनी विंदांना आदरांजली वाहिली.मर्ढेकरांनंतर काव्यलेखन करणाऱ्या विंदांच्या जाण्याने मराठी कवितेचे एक युग संपले असे ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रल्हाद वडेर म्हणाले. विंदा हे एक प्रयोगशील कवी होते. रसिकांशी संवाद न तोडता त्यांनी आपली कविता लिहिली व मौल्यवान कवितांची देणगी मराठी साहित्याला दिली, असे उद्‌गार समीक्षक प्रा. रवींद्र घवी यांनी काढले. विंदांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून मराठी कवितेचे सामर्थ्य सर्वांना दाखवून दिले. विंदांच्या चौफेर साहित्यनिर्मितीमुळे मराठी भाषा श्रीमंत झाली, अशी प्रतिक्रिया कवी व ज्येष्ठ साहित्यिक गोपाळराव मयेकर यांनी व्यक्त केली. मर्ढेकरांनी दाखवलेल्या नव्या जाणिवेच्या मार्गाने त्यांनी वाटचाल केली, स्वेदगंगा मध्ये या नवतेचे प्रतिबिंब उमटलेले आहे, असे श्री. मयेकर म्हणाले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अमानवी विकृतीपर्यंत अनेक विषयांना त्यांनी आपल्या काव्यातून स्पर्श केला, असे मयेकर पुढे म्हणाले. विंदांचे कार्य मर्ढेकरांएवढेच मोठे होते. विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही एकाच तत्त्वज्ञानाने स्वतःला बांधून घेतले नाही. त्यांच्याएवढा प्रयोगशील कवी संतकाव्यामध्ये एकनाथ हेच होते. त्यांना ज्ञानपीठ मिळाल्यामुळे सगळ्या मराठीचा गौरव झाला होताच, पण मी तर असे म्हणेन की हा ज्ञानपीठ या पारितोषिकाचाही गौरव होता, असे ज्येष्ठ समीक्षक प्रा. केशव सद्रे यांनी सांगितले. विंदा करंदीकर हे कधीही कालबाह्य ठरले नाहीत. जुन्या - नव्या कवितेचा सांधा त्यांच्यामुळे जुळला असे कवी अवधूत कुडतरकर म्हणाले.

प्रा. सोमनाथ कोमरपंत

कवीवर्य विंदा करंदीकरांच्या निधनाने मराठी कवितेचा एक तेजोमय पर्व अस्तास गेलेले आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांनी आपल्या ङ्गकाव्य दर्शनानेङ्ख मराठी कवितेला लोकाभिमुख केले. विंदांचे व्यक्तिमत्व बहूपेडी होते. कवितेत त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांनी तालचित्रे लिहिली, अभंग लिहिले, गझल लिहिली. अष्टदर्शनीमध्ये भारतीय विचारधारा आणि पाश्चिमात्य विचारधारा या दोहोंचे सुमधूर नवनीत अनुभवायाला मिळते. मराठी ललित निबंधाला त्यांनी नवी शैली प्राप्त करून दिली. त्यांचे अनुवादही अनोख्या स्वरुपाचे. मराठी समीक्षेलाही त्यांनी नवी दृष्टी दिली. अध्यापन शैलीवरही त्यांनी ठसा उमटविला. पाच दशके मराठी साहित्याचे क्षितीज संपन्न करणारा मानंद आमच्यातून निघून गेला आहे, असे प्रा. सोमनाथ कोमरपंत यांनी श्रध्दांजली वाहताना म्हटले आहे.
 
 
This is a test