झेनने ठोकरल्याने महिला मांडवीच्या पात्रात पडली

मरीन पोलिसानी वाचविले : अन्य चार जखमी

जुन्या मांडवी पुलावर काल सकाळी अकराच्या सुमारास एका मारुती झेन कारने दोन दुचाकींना ठोकरले असता एका दुचाकीवर मागे बसलेली महिला उसळून पुलावरून नदीच्या पात्रात पडली तर तीन वर्षांच्या मुलासह चौघेजण आश्चर्यकारकरीत्या बचावले. दैव बलवत्तर म्हणूनच महिला वाचली. पाण्यात पडलेल्या बेलींदा सांगेनकर (25) या करंझाळे येथील महिलेला सांतामोनिका जेटीजवळ मरीन पोलिसानी पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. तिचा सैल हा मुलगा रस्त्यावर फेकला गेल्याने खरचटला पण सुखरूप राहिला. तिला लगेच गोमेकॉत दाखल करण्यात आले. तिचा हात फॅक्चर झाला आहे. मुलगा मोटरसायकल चालविणारा तिचा पती प्रवीण यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. तसेच या अपघातात सापडलेल्या स्कुटीवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले. त्यानाही प्रथमोपचारानंतर घरी पाठविण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, हवालदार श्रीपाद गावस घटनास्थळी दाखल झाले. तसेच 108 रुग्णवाहिका व अग्निशामक दलाला त्वरित पाचारण करण्यात आले. झेनने चुकीच्या दिशेने येऊन त्यांना ठोकरले. झेनचा ड्रायव्हर शिवानंद रतनलाल (सांगोल्डा) याला पोलिसांनी अटक करून नंतर जामिनावर सुटका केली.
 
 
This is a test