महापालिकेतील घोटाळे उजेडात आणणार : डिक्रुझ

पणजी महापालिकेने गेल्या चार वर्षांच्या काळात प्रचंड गैरव्यवहार घोटाळे केले असून ते उजेडात आणणार असल्याची माहिती विरोधी गटाचे नेते मिनीन डिक्रुझ यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पुढील महिन्यात महापालिका क्षेत्रातील प्रत्येक घरात जाऊन या गैरव्यवहाराची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाजारातील दुकाने वितरणात प्रचंड घोटाळा असून हासन नामक एका व्यक्तीकडे 20 ते 25 दुकाने असल्याची माहिती त्यांनी दिली. कचरा विल्हेवाट प्रकरणीही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून महापालिकेचे टॅंकर हॉटेलवाल्यांना पाणी पुरवित असल्याचा आरोपही डिक्रूझ यांनी केला. कॅसिनोना परवाने देणे, पे पार्कींग या सर्वच विषयात घोटाळे आहेत. गेली तीन वर्षे महापौर म्हणून टॉनी रॉड्रिगिस तर गेल्या वर्षभरात कॅरोलिना पो महापौर म्हणून काम करीत आहेत. परंतु या काळात कोणतेही विकास प्रकल्प राबविलेले नाहीत. पालिका दुकानाचे कामही अर्धवट राहण्यास सत्ताधारी गटच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेला घरपट्टीही वसूल करणे शक्य झालेले नाही. येत्या दि. 20 रोजी महापौरपदाची निवडणुक होणार असून ती गुप्तमतदानाव्दारे झाल्यास आपण निवडणूक लढविणार असल्याचे डिक्रुझ यांनी एका प्रश्नावर सांगितले. महापालिकेतील कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमांव यांनी दिले होते. परंतु सहा महिने उलटले तरी त्याची कार्यवाही झाली नाही. या प्रश्नावर आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस सुरेश चोपडेकर, वैदेही नायक, रुपेश हळर्णकर, ज्योती मसुरकर, संदीप कुंडईकर, दिक्षा माईणकर व वर्षा हळर्णकर उपस्थित होत्या.
 
 
This is a test