किर्लपाल येथे पुतण्याचा दंडुक्याने प्रहार करून खून

आरोपीला अटक

किर्लपाल दाभाळ येथे काल सकाळी महादेव यादव गावकर (55) याने त्याचा पुतण्या विठोबा सुकडो गावकर (33) याच्या डोक्यावर दंडुक्याने प्रहार केल्यामुळे विठोबा जागीच ठार झाला. संशयित आरोपी महादेव याला कुडचडे पोलिसानी त्वरित अटक केली. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार विठोबा व त्याचा चुलता महादेव हे दोघेही किर्लपाल येथे गेली अनेक वर्षे एकाच घरात पण वेगवेगळे राहत होते. अलीकडच्या काळात विठोबा हा नशापान करून येत असे व चुलता तसेच त्याची पत्नी व मुलीला शिवीगाळ करीत असे. कुडचडे पोलीस स्थानकात त्याच्याविरुध्द तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. गेल्या शुक्रवारी रात्री विठोबाने दारुच्या नशेत महादेवच्या घरात येऊन मारहाण तसेच घरातील सामानाची मोडतोड केली होती. पोलिसात तक्रार दिली असता त्याला अटक करून नंतर समज देऊन सोडण्यात आले होते. काल सकाळी विठोबा दारुच्या नशेत घरी आला व दगड उचलून चुलत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असता प्रतिकार करताना महादेव याने दंडुक्याने त्याच्यावर प्रहार केला. मयताची पत्नी त्याला सोडून गेली होती असे पोलिसानी सांगितले. मृतदेह मडगाव हास्पिसियोमध्ये पाठवण्यात आला. पुढील तपास केपेचे उपअधिक्षक रोहिदास पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास देसाई करीत आहेत.
 
 
This is a test