नानोडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

फासात अडकून दुसऱ्या बिबट्याचा मृत्यू

नानोडा-डिचोली येथे काल सकाळी बिबट्याने हल्ला केल्याने पांडुरंग देवू तुळसकर हा 50 वर्षाचा इसम जखमी झाला तर याच ठिकाणी सकाळी 10च्या दरम्यान बिबटा (मादी) मृतावस्थेत आढळल्याने डिचोली परिसरात खळबळ माजली आहे. पिस्तेवाडा-नानोडा येथील पांडुरंग तुळसकर यांच्या घराच्या पाठीमागे अवघ्या दहा मिटर अंतरावर सदर दोन्हीही घटना घडल्या आहेत. तुळसकर हे काल सकाळी 7 वाजता प्रात: विधीसाठी घराच्या पाठीमागे जात होते. येथे मागुनच कालव्याचा पाट असून याच ठिकाणी बिबट्याने तुळसकर यांच्यावर हल्ला चढविला. प्रसंगावधान राखून तुळसकर यांनी बिबट्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने त्यांच्या उजव्या हाताला चावा घेवून जखमी केले. तसेच डाव्या हातावरही पंजा मारून ओरबडले आणि बिबट्या जवळच्या रानात पसार झाला. लागलीच घरच्या मंडळीनी तुळसकर यास डिचोली प्राथमिक आरोग्यक्रेंद्रात दाखल केले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना म्हापसा येथील आझिलो इस्पितळात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

फासात अडकून बिबटा मृत

दरम्यान वरील घटना घडून सुमारे तीन तासांनी तुळसकर यांच्या पाठीमागे जिथे बिबट्याने तुळसकर यांच्यावर हल्ला केला तिथेच काही अंतरावर बिबटा मृतावस्थेत आढळला. सदर बिबटा (मादी) फासात अडकली होती आणि तिच्या कंबरेकडील भागात फासाची तार आत पर्यंत घुसली होती. सदर घटनेची माहिती डिचोली पोलिसांनी वनखात्याला कळविल्यानंतर वनखात्याचे विभागीय अधिकारी एस्‌. आर्‌. प्रभू यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळाकडे धाव घेवून घटनेचा पंचनामा करुन बिबट्याचे शव दोडामार्ग येथील पशु संवर्धन केंद्रात घेऊन गेले. येथे पशु चिकित्सा अधिकारी डॉ. राजेश केणी यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले असता रान डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फाशात अडकल्याने बिबटा मृत्यू पावल्याचे सांगितले. ही मादी साडेचार वर्षांची असून 12 तास आधी तिचा मृत्यू झाल्याची माहिती केणी यांनी यावेळी पत्रकारांना दिली.

वनखात्यातर्फे शोध मोहीम

ही घटना घडल्यानंतर वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी सुभाष हेन्रीक. एस्‌.आर्‌. प्रभू, अनिल शेटगांवकर व कर्मचाऱ्यांनी पिस्तेवाडा नानोडा येथे ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला व बाजुलाच एका सापळ्यात मृत झालेला बिबटा आढळला त्या व परिसरात शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी या ठिकाणी एक सापळा (पिंजरा) लावण्यात आला असून या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने तो पिंजऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. शवविच्छेदनानंतर बिबट्याला फोंडा येथील वनविभागाच्या परिसरात पुरण्यात आल्याची माहिती सुभाष हेन्रिक यांनी दिली.
 
 
This is a test