गोव्यात 6 वाघ तर 41 बिबटे2006 साली गोव्यात झालेल्या व्याघ्र गणनेत राज्यातील जंगलात सहा वाघ व 41 बिबटे असल्याचे आढळून आले होते, अशी माहिती वन खात्याच्या वन्यजीव विभागातील वन उपसंवर्धक देवेंद्र दलाई यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. गोव्यातील वनक्षेत्रात वाघांचे अस्तित्व नसल्याचा दावा वन खात्यातीलच काही वरिष्ठ अधिकारी करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर दलाई यांनी ही माहिती दिली आहे हे विशेष. वर्षभरापूर्वी गोव्यातील उत्तरेकडील वनक्षेत्रात एका वाघाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील वनक्षेत्रात वाघ नाहीत. ते केवळ बिबटे आहेत असा दावा खुद्द वन खात्यातील अधिकारी करताना दिसत होते. दरम्यान, गेल्या वर्षी एका वाघाची हत्या झाल्याने गोव्यातील रान क्षेत्रात आता पाचच वाघ शिल्लक राहिले आहेत असा त्याचा अर्थ काढायचा का, असे विचारले असता त्याविषयी कोणतेही भाष्य करण्यास दलाई यांनी नकार दिला. दरम्यान, चालू वर्षी वाघ संवर्धन क्षेत्र ज्या राज्यांत आहे तेथेच वाघांची गणना चालू असल्याचे मुख्य वनपाल शशी कुमार यानी सांगितले. |