जी-7 गटाची शरद पवारांशी भेट

राष्ट्रवादीच्या नेत्यांसह जी-7च्या गटाने काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथे भेट घेऊन गोव्यातील राजकीय घडामोडींविषयी त्यांच्याशी चर्चा केली. कॉंग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळणारी वाईट वागणूक, राष्ट्रवादीच्या मतदारसंघांत चाललेला कॉंग्रेस नेत्यांचा हस्तक्षेप, आम्हाला राष्ट्रवादीची गरज नाही, असे हल्लीच साबांखामंत्री चर्चिल आलेमाव यांनी केलेले विधान आदींविषयी शरद पवार यांना माहिती देण्यात आल्याचे महसूलमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जुझे फिलीप डिसोझा यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. काल दुपारी 2 वाजता आम्ही शरद पवार यांना भेटलो. सुमारे अर्धा तास आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, अशी माहिती त्यांनी दिली. वरील प्रश्नी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी चर्चा करून सामोपचाराने प्रश्न सोडविण्याचा सल्ला पवार यांनी दिल्याचे ते म्हणाले. उद्या सोमवारी आम्ही गोव्यात परतणार असून शक्य झाल्यास त्याच दिवशी किंवा मंगळवारी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले. काही कॉंग्रेस नेते मिळेल ती विधाने करीत असून त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या युतीत तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागलेले आहे, असे सांगून हे टाळण्यासाठी अशा प्रकारची विधाने कॉंग्रेस नेते करणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे डिसोझा म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसचे आमदार आणि मंत्री यांना व्यवस्थित मार्गदर्शन करायला हवे, अशी आमची मागणी आहे, असे सांगून तशी सूचनाही त्यांना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. आम्हालाही स्थिरता हवी आहे. स्थिरतेसाठीच ही निवडणूकपूर्व युती करण्यात आली होती, असे डिसोझा म्हणाले.
 
 
This is a test