कळंगुटमध्ये आठ बांधकामे पाडलीसीआरझेड उल्लंघनमुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समुद्रभरती रेषेपासून 200 मीटरच्या आत करण्यात आलेली बेकायदा बांधकामे मोडण्यास सुरवात झाल्यानंतर पेडणे-मोरजी पाठोपाठ बार्देश तालुक्यातील कळंगुट पंचायत क्षेत्रातील बांधकामे तोडण्यास काल सुरवात झाली. काल पहिल्या दिवशी आठ बांधकामे पाडण्यात आली. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर 1991 नंतर बांधण्यात आलेली बेकायदा बांधकामे पंचायतीच्या सर्वेक्षणानंतर तसेच पंचायतीनी दिलेल्या माहितीप्रमाणे मोडून टाकण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार बार्देशचे उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पंचायत क्षेत्रातील बागा येथील काही बेकायदा बांधकामे मोडण्यास सुरवात झाली. कळंगुट पंचायत क्षेत्रात एकूण 40 बेकायदा बांधकामांची सूची पहिल्या टप्प्यात मोडून टाकण्याकरिता आलेली असून सरपंच व पंचायत सचिव दाखवतील ती बांधकामे मोडून टाकली जातील. सदर कारवाई 7 ते 14 तारखेपर्यंत शनिवार, रविवार वगळता सुरू राहील असे उपजिल्हाधिकारी रेडकर यांनी उपस्थित पत्रकारांना माहिती देताना सांगितले. 40 बांधकामापैकी बऱ्याच जणांनी स्थगिती आणलेली असून काही जणांची प्रकरणे न्यायालयात तसेच पंचायत संचालनालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे सरपंच-सचिवांच्या माहिती नुसारच बांधकामे मोडली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. सकाळी 10 वाजता सुरू होणारी कारवाई 45 मिनिटे विलंबाने 11.30 च्या दरम्यान सुरू झाली. या कारवाईच्या वेळी बार्देशचे गटविकास अधिकारी शिवप्रसाद नाईक, अतिरिक्त मामलेदार मेघना शेटगावकर, कळंगुटचे सरपंच लक्ष्मण परब, सचिव सुबोध प्रभू, तलाठी सामंत, कळंगुटचे हंगामी पोलीस निरीक्षक देवेंद्र गाड, उपनिरीक्षक चिमुलकर व मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा उपस्थित होता.द. गोव्यात सहा बांधकामे पाडलीसमुद्र भरती रेषेच्या आत असलेली बांधकामे मोडण्याचे काम परवापासून सुरू केले असून परवा काल मिळून सहा बांधकामे मोडण्यात आली. माजोर्डा येथील एका हॉटेलचा भाग मोडला. काल बाणावली येथे चार तर बीच हॉटेलचा एक भाग मोडला. दरम्यान, स्टेट बॅंकेने न्यायालयाकडून स्थगिती मिळविल्याने काम स्थगित केले. उपजिल्हाधिकारी संजीव देसाई यांनी पोलीस संरक्षणात ही कारवाई केली. बाणावली येथे 13 बांधकामे मोडण्यात येणार होती. त्यातील 9 मालकांनी कोर्टाकडून स्थगिती मिळविली. दरम्यान, शॅक्सचा विस्तारीत भाग, झोपड्या, निवारा शेड, न्हाणीघर सारखी बांधकामे मोडून टाकण्यात येत असल्याचे दिसून येत होते. मोठमोठी बांधकामे वाचवण्याचा पंचायतीकडून काटोकाट प्रयत्न झाल्याने नंतर फक्त बारीक नगण्य अशीच बांधकामे मोडून टाकण्यात येत असल्याची चर्चा येथे ऐकू येत होती. सकाळी 11.30 वा. सुरू झालेल्या कारवाई नंतर दुपारपर्यंत फक्त तीनच छोटी बांधकामे मोडून टाकण्यात आली. यात एक संडास, एक झोपडी, व एक विस्तारित बांधकामाचा समावेश होता तर सायंकाळ 4.45 पर्यंत आणखी पाच बांधकामे मोडून टाकण्यात आली. त्यात विस्तारित बांधकामांचा समावेश होता. |