अनागोंदी

0
174

पणजीतील गोकुळाष्टमीच्या वार्षिक फेरीसंदर्भात महानगरपालिकेने घातलेला घोळ गैर आहे. गोव्याच्या कानाकोपर्‍यातून दरवर्षी या फेरीत येणार्‍या गोमंतकीय विक्रेत्यांकडून यंदा आधी प्रति चौरस मीटरप्रमाणे पैसे घ्यायचे, त्यांना स्टॉल उभारू द्यायचे आणि मग अचानक २४ तासांच्या आत गाशा गुंडाळा असे सांगायचे हा प्रकार निश्‍चितच उचित नव्हता. मुळात जर महापालिकेला ही फेरी भरू द्यायची नव्हती, तर या विक्रेत्यांकडून पैसे घेऊन, त्यांना जागा देऊन स्टॉल कसे उभारू दिले गेले हा प्रश्न उपस्थित होतो. महापालिकेकडून न्यायालयाच्या निवाड्याची सबब जरी सांगितली जात असली, तरी पालिकेतील अंतर्गत वादाचीच ही परिणती असावी असे एकंदर चित्र पाहता दिसते. या स्टॉलधारकांकडून हजारो रुपये घेतले गेले आहेत, परंतु साध्या कागदावर त्या पैशांची नोंद केली गेली असे सांगण्यात येते आहे. त्यामुळे या व्यवहारात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय बळावतो. दरवर्षी या फेरीत येणार्‍या विक्रेत्यांकडून कोण कसे पैसे आकारत आले हा खरोखर चौकशीचा विषय आहे. केवळ गोकुळष्ष्टमीच्या फेरीतच नव्हे, तर पुरुमेताच्या फेरीसंदर्भातही ही चौकशी व्हायला हवी. महापालिकेचा एकूणच व्यवहार संशयास्पद आहे. शहरात पार्किंगचा एक महाघोटाळा नुकताच उजेडात आला. एक बडा राजकीय पदाधिकारी महापालिकेला गंडा घालणार्‍या कंत्राटदाराचा भागिदार असल्याचे उघड झाले. तत्पूर्वी एकदा तर महापालिकेचा एक नगरसेवक पालिकेच्या पार्किंगच्या पावत्या बिनदिक्कत फाडून पर्यटकांना लुटत असल्याचे उजेडात आले होते. पणजीच्या पालिका बाजारातील जुन्या गाळ्यांमध्ये एका नगरसेवकाने भाडेकरू ठेवल्याचेही मागील सरकारच्या काळात उजेडात आले. पणजी महानगरपालिका मुळात आहे कशासाठी हा प्रश्न या सार्‍यामुळे निर्माण होतो. मांडवीच्या काठावरचे हे एवढे सुंदर, निसर्गरम्य शहर, परंतु त्याची रया गेली आहे. राजधानीच्या या शहरातल्या मार्केटमधील आणि मासळी मार्केटमधील गलीच्छता पाहिली तर महापालिकेच्या निष्क्रियतेचा प्रत्यय येतो. शहरातील अंतर्गत रस्त्यांना जागोजागी खड्डे पडले आहेत. पदपथ दुकानदारांनी अडवलेले आहेत. पुरेशा पार्किंगची तरतूद न करता नव्या इमारती उभारल्या जात आहेत. एकूणच मामला गडबडीचा आहे. पदपथ हे चालण्यासाठी असल्याने तेथे स्टॉल उभारण्यास महापालिकेची हरकत असेल तर पणजीतील अनेक व्यापार्‍यांनी बिनदिक्कत पदपथ अडवून अतिक्रमणे केलेली आहेत, त्याबाबत मात्र महापालिकेचे मौन का? गोकुळाष्टमीची फेरी पूर्वी कांपालच्या मैदानावर भरायची. कोण्या शहाण्याने त्या सुंदर मैदानावर पणजीचा टनांवारी कचरा नेऊन टाकण्याचा आदेश दिला आणि त्या मैदानाची वाट लागली. आज कांपालचे ते प्रशस्त मैदान गलीच्छतेचे आगर होऊन बसले आहे. गोकुळाष्टमीची फेरीही त्यामुळे स्थलांतरित करणे भाग पडले. गणेश चतुर्थीच्यापूर्वी ही फेरी भरत असल्याने साहजिकच उत्सवाशी संबंधित पाट, चौरंग, देव्हारे वगैरे लाकूडसामान तेथे प्राधान्याने विकायला येते. त्याच्या जोडीने स्थानिक कारागिरांनी बनवलेले फर्निचरही विकायला आणले जाते. म्हापशाची मिलाग्रीसची फेरी, पणजीची गोकुळाष्टमीची फेरी ही पूर्वापार त्यासाठी प्रसिद्ध आहे. वर्षानुवर्षे ती सुरळीत चालत आली आहे. मग यंदाच असे काय घडले की हा घोळ व्हावा? फेरीवर जर बंदी घातली जात असेल तर उच्चभ्रूंच्या कलामहोत्सवांना या पदपथावर अनुमती देणेही गैर आहे. जो न्याय गोमंतकीय विक्रेत्यांना लागू आहे, तोच सर्वांना लागू असला पाहिजे. आता ही फेरी कला अकादमीच्या प्रांगणात स्थलांतरित केली जाणार आहे. पणजीत पूर्वी कला अकादमीत व्यापारी प्रदर्शने भरायची. शहरातील व्यापार्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ लागल्याने त्यांनी राजकीय दबाव वापरून त्यावर गदा आणली. वाहतूक कोंडीची समस्या हे जर अशा मनाईचे कारण असेल तर राजकारण्यांच्या सभांना आणि सत्कार सोहळ्यांना शहरात परवानगी कशी मिळते हाही प्रश्न उपस्थित होतो. महापालिकेने गोमंतकीय विक्रेत्यांचे हित पाहिले पाहिजे. आजही पणजीत येणार्‍या ग्रामीण भाजीविक्रेत्या महिलांना सकाळी दहा वाजता बाजार निरीक्षकांकडून हाकलले जाते. बाजारपेठेतील गाळे मात्र परप्रांतीय विक्रेत्यांनी बळकावले आहेत. एकेकाचे चार चार गाळे आहेत. बड्या निवासी संकुलांमध्ये सदनिका आहेत, पण ही मंडळी महापालिकेचे नाममात्र भाडेही भरीत नाहीत. नवे बाजार संकुल पूर्ण भरले तरी जुना बाजार मात्र अजूनही हटायला तयार नाही. ही सगळी पणजी महापालिकेतील अनागोंदीची आणि भ्रष्टाचाराची परिणती आहे. पणजी शहर म्हणे ‘स्मार्ट’ होऊ घातले आहे. परंतु महापालिकेतील या सार्‍या अनागोंदीमागील ‘स्मार्ट’ मंडळींना आधी वठणीवर आणणे जरूरी आहे.