मतदारांच्या स्वागतामुळे विक्रमी मतदानाची खात्री : मनोहर पर्रीकर

0
125

पणजी मतदारसंघात आपण आतापर्यंत १०८ बैठका घेतल्या असून मतदारांकडून होत असलेले स्वागत पाहून या निवडणुकीत मतदानाचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ होणार हे स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. पणजी मतदारसंघाचा आपला निवडणूक जाहीरनामाही त्यांनी यावेळी प्रकाशित केला.
नवीन मलनिस्सारण यंत्रणेचे नियोजन आणि कार्यवाही, विस्तार आणि गरज असेल तेथे जुनी यंत्रणा बदलून २०२० पर्यंत पणजी शहर सोक पीट मुक्त करण्याचे जाहीरनाम्यात पर्रीकर यांनी आश्‍वासन दिले आहे. शहरातील वाहतूकीत बेशिस्त आढळून आली आहे. त्यामुळे नवीन जोड रस्त्यांच्या निर्मितीसह संपूर्ण मतदारसंघात सक्षम आणि परिणामकारक अशी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारणे, मध्यवर्ती नियंत्रण केंद्रासह मतदारसंघात सीसीटीव्हीचे जाळे तसेच पणजी व आजूबाजूच्या परिसरातील पाण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ओपा येथे उभारण्यात आलेल्या २७ एमएलडी जलप्रक्रिया केंद्र लवकरच कार्यवाहीत करण्याचे आश्‍वासन पर्रीकर यांनी दिले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सांतिनेज नाल्याचा प्रश्‍न अग्रक्रमाने सोडविण्याचे आश्‍वासनही दिले आहे. पणजी शहर प्रदूषण मुक्त करण्याच्या हेतूने शहरात विजेवर चालणार्‍या व बायोगॅस वर चालणार्‍या बसेस सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पणजी मतदारसंघात आपला प्रतिस्पर्धी कोण आहे, ते पहाण्यासाठी आधुनिक दुर्बिण मागविल्याचे पर्रीकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
चर्चच्या बुलेटिनबाबत प्रतिक्रिया नाही
चर्चने प्रसिध्द केलेल्या बुलेटिनच्या बाबतीत आपण कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त करण्यास तयार नाही, असे ते म्हणाले. कॅसिनो पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले.