मिरामार किनार्‍यावर रूतलेले जहाज धोकादायक स्थितीत

0
121

मिरामार समुद्रकिनार्‍यावर भरकटून येऊन गेल्या १५ जुलै रोजी रूतलेले लकी सेव्हन हे कॅसिनो जहाज सध्या धोकादायक स्थितीत असल्याचे दिसत आहे. पाण्याचा जोरदार प्रवाह, शक्तीशाली लाटांच्या तडाख्याने तसेच खालून रेती नाहीशी होत असल्याने या जहाजात पाणी जाऊन ते एका बाजूने कलंडत असल्याचे नजीक पाहिले असता दिसून येत आहे. या जहाजाच्या रूतण्यामुळे सुंदर मिरामार किनार्‍याला अवकळा आली आहे.
या जहाजाच्या स्थितीविषयी माडगावकर सॅल्वेजचे आनंद माडगावकर यांना विचारले असता त्यांनी हे जहाज पुढील ऑक्टोबरपर्यंत आहे त्या ठिकाणाहून हटविणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. मिरामार समुद्रकिनारा हा गोव्यातील सर्वात सुरक्षित किनारा असून या जहाजाच्या येथे रूतण्यामुळे या किनार्‍याची हानी सध्या सुरू झाल्याचे ते म्हणाले. मिरामार किनार्‍यावर पुढील कोणत्याही नुकसानीची भरपाई या जहाजाच्या मालकाकडून केली जावी अशी मागणी त्यांनी केली. पावसाळा सुरू झाल्यानंतर सप्टेंबरपर्यंत या भागातून जलवाहतूक करण्यास मनाई असताना जहाज येथे आणणे ही मोठी चूक असल्याचे माडगावकर म्हणाले. सध्या जेथे हे जहाज रूतले आहे तो भाग आंघोळीसाठी सर्वात सुरक्षित होता. मात्र या जहाजामुळे हा भाग धोकादायक बनला आहे. कारण या भागातील पाण्याच्या प्रवाहाचा वेग या जहाजामुळे वाढल्याचा दावा त्यांनी केला. मिरामार किनार्‍याची सध्या जी स्थिती बनली आहे तशी ती याआधी कधीच नव्हती असे माडगावकर यांनी सांगितले.