सुरक्षा आव्हानांच्या मुकाबल्यासाठी भारत सुसज्ज

0
133

>> लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासियांना ग्वाही

देशाच्या ७१व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात येथील लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या आव्हानांचा मुकाबला करण्यास सक्षम व सुसज्ज असल्याची ठासून ग्वाही दिली. डोकलामप्रश्‍नी चीनबरोबरील विद्यमान तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांचे हे वक्तव्य सूचक मानले जाते. जातीयवाद हे विषासारखे असून तो देशासाठी घातक आहे व कोणत्याही धर्माच्या नावाने हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. बंदुकीच्या गोळ्यांनी काश्मीरप्रश्‍न सुटणार नसल्याचेही ते म्हणाले.

ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून मोदी यांनी काल छोटे म्हणजे फक्त ५६ मिनिटे भाषण केले. आतापर्यंतचे त्यांचे हे सर्वात छोटे भाषण ठरले आहे. राजस्थानी पगडी परिधान केलेल्या मोदी यांनी आपल्या या भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. देशाच्या विविध भागांमधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली जीवितहानी तसेच गोरखपूर इस्पितळातील बालकांचे मोठ्या प्रमाणातील मृत्यू यांचाही त्यात समावेश होता. अशा दोन्ही प्रकारच्या घटनांतील मृतांच्या निकटवर्तीयांप्रती संपूर्ण देशातील जनतेची सहानुभूती असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
लाल किल्ल्यावरून चौथ्यांदा देशाला संबोधताना त्यांनी तीन वर्षांच्या आपल्या सरकारच्या कार्यकाळातील विकासकामे, योजना, निर्णय यांच्याविषयी मतप्रदर्शन केले. विशेष करून जीएसटी व निश्‍चलनीकरण यांच्या यशस्वीतेकडे अंगुली निर्देश केला. भारतासारख्या खंडप्राय देशात या निर्णयांना मिळालेले यश ही क्रांतीकारी घटना असल्याचे ते म्हणाले.
गले लगानेसे समस्या सुलझेगी
काश्मीरमधील विद्यमान अशांततेवर भाष्य करताना मोदी म्हणाले, ‘ना गाली से, ना गोली से, परिवर्तन होगा गले लगानेसे… समस्या सुलझेगी हर काश्मिरीको गले लगानेसे’.
काही मूठभर विभाजनवादी काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत आहेत; परंतु भारत सरकार काश्मीरला पुन्हा नंदनवन बनविण्यासाठी वचनबध्द असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण देश काश्मीरी
जनतेच्या पाठीशी
केवळ जम्मू-काश्मीर सरकारच नव्हे तर संपूर्ण देश काश्मीरी जनतेच्या पाठीशी, त्यांची विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उभा आहे. असे मोदी म्हणाले.
गेल्या वर्षी भारतीय सेनेने घडवून आणलेल्या सर्जिकल स्ट्राईककडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, या घटनेमुळे भारतीय संरक्षण दलांच्या सुसज्जतेचे दर्शन जगाला घडले आहे. भारताचे स्थान आज जगात उंचावलेले असून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी अनेक देशांनी भारताला या संदर्भात सहकार्याचा हात दिला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘भारत जोडो’ घोष वाक्य हवे
आमच्या संरक्षण दलांच्या तिन्ही शाखांच्या जवानांनी आपल्या शौर्याची वेळोवेळी प्रचिती दिली आहे. त्याचा आपल्याला मोठा अभिमान वाटतो. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातील ‘भारत छोडो’ या घोषणेप्रमाणे आता ‘भारत जोडो’ हे घोष वाक्य बनायला हवे असे ते म्हणाले.
निश्‍चलनीकरणानंतर बँकांत
१.७५ लाख कोटी जमा
केंद्राच्या निश्‍चलनीकरण धोरणाच्या अंमलबजावणीनंतर आतापर्यंत बँकांमध्ये १.७५ लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. तर बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी देशभरातील १८ लाख लोक सरकारच्या नजरेखाली आहेत अशी माहिती मोदी यांनी दिली.