सरकारी यंत्रणेचा पर्रीकरांकडून गैरवापर

0
99

>> शांताराम नाईक यांचा आरोप

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कार्यकर्ते व मतदारांना आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावून बैठका घेत आहेत, असा आरोप प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केला. यामुळे लोक प्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे ते म्हणाले.
पणजी व वाळपई या दोन्ही मतदारसंघातून कॉंग्रेस उमेदवाराला जनतेचा पाठिंबा मिळत आहे, असे सांगून जनतेचा कौल नसताना ज्या पध्दतीने पर्रीकर यांनी सरकार स्थापन केले त्याचा त्यांना पश्‍चातापही होत आहे. नैतीकदृष्ट्या ते खचले आहेत, असे नाईक यांनी सांगितले. संरक्षणमंत्री म्हणून पंतप्रधानांच्या कार्यालयाने पर्रीकर यांना नेहमीच अंधारात ठेवले. त्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामुळेच ते महत्त्वाचे मंत्रीपद सोडून गोव्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले. सरकारच्या एकाही खात्याचे संकेतस्थळ चालू शकत नाही. अशा परिस्थितीत गोव्यात डिजीटल इंडिया यशस्वी कसे होणार, असा प्रश्‍नही त्यांनी केला. मेक इन इंडिया संकल्पना यशस्वी करण्यासाठी कायदा आवश्यक असतो. तो कायदा सरकारने केलेला नाही, असे नाईक यांनी सांगितले.