सकलांचा उद्धारकर्ता श्रीगोपालकृष्ण

0
214

– प्रा. रमेश सप्रे

श्रीकृष्णानं सज्जनांचं रक्षण (परित्राणाय साधूनाम्) आणि दुष्टदुर्जनांचं निर्दालन (विनाशाय च दुष्कृताम्) करून धर्मसंस्थापनेचं युगकार्य केलं. तो जसा ‘संभवामि युगे युगे’ असा परमेश्‍वरी शक्तीचा अवतार होता तसाच जनगणमनाचा अधिनायक होता. खरा भारतभाग्यविधाता होता. म्हणूनच त्याच्या जयंतीनिमित्तानं त्याचा जयजयकार करत म्हणू या – जय हे जय हे जय हे!

श्रावण वद्य अष्टमी ही श्रीकृष्णाची जन्मतिथी. रात्री बारा वाजता जन्मवेळ. अनेक ठिकाणी, मंदिरामंदिरातून श्रीकृष्णजन्मोत्सव आनंदानं साजरा केला जातो. कीर्तनं – प्रवचनं असतात. वृत्तपत्रातून लेख लिहिले जातात. दृक्‌श्राव्य माध्यमांवरून – विविध वाहिन्यांवरून हे आनंद-सोहळे दाखवले जातात. एकूण माहोल आनंदाचा – जल्लोषाचा असतो. या धामधुमीत श्रीकृष्णाचे चरित्र, कार्य, जीवनसंदेश याविषयी लेखन – चिंतन – विचारमंथन केलं जातं. असंच हे मुक्त-प्रकट चिंतन.
श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा पूर्णावतार (साक्षात् विष्णू) का साक्षात् परब्रह्म की एक महापुरुष या वादात न शिरलेलं बरं. महाभारत – गीता – भागवत यात जे कृष्णदर्शन होतं त्यावरून आपण आपलं चिंतन करावं. खरं दर्शन म्हणजे नुसतं पाहणं नसतं तर ज्याचं दर्शन घेतो त्याच्या रूपा-स्वरूपाविषयी केलेलं चिंतनच असतं. म्हणूनच दर्शन या शब्दाचा एक अर्थ ‘तत्त्वज्ञान’ असाच आहे. नि दार्शनिक म्हणजे तत्त्वज्ञ. असो.
महाभारत व भागवत या दोन्ही व्यासांनीच लिहिलेल्या ग्रंथात होणार्‍या कृष्णाच्या दर्शनाचे दोन पैलू आहेत. महाभारतातला कृष्ण हा सामाजिक – ऐतिहासिक महामानव आहे. तर भागवतातली कृष्णाची व्यक्तिरेखा अधिक सांस्कृतिक – आध्यात्मिक अशी आहे.
भागवतात पूर्ण कृष्णचरित्र आलंय. त्यात गोकुळात केलेल्या बाललीलांना अधिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे हा कृष्ण सर्वांचा उद्धार करणारा आहे. ‘अवतार’ नि ‘उद्धार’ हे शब्द परस्परांना जोडलेले आहेत. परमेश्‍वर किंवा ईश्‍वरी शक्ती वरून खाली (म्हणजे पृथ्वीवर – मानव समाजात) देह धारण करून उतरते याला अवतार म्हणतात. तर पतनशील मानवाला खालून वर (म्हणजे खालच्या पातळीवरून, संकटातून, अधःपातातून वर) नेण्याच्या कार्याला ‘उद्धार’ म्हणतात. उद्धार या शब्दातसुद्धा संरक्षण, उन्नती, उत्कर्ष अशा अर्थाच्या छटा असतात.
भगवद्गीतेत या उद्धार कल्पने(कार्या)बद्दल निरनिराळे उल्लेख आहेत. ते सारे विचार करण्यासारखे आहेत. अर्जुनाला ‘विषाद’ अवस्थेपासून ‘प्रसाद (आत्मविश्‍वास पूर्ण) अवस्थेपर्यंत नेऊन अर्जुनाकडून युद्ध करून घेऊन त्यात जय मिळवून देण्यासाठी ‘गीतेचा अवतार’ आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
* गीतेत सहाव्या अध्यायात ध्यानयोगाबद्दल सांगताना स्पष्टपणे सांगितलंय-
उद्धरेत् आत्मन् आत्मानम्‌|
म्हणजे स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो. याला ‘आत्मोद्धार’ असंही म्हणतात. सद्गुरु, सद्ग्रंथ, सत्संग यातून मार्गदर्शन जरूर मिळते. पण प्रत्यक्ष मार्ग आपल्यालाच चालायचा असतो नि मुक्कामालाही आपलं आपणच पोचायचं असतं.
* पण बाराव्या भक्तियोगाच्या अध्यायात मात्र भगवंत म्हणतात-
… तेषाम् अहम् समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ॥
त्यांचा मी उद्धार करतो. त्यांचा म्हणजे कुणाचा? तर जो सगळी कर्मं मला अर्पण करतात (‘श्रीकृष्णार्पणमस्तु’ या भावानं), सतत माझं ध्यान, माझी उपासना करतात त्यांचा उद्धार भगवंत स्वतः करतात.
* पुढे अठराव्या अध्यायात उपदेशाच्या शेवटी सांगतात-
सर्वधर्मान् परित्यज्य मां एकं शरणं व्रज|
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः॥
संपूर्ण शरणागत होणार्‍या भक्तांना मी सर्व पापांतून मोक्ष देतो म्हणजे त्यांचा उद्धार करतो. श्रीकृष्णाची इतकी रुपं आपल्याला माहीत आहेत की खरं रूप कोणतं याविषयी संभ्रम निर्माण व्हावा. गोकुळातला, मथुरेतला, द्वारकेतला कृष्ण तर वेगवेगळ्या भूमिका साकारतो. युद्धातच कुरुक्षेत्रावर किती भूमिका त्याला कराव्या लागल्या. पण या प्रत्येक वेळी त्याची दृष्टी मात्र लोकोद्धाराचीच होती. या दृष्टीनं त्याच्या उद्धारकार्यावर दृष्टिक्षेप टाकू या.
* असुरोद्धार ः कंसानं कृष्णाला मारण्यासाठी गोकुळात पाठवलेले असुर आले होते कृष्णाला मारायला, पण त्याच्या हातून मरण आल्यामुळे उद्धरून गेले. पूतना कृष्णानं तिचं विष तिच्यावरच उलटवून मारल्यामुळे उद्धरून गेली. पुढे कसं, शिशुपालासारख्या दुष्ट राजांना कृष्णानं मारलं. त्यांचाही उद्धारच झाला. कारण पूतना द्वेष किंवा सूडभावनेनं, कंस भयानं तर शिशुपाल मत्सरानं कृष्णाशी कायम मनातून जोडले गेले होते. त्यांचं सतत कृष्णस्मरण, कृष्णचिंतन चालू असायचं. भावना कोणतीही असली तरी मनानं भगवंताला जोडलेलो असलो तर आपला उद्धारच होतो.
दोन अर्जुन वृक्ष (यमलार्जुन) नंदाच्या अंगणात उभे होते. दोघेही शापित गंधर्व होते. उखळाला बांधल्यावर कृष्णानं उखळ खाली पाडून, फिरवत नेऊन, जवळजवळ असलेल्या त्या अर्जुन वृक्षांमधून नेऊन ते वृक्ष मोडले पण त्यात बंदिस्त असलेले गंधर्व मुक्त झाले. हा त्यांचा उद्धारच होता.
तसाच तो कालिया नाग. यमुनेचं पाणी त्याच्यामुळे विषारी बनत होतं. त्यामुळे त्याला जिंकून, त्याच्या फणांवर नृत्य करत, बासरी वाजवत कृष्णानं त्याला न मारता यमुना सोडून रमणक बेटावर जाण्याची आज्ञा केली. त्याच्याबरोबरच्या सर्व नागांना गरुडापासून संरक्षण दिलं. सारे आनंदानं गेले. हा कालियाचा उद्धारच होता. कृष्णस्पर्शामुळे तो उद्धरून गेला.
* गोवर्धन उद्धार ः इंद्रानं केलेल्या उग्र पर्जन्यवृष्टीमुळे गोकुळ वाहून जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण कृष्णानं गोपाळांच्या मदतीनं गोवर्धन पर्वतच उचलला नि सर्वांचं रक्षण केलं. यात सारी शक्ती नि युक्ती कृष्णाचीच होती. जो गोवर्धन पर्वत पाणी, गवत याद्वारे गोकुळातल्या गोधनाचं संवर्धन करतो. त्याचीच पूजा, त्याच्यासाठी यज्ञ करण्यास कृष्णानं आरंभ केला. हा गोवर्धन पर्वताचा उद्धारच होता.
* पशु-पक्षी-वनस्पतींचा उद्धार ः गाई, वासरं, बैल हा तर कृष्णाच्या जिव्हाळ्याचा भाग होता. त्यांना पूर्वी नव्हतं एवढं महत्त्व त्यानं प्राप्त करून दिलं. पक्ष्यांकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदलावी म्हणून त्या भागात विपुल प्रमाणात असलेल्या मोराचं पीस मुकुटावरच्या तुर्‍यासारखं केसात खोचून वावरू लागला.
त्याचप्रमाणे वृक्षांकडे पाहण्याची निसर्गप्रेमी दृष्टी त्यानं सर्वांना दिली. बांबूपासून बनवलेली कृष्णाची मधुर बासरी किती दिव्य पातळीवर पोचली? कदंब वृक्षाखाली यमुनेच्या काठी तर रासलीला रंगली. त्याचप्रमाणे पुढे तुलसीला (वृंदेला) आपली सर्वांत प्रिय वनस्पती सृष्टीचा उद्धारच नव्हे का?
* सामान्य जनांचा उद्धार ः गोकुळातील गोपगोपीगवळणी अशांना एक आत्मविश्‍वास कृष्णानं मिळवून दिला. त्यांना स्वतःच्या विकासासाठी स्वसंरक्षणासाठी सिद्ध केलं. नंतर निरनिराळ्या पद्धतींनी त्यांचा उद्धारच केला.
गोपगड्यांबरोबर सामान्य मुलासारखा खेळ खेळताना कृष्णाने त्या खेळांनाही दिव्यता प्रदान केली. साधे साधे खेळ कृष्णाच्या सहभागामुळे दिव्य होऊन गेले.
अगदी बालपणी घरी व नंतर इतरांकडे दही-लोणी चोरून त्यानं त्या खोड्यांनाही विशेष महत्त्व दिलं.
* आहारातली क्रांती ः दूध-दही-लोणी-तूप यांचं आहारातलं स्थान उंचावून कृष्णानं मोठं उद्धाराचंच कार्य केलं. पोहे, लाह्या यांच्यासारख्या साध्या पदार्थांना ही समाजात मान्यता नि पावित्र्य (प्रसाद) भावना मिळवून दिली. गोपाळ (गुराखी) दुपारी आपापल्या शिदोरीतून आणलेलं भोजन करत असत. कृष्णानं समदृष्टीनं सर्वांचे शिदोरीतील पदार्थ एकत्र कालवून सर्वांना दिले. हाच तो प्रसिद्ध गोपालकाला. सर्व भेद विसरून, आणलेले कसलेही अन्नपदार्थ एकत्र मिसळून कालवल्यावर त्यातून ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ प्रकट होतं. त्याची रुची अमृतासारखी दिव्य बनते हा सार्‍या सवंगड्यांना, बाळगोपाळांना कृष्णानं दिलेला अनुभव अपूर्व होता.
* गोपींचा उद्धार ः गोकुळ-वृंदावनातल्या सामान्य स्त्रियांनाही कृष्णानं त्यांच्याबरोबर दिव्य नृत्य करून उद्धरून नेलं. त्या सामान्य गवळणी न राहता कृष्णगोपी बनून गेल्या, एकदम ठरलं नि लगेच केलं असं ते नृत्य नव्हतं. ती होती गोपींची रासक्रीडा नि कृष्णाची रासलीला. सुमारे वर्षभर आधी स्वतःच्या मनाला या रासनृत्याबद्दल समजावून द्यायला कृष्णानं गोपींना सांगितलं. कात्यायनी व्रत करायला सांगून त्यांच्यात समर्पणवृत्ती निर्माण केली. नंतर शरद पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या काठी पूर्णचंद्राच्या प्रकाशात सर्वांच्या साक्षीनं रासनृत्य रंगलं. रास म्हणजे सर्व रसांचा समुदाय. तो एक दिव्य, देवदुर्लभ अनुभव होता. प्रत्येक गोपीबरोबर स्वतः नृत्य करून कृष्णानं त्यांना धन्य बनवलं. हा त्यांचा उद्धारच होता.
सर्वांत हृदयस्पर्शी उद्धार होता कुब्जेचा. ही कंसाची दासी ‘कुब्जायाः किमु – नामरूपमधिकं’ अशी म्हणजे नावही कुब्जा (कुबड असलेली) नि रूपही कुबडीचं कुरूप पण तिला आपल्याला गंधाचा तिलक लावायला सांगून त्या स्पर्शानं तिचा कायापालटच कृष्णानं केला. कुब्जा देहानं – मनानं मोहरूनच नव्हे तर उद्धरून गेली.
* मथुरा-मगध-द्वारकावासीयांचा उद्धार ः कंस-जरासंध हे अत्याचारी राजे होते. कंसानं आपल्या पित्याला कारागृहात डांबलं होतं. तर बहीण देवकी नि तिचा पती वसुदेव यांना स्थानबद्ध केलं होतं. नवजात अर्भकांचा वध त्यानं स्वतः केलाच पण आपल्या सैनिकांकडूनही करवला. जरासंधानं तर ‘नरमेध’ करण्याचा संकल्प सोडला होता. शंभर राजांच्या रक्तानं त्याला यज्ञदेवतेला अभिषेक करायचा होता. शहाऐंशी राजांना जिंकून त्यानं कैदेत ठेवलं होतं. अशा क्रूरकर्मा राजांच्या प्रजेला त्यांच्या अत्याचारातून सोडवून कृष्णानं त्यांचा उद्धारच केला. हे करताना कोणतीही आशाअपेक्षाआकांक्षा कृष्णाच्या मनात नव्हती. कारण कंसाला मारल्यावर पिता उग्रसेनाला मथुराधिपती बनवलं. तर जरासंधानंतर त्याचाच पुत्र सहदेव याला राज्याभिषेक केला.
द्वारका तर खास त्यानं वसवलेली राजधानी. संपन्न सुवर्णनगरी! तिला समृद्ध, सुरक्षित बनवून द्वारकावासियांना कृष्ण आपला उद्धारकर्ता ही जाणीव करून दिली. हे सारं जणू त्याचं अवतारकार्यच होतं. याचा महत्त्वाचा भाग म्हणजे महाभारत युद्धात त्यानं पांडवांना विजय मिळवून देताना घडवून आणलेला कौरवांचा संहार. पण तोही त्यांचा उद्धारच होता.
काहींना शासन (शिक्षा) करून; काहींना केवळ दर्शन देऊन; काहींना स्पर्श करून तर काहींवर कृपानुग्रह करून कृष्णानं सार्‍यांचा उद्धार केला.
अक्रुर, विदुर, सुदामा, अर्जुन, उद्धव हे सारेे असेच कृष्णकृपेमुळे, अखंड कृष्णभावनामृतात डुंबत राहिल्याने उद्धरून गेले.
* नरकासुराच्या बंदिवासातील हजारों युवतींचा उद्धार ः हा खरा क्रांतिकारक उद्धार होता. नरकासुराचा संहार करून त्यानं बळजबरीनं आपल्या कारागृहात हजारों युवतींना कैदेत ठेवलं होतं. द्वारकेपासून प्राग्ज्योतिषपुरपर्यंत म्हणजे अख्खा भारत पश्‍चिमेपासून पूर्वेपर्यंत पार करून महापराक्रम करून नरकासुराला मारलं. यावेळी स्त्रियांची प्रतिनिधी असलेल्या आपली पत्नी सत्यभामेला बरोबर घेतलं. सर्व युवतींची सुटका तर झाली पण त्यांचं पुढे समाजात काय स्थान असणार होतं? केवळ भोगदासी? भविष्यद्रष्ट्या श्रीकृष्णानं त्या सार्‍या सोळाहजार एकशे युवतींशी विवाह करून त्यांना संरक्षण व सन्मान दोन्हीही दिलं. ही केवढी क्रांती होती नि हा किती महत्त्वाचा उद्धार होता यावर चिंतनच केलेलं बरं.
* जरा व्याधाचा उद्धार ः जीवनाची अखेर ज्याच्या चुकून मारलेल्या बाणामुळे झाली त्या पश्चात्तापदग्ध जरा व्याधाचाही उद्धार श्रीकृष्णानं केला. त्याला स्वर्गीय विमानातून आपल्या लोकात (वैकुंठात) पाठवून मुक्त केलं. अशा वर्णनातील भाव समजून घ्यायचा असतो.
* कृष्णाच्या उद्धारकार्याला एक मर्यादा ः निरनिराळ्या क्षेत्रातील, निरनिराळ्या नातेसंबंधातील असंख्य व्यक्तीचा उद्धार श्रीकृष्णाकडून सहज (लीलया) झाला. पण पांडवांचा उद्धार करणं जसं जमलं तसं कौरवांचा उद्धार करणं नाही जमलं. भागवत ग्रंथाच्या दृष्टीनं कौरवांचाही कृष्णानं उद्धारच केला. त्यांचा संहार करवून त्यांच्याकडून भावीकाळात होणारी पापकृत्यं थांबवली अन् युद्धात त्यांचा मृत्यू घडवून सार्‍यांना स्वर्गवास दिला.
यादवांच्या बाबतीत गोष्ट निराळी होती. आपली मुलं, नातू, रक्ताचे संबंधी हे व्यसनी बनून, एकमेकाशी संघर्ष करून नष्ट होत असताना कृष्णानं त्यांना आवरलं नाही. उलट या ‘यादवीतून’ (एकाच वंशातील युद्धातून) वाचलेल्या काही उन्मत्त यादवांना कृष्णानं स्वतः मारलं. कोणताही पराक्रम करण्याची आवश्यकता उरली नाही – कारण महाभारत – युद्धानंतर कुणीही राजा स्वतंत्र उरला नाही. अनेक मारले गेले, उरले ते ‘अंकित’ बनले. शरण आले. मित्र बनले. म्हणून कोणालाही जिंकायचं नव्हतं. सुबत्ता तर सोन्याची (समृद्ध) द्वारका होती. मग काय? मद्यपान, जुगार (द्यूतक्रीडा), हिंसा अतिरेकी स्वैराचार यातून व्हायचं तेच झालं. सर्वनाश! पण कृष्णाला याचा ना खेद होता ना खंत. अटळ नियतीचा त्यानं सकारात्मक वृत्तीनं स्वीकार केला.
या सर्व उद्धारकार्यामुळे – उदात्त चारित्र्यामुळे श्रीकृष्ण नुसता एका महाकाव्याचा महानायक बनला नाही तर अनेकांचा उद्धारकर्ता युगपुरुष ठरला.
सकलांचा उद्धारकर्ता बनताना श्रीकृष्णानं सज्जनांचं रक्षण (परित्राणाय साधूनाम्) आणि दुष्टदुर्जनांचं निर्दालन (विनाशाय च दुष्कृताम्) करून धर्मसंस्थापनेचं युगकार्य केलं. तो जसा ‘संभवामि युगे युगे’ असा परमेश्‍वरी शक्तीचा अवतार होता तसाच जनगणमनाचा अधिनायक होता. खरा भारतभाग्यविधाता होता. म्हणूनच त्याच्या जयंतीनिमित्तानं त्याचा जयजयकार करत म्हणू या – जय हे जय हे जय हे!