आनंद संयुक्त अव्वल

0
84

भारताचा पाचवेळचा विश्‍वविजेता ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सिंक्विफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत रशियाच्या इयान नेपोमनियाचत्ची याचा पराभव करत संयुक्तपणे पहिले स्थान मिळविले आहे. पांढर्‍या मोहर्‍यांसह खेळताना आनंदने बहारदार विजयासह आपली गुणसंख्या ४.५ केली आहे. केवळ दोन फेर्‍या शिल्लक असताना मॅक्सिम वाचिएर लाग्रेव व लेवोन अरोनियन यांच्यासह तो पहिल्या क्रमांकावर आहे.
नेपोमनियाचत्ची याने काल सिसिलियन डिफेन्सच्या नेजडॉर्फ व्हेरिएशनचा वापर करत आनंदविरुद्ध सुरुवात केली. डावाच्या मध्यापर्यंत सामना किंचित आनंदच्या बाजूने होता. यानंतर इयान याची एकाग्रता भंग पावली. आवश्यकता नसताना आपल्या प्याद्याचा बळी दिल्यानंतर त्याने पुढील चालीत बुद्धिबळाच्या भाषेत ‘ब्लंडर’ (घोडचूक) करत आनंदला संधी दिली. यानंतर इयानच्या चेहर्‍यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. ४० चालींनंतर त्याने सामना सोडून दिला.
सातव्या फेरीतील निकाल ः विश्‍वनाथन आनंद (४.५) वि. वि. इयान नेपोमनियाचत्ची (२.५), मॅक्सिम वाचिएर लाग्रेव (४.५) बरोबरी वि. सर्जेई कर्जाकिन (३.५), पीटर स्विडलर (३) बरोबरी वि. मॅग्नस कार्लसन (४), हिकारू नाकामुरा (२.५) पराभूव वि. लेवोन अरोनियन (४.५), वेस्ली सो (२.५) बरोबरी वि. फाबियानो कारुआना (३.५)