भारत-चीन युद्धाचे काऊंटडाऊन सुरू

0
116

>> डोक्लाम प्रश्‍नावरून चीनची पुन्हा धमकी

डोक्लाम प्रश्‍नावरून भारत-चीन दरम्यान निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी भारताकडून शांततेच्या मार्गाने प्रयत्न केले जात असताना चीनने पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली असल्याने युद्धाचे ढग कायम आहेत. चिनी सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ‘चायना डेली’ने ‘भारत आणि चिनी लष्करातील संघर्षाचे काऊंटडाउन सुरू झाले आहे,’ अशा शब्दांमध्ये काल पुन्हा धमकी दिली आहे.
चीन व भारत यांच्यामधील युद्धाची केव्हाही सुरूवात होऊ शकते. या युद्धाचे काऊंटडाउन सुरू झाले आहे, असे चायना डेलीने संपादकीय लेखात म्हटले आहे. भारताने डोक्लामध्ये निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत, असा सल्लाही या लेखात भारताला देण्यात आला आहे. भारताने अद्याप तणाव निवळण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने शांततेच्या मार्गाने प्रश्‍न सुटण्याची शक्यता मावळत चालली आहे, असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे. सदर लेखात भारताने डोक्लाममध्ये घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. चीनने जर उत्तराखंडमधील कालापानी किंवा काश्मीरमध्ये घुसखोरी केली, तर काय होईल, असा प्रश्‍न लेखातून उपस्थित करण्यात आला आहे. चायना डेलीने चिनी सरकारची बाजू उचलून धरताना डोक्लाममधील तणाव कमी करणे भारताच्या हातात असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी भारताने डोक्लाममधून सैन्य कोणत्याही अटीविना माघारी घ्यावे. तसे केल्यास स्थिती पूर्ववत होईल, असे म्हटले आहे.
मंगळवारी चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा देताना १९६२ मध्ये नेहरू यांनी केलेली चूक करू नये असे म्हटले होते.