वाघेलांसह ८ आमदारांची कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी

0
102

गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेसने शंकरसिंह वाघेला यांच्यासह आठ आमदारांची हकालपट्टी केली. या सर्वांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या व्हिपचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेसने कारवाई केली आहे.
कॉंग्रेसने हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदारांमध्ये शंकरसिंह वाघेला, त्यांचा मुलगा महेंद्रसिंह वाघेला, राघवजी पटेल, भोला गोहिल, धर्मेंद्र जाडेजा, पी. के. रौलजी, अमित चौधरी, करण पटेल यांचा समावेश आहे. यांपैकी शंकरसिंह वाघेला यांनी राज्यसभा निवडणुकीच्या आठवडाभर आधी विरोधी पक्षनेतेपदाचा तसेच कॉंग्रेसचाही राजीनामा दिला होता.
कॉंग्रेसचे सरचिटणीस व गुजरात प्रभारी अशोक गेहलोत यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. हे निलंबन सहा वर्षांसाठी असेल, असे गेहलोत यांनी सांगितले. या आमदारांनी पक्षाचा व्हीप डावलून भाजपला मतदान केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे प्रदेश प्रवक्ते मनीष दोषी यांनी नमूद केले.
गुजरात राज्यसभेच्या तीन जागांसाठी झालेली निवडणूक नाट्यमय ठरली. कॉंग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत हे प्रकरण पोहोचले होते. कॉंग्रेस विरुद्ध भाजप लढाईत कॉंग्रेसच्या अहमद पटेल यांनी प्रतिष्ठेची लढाई जिंकली होती.