पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव निश्‍चित : कॉंग्रेस

0
127

पणजी व वाळपई मतदारसंघात भाजपने विकासच केलेला नसल्याने दोन्ही ठिकाणी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव निश्‍चित असल्याचा दावा कॉंग्रेसने काल पत्रकार परिषदेत केला. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक हे पणजीत काल झालेल्या प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की भाजपने पणजी तसेच वाळपई मतदारसंघाचा विकास केलेला नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी पराभव हा ठरलेलाच आहे.
पुढे बोलताना नाईक म्हणाले की, सध्या भाजप सरकार राज्यातील विविध ठिकाणची बेकायदेशीर बांधकामे पाडत आहेत. पण गमतीची गोष्ट म्हणजे त्यांच्या सरकारची बांधणीही बेकायदेशीररित्या झालेली आहे. सर्वांत मोठा एकेरी पक्ष नसताना त्यांनी कुरघोडी करून सरकार स्थापन केले असल्याचे ते म्हणाले. पणजीचे उमेदवार गिरीश चोडणकर हे यावेळी बोलताना म्हणाले की, चार दिवसांपूर्वी आपण प्रचाराचे काम सुरू केले होते. आपण मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या भेटी घेत असल्याचे ते म्हणाले. सकाळी ८ ते रात्रौ ९.३० पर्यंत आपण या गाठीभेटी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले की, दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक लोकांवर लादण्यात आलेली आहे. दोन्ही मतदारसंघात विकास झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने ५० हजार नोकर्‍या देण्याचे जे वचन जनतेला दिले होते त्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी यावेळी केला.