देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे पणजीत १४ पासून आयोजन

0
121

भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या सहकार्याने गोवा मनोरंजन सोसायटीने १४, १५ व १६ ऑगस्ट असे तीन दिवस देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. ही माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
‘याद करो कुर्बानी’ असे या महोत्सवाला नाव देण्यात आले आहे. दि. १४ रोजी महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यादिवशी ‘लोकमान्य’ हा लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्रपट दाखवण्यात येईल. दि. १५ रोजी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ हा चित्रपट तर १६ रोजी ‘सरदार वल्लभभाई पटेल’ हा चित्रपट दाखवला जाईल. पणजीतील विद्यार्थ्यांना या महोत्सवाला आमंत्रित करण्यात येईल. सर्व चित्रपटांचे खेळ सकाळी १० वा. सुरू होतील.
ठिकठिकाणच्या रवींद्र भवननाही या महोत्सवातील चित्रपट दाखवण्यात रस असल्यास गोवा मनोरंजन सोसायटीकडे संपर्क साधण्यास कळवण्यात आले असल्याचे तालक यांनी यावेळी सांगितले.

गिरीश कासारवल्ली चित्रपट महोत्सव
दरम्यान, कन्नडमधील जागतिक किर्तीचे चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या चित्रपटांचा एक महोत्सव १८ ते २० ऑगस्ट या दरम्यान ईएस्‌जीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. १८ रोजी त्यांचा ‘घटश्राध्द’, १९ रोजी ‘द्वीपा’, २० रोजी ‘हासिना’ व त्याच दिवशी संध्याकाळी ‘गुलाबी टॉकीज’ हा चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे तालक यांनी सांगितले. १७ ऑगस्ट रोजी तर आठवड्याला दाखवण्यात येत असलेल्या चित्रपटाच्या मालिकेत त्यांचाच ‘रायडिंग धी स्टेलिओन ऑफ अ ड्रिम’ हा चित्रपटही दाखवण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला सचिन चट्टे व रामनाथ पै रायकर हेही हजर होते.