राज्य सहकारी बँकेचा कर्मचारी कपातीचा निर्णय

0
105

>> १२५ कर्मचार्‍यांना सक्तीने स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव

>> पाच शाखाही बंद करणार

गोवा राज्य सहकारी बँकेने नुकसानीचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून बँकेतील सुमारे १२५ कर्मचार्‍यांना ज्यादा ठरवून त्यांच्यासाठी स्वेच्छा व सक्तीने निवृत्त करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. त्याचबरोबर बँकेच्या पाच शाखा बंद करून त्यांचे सक्षम असलेल्या अन्य शाखांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ येत्या २९ ऑगस्ट रोजी संपत आहे.

बँकेला आतापर्यंत ६७ कोटी रुपयांची नुकसानी झाली आहे. खाण व्यवसायाठी ट्रक व्यावसायिकांनी काढलेल्या कर्जावरील व्याज माफ केल्याने बँकेला ३० कोटींचा फटका बसला, असे त्यांनी सांगितले. आपल्या मंडळाने बँकेच्या कारभाराचा ताबा घेतल्यापासून नुकसानी कमी करण्याचे बरेच प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले.
सरकारला ‘रोड मॅप’ सादर
बँकेची स्थिती सुधारण्यासाठी मंडळाने सरकारला ‘रोड मॅप’ही सादर केला आहे. त्यानुसार बँकेवर संचालक मंडळाबरोबर बँक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यावसायिकांची नियुक्ती करणे, व्यवस्थापनावरील खर्चात कपात करण्याचाही त्यात प्रस्ताव आहे, असे त्यांनी सांगितले. सद्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ येत्या दि. २९ रोजी संपत आहे. त्यानंतर काय करावे, हा निर्णय सरकारचा असेल. बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केल्याने बँकेची स्थिती सुधारू शकेल काय, असा प्रश्‍न विचारला असता, त्यावर आपण काहीही सांगू शकत नाही. तो निर्णय सकारचा असेल व सरकार जो निर्णय घेईल तो आम्हांला मान्य असेल, असे फळदेसाई यांनी सांगितले.
बहुराज्य दर्जा रद्द
बँकेचा बहुराज्य दर्जा रद्द झालेला असून सहकार क्षेत्रातील शिखर बँक म्हणून बँक काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दमण व दीवला बँकेपासून वेगळे करण्याची प्रक्रिया चालू आहे. तेथील लोकांच्या १४० कोटींच्या कायम ठेवी व ४ कोटींचे भागभांडवल त्यांना परत करण्याची तरतूदही करून ठेवली आहे. सरकारकडून ना हरकत दाखला मिळताच वरील प्रक्रिया पूर्ण होईल, असे फळदेसाई यांनी सांगितले.
सध्या बँकेने वसुली पध्दतीत सुधारणा केली आहे. मार्च २०१८ पर्यंत २२ कोटी रुपयांच्या वसुलीचे बँकेने लक्ष्य ठेवल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. वसुलीच्या बाबतीत दबावही येतात. त्यामुळे अडचण निर्माण होते, असे श्री. फळदेसाई म्हणाले. दबाव येण्याचे बंद झाल्यास पुढील ३ वर्षांत बँक फायद्यात येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

रेजिनाल्ड, ट्रॉजन डिमेलोंवर
अब्रुनुकसानीचा खटला गुदरणार
गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमातून बँकेच्या व्यवस्थापन तसेच संचालक मंडळावर आरोप होतात. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचाही आरोप केला आहे. त्यामुळे त्या आरोपातील सरकारने सत्यता पडताळून पहावी यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र पाठविल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली. लॉरेन्स व डिमेलो यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला भरण्याच्या बाबतीत कायदे तज्ज्ञाकडे सल्ला मागितल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

गोवा राज्य सहकारी बँक डबघाईस….
बँकेला आतापर्यंत ६७ कोटींचे नुकसान
खाण व्यवसायासाठी कर्ज माफ केल्याने
३० कोटींचा फटका
बँक वाचवण्यासाठी सरकारला ‘रोड मॅप’ सादर
बँकेचा बहुराज्य दर्जा रद्द
बँकेवर तज्ज्ञाच्या नियुक्तीची शिफारस