‘त्या’ वादग्रस्त जागेवर राममंदिराची उभारणी व्हावी

0
99

>> शिया वक्फ बोर्डाचे प्रतिज्ञापत्र

वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणी शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी केली जाऊ शकते, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. याशिवाय राम मंदिरापासून थोड्या अंतरावर मुस्लीम बहुल भागात मशिदीची उभारणी केली जावी, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या खटल्याची सुनावणी ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
बाबरी मशीद शिया वक्फ बोर्डाची होती. त्यामुळे या प्रकरणात इतर पक्षकारांसोबत बातचीत करण्याचा अधिकार बोर्डाकडे आहे. संवादाच्या माध्यमातून शांततापूर्ण पद्धतीने समाधानकारक तोडगा काढण्याचा अधिकार केवळ वक्फ बोर्डाकडे आहे, असा उल्लेखही प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. राम मंदिर व बाबरी मशिदीची उभारणी झाल्यास अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात येईल. तसेच मंदिर व मशिदीच्या उभारणीमुळे सुरू असलेले वाददेखील संपतील असेही शिया वक्फ बोर्डाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अयोध्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली समिती ११ ऑगस्टपासून याचिकांवरील सुनावणीला सुरूवात करणार आहे.