माडाला राज्य वृक्षाचा दर्जा देणार्‍या कायद्याला मंजुरी

0
144

माडाला जो गवताचा दर्जा देण्यात आला होता तो रद्द करून त्याला झाड ठरवणे व त्याला राज्य वृक्षाचा दर्जा देणे यासाठी गोवा वृक्ष संवर्धन दुरुस्ती विधेयक २०१७ काल गोवा विधानसभेत संमत करण्यात आले.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, जर एखादे माडाचे झाडे जुने झालेले असेल अथवा कोसळण्याच्या स्थितीत असेल अथवा ते निकृष्ट दर्जाचे असल्याने ते कापून त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचा कवाथा लावायचा असेल तर मालकाला त्यासाठी कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधावा लागेल. माड हा कृषी वृक्ष असल्याने सदर जबाबदारी कृषी अधिकार्‍यांवर सोपवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, वरील मुद्द्यांपेक्षा जर काही वेगळा मुद्दा असेल तर मात्र मालकाला वन अधिकार्‍यांशी संपर्क साधावा लागेल. भाटकाराच्या भाटातील माडाची झाडे जुनी झालेली असतील तर ती कापून त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रतिचे कवाथे लावता येतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
माडाला राज्य वृक्षाचा दर्जा देण्याच्या बाबतीत बोलताना आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले की, यापूर्वीच ‘माडत’ या झाडाला राज्य वृक्षाचा दर्जा देण्यात आलेला होता. त्यामुळे सरकारने माडाला वारसा वृक्षाचा दर्जा द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. पर्रीकर म्हणाले की, ‘माडत’ या झाडाला राज्य वृक्षाचा दर्जा आहे. पण तो गोवा, दमण व दीव वृक्ष संवर्धन कायदा १९८४ अंतर्गत नाही. दुरुस्ती विधेयकात आम्ही माडाला राज्य वृक्ष हा दर्जा दिलेला आहे, असा खुलासा पर्रीकर यांनी केला. हवे असल्यास सरकार दोन वृक्षांनाही राज्य वृक्षाचा दर्जा देऊ शकते. माडत या वृक्षाला राज्य दर्जा काढून टाकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.