अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

0
68

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या गेल्या १० जुलै रोजीच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तिघा संशयितांना अटक केल्याची माहिती काल जम्मू – काश्मीर पोलिसांतर्फे देण्यात आली. हा हल्ला प्रत्यक्ष घडवून आणलेल्या लष्करे तैयबाच्या (एलईटी) चार दहशतवाद्यांना या तिघा संशयितांनी या कामी मदत केली अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनिर खान यांनी दिली. या हल्ल्यात ८ यात्रेकरू मृत्यूमुखी पडले होते.

यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी एलईटीच्या चौघांना या तिघांनी वाहने पुरविली व आसरा दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी याची कबुली दिली. त्यांची अजूनही चौकशी सुरू असल्याने खान यांनी सांगितले.
अबू इस्माईल या पाकिस्तानी एलईटी दहशतवाद्याच्या नेतृत्वाखाली ९ जुलै रोजी यात्रेकरूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र तो कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे अपयशी ठरला होता असे पोलिसांनी सांगितले.
एलईटीच्या चौघांपैकी आणखी एकाचे नाव यावर असे असून तो स्थानिक आहे. उर्वरीत दोघे पाकिस्तानी आहेत, असे समजले आहे. अबू इस्माईल व यावर यांची छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत.
एलईटीच्या चौघांना मदत केल्याप्रकरणी अटक झालेल्यांची नावे बिलाल अहमद रेशी, ऐजाझ वागेय व झहूर अहमद अशी आहेत. बिलाल याचा मोठा भाऊ हाही एलईटीचा दहशतवादी होता व तो या वर्षीच एका चकमकीत ठार झाला. या हल्ल्याच्या तपासकामासाठी दक्षिण काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक स्वयंम प्रकाश पानी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.