दीनदयाळ स्वास्थ्य योजनेत सुधारणा करणार ः आरोग्यमंत्री

0
100

आरोग्य खात्याच्या दीनदयाळ विमा स्वास्थ्य योजनेतील त्रुटी दूर करून त्यात सुधारणा करण्याचे तसेच आणखी काही आजारांवरील उपचार व आणखी नवीन इस्पितळे या योजनेखाली आणण्याचे आश्‍वासन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल विधानसभेत दिले. निलेश काब्राल व इजिदोर फर्नांडिस यांच्या प्रश्‍नावर त्यांनी हे उत्तर दिले.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयावरील ताण कमी करण्याच्या हेतूनेच सरकारने जिल्हा इस्पितळे, प्राथमिक व सामाजिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून तेथे आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी प्रक्रियाही सुरू केल्याचे राणे यांनी सांगितले.
काल विधानसभेत काणकोण भागातील मूत्रपिंड आजारावरही चर्चा झाली. वरील प्रकरणी सरकारने दोन संस्थांकडून चौकशी केली. परंतु कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, असे राणे यांनी आमदार इजिदोर फर्नांडिस यांना सांगितले. त्यावर चर्चा चालू असताना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी खरोखरच काणकोणमध्येच हे प्रमाण अधिक आहे? याची चौकशी करावी लागेल, अन्य भागातही या रोगाचे रुग्ण सापडतात, असे त्यांचे म्हणणे होते.

नव्याने भू सर्वेक्षण करणार
>> १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

राज्यातील जमिनींचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी महसूल खात्यावरील मागण्यांना काल गोवा विधानसभेत उत्तर देताना सांगितले. यावेळी जीओ मॅपिंगचा आधार घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे दिसून आल्यानेच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील दस्ताऐवजांचे डिजिटलायझेशन यापूर्वीच करण्यात आलेले आहे. आता लवकरच उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयातील दस्ताऐवजांचे डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
अतिक्रमणांविषयी बोलताना ते म्हणाले की, कोमुनिदादीच्या जमिनीत जशी अतिक्रमणे झालेली आहेत तशीच ती सरकारी मालकीच्या काही जमिनींवरही झालेली असून त्यासंबंधी पावले उचलावी लागणार आहेत. राज्यातील बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्याचे कामही मार्गी लागणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.