चार वर्षांत कोमुनिदादी स्वावलंबी बनणार : खंवटे

0
70

सरकारने कोमुनिदादीसांठी अनुदान योजना तयार केल्याने पुढील चार वर्षांत सर्व कोेमुनिदादी स्वावलंबी बनणार असल्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी काल विधानसभेत सांगितले.
कोमुनिदाद जमिनीत बेकायदेशीरपणे अतिक्रमणे केलेल्यांची चौकशी चालू असून पुढील तीन महिन्यांत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या मूळ प्रश्‍नावर त्यांनी ही माहिती दिली. सरकारने वरील प्रकारांच्या तपासासाठी चौकशी आयोग स्थापन केला आहे. या आयोगाची एक बैठक झाली आहे. परंतु निवडणूक आचार संहिता लागू झाल्याने काम पूर्ण होऊ शकले नाही, असे खंवटे यांनी सांगितले. कोमुनिदाद प्रशासकांचे स्वत: काम करत असलेल्या इमारतीवरही लक्ष नाही. असे सांगून संबंधित सभागृहाला चुकीची माहिती देत असल्याचे सत्ताधारी आमदार निलेश काब्राल यांनी सांगितले. कोमुनिदादींच्या जमिनी सांभाळण्याची गरज आहे. त्यामुळेच सरकार काळजी घेत असल्याचे खंवटे यांनी सांगितले. आमदार निळकंठ हळर्णकर यांनीही माडेल येथे कोमुनिदादीच्या जागेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे उभारल्याचे सांगून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली.