जीटीडीसीची कुटीरे फायद्यात

0
67

>> पर्यटनमंत्री : कॉंग्रेस सरकारच्या काळात नुकसान

यापूर्वी पर्यटन विकास महामंडळाची (जीटीडीसी) पर्यटन कुटीरे नुकसानीत जात होती. गेल्या पाच वर्षांपासून फायद्यात आहेत. असे पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी काल विधानसभेत फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या प्रश्‍नावर सांगितले. कॉंग्रेस सरकारच्या काळातच महामंडळ नुकसानीत होते असे ते म्हणाले.
सरकारतर्फे वरील आस्थापने चालविल्यास तेथील कामगार जबाबदारीचे पालन करून काम करीत नसतात. खाजगी क्षेत्रात तसे होत नाही त्यामुळे ते नफ्यात येते म्हणून खाजगी क्षेत्राकडे असे प्रकल्प दिल्यास सरकारला फायदा होतो, असे आजगांवकर यानी सांगितले. या प्रश्‍नावरील चर्चा चालू असताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले की फर्मागुडी येथील गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या मालकिची २४ हजार चौ. मीटर जमिन हडप करण्यात आली आहे. त्यावर आजगांवकर यांनी वरील प्रकरणी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. कॉंग्रेस सरकारच्या काळातच महामंडळाला नुकसानी झाल्याचे आजगावकर यांनी सांगितले. मिरामार रेजिडेन्सी भाडेपट्टीवर देण्याचे ठरविले आहे. तसे केल्याने सरकारला शंभर कोटी रुपये महसूल मिळू शकेल, असे आजगावकर यांनी सांगितले. आपल्या खात्याचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.