नवी विटी, तोच डाव

0
81

पाकिस्तानच्या नव्या अंतरिम पंतप्रधानाची निवड आज होणार आहे. नवाझ शरीफ आणि परिवाराला सर्वोच्च न्यायालयाने जरी पनामा पेपर्स प्रकरणी दोषी धरले असले आणि निवडणुका लढवण्यास अपात्र ठरवले असले तरी अद्याप त्यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाज पक्ष तेथे प्रचंड बहुमतात आहे. त्यामुळे शरीफ हे पदावरून पायउतार झालेले असले तरी त्यांच्या जागी त्यांच्याच पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडला जाणे अपरिहार्य आहे. आज शाहिद अब्बासी यांच्याकडे पंतप्रधानपदाची हंगामी धुरा सोपविली जाईल आणि लवकरच शरीफ यांच्या जागी त्यांचे सध्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी असलेले धाकटे बंधू शाहबाज शरीफ निवडणूक लढवून पंतप्रधानपदी आरूढ होतील अशी ही सारी योजना आहे. शाहबाज पंजाबचे मुख्यमंत्रिपद त्यासाठी सोडणार असले तरी तेथे आपल्या जागी पुन्हा आपला मुलगा हमजा याला बसविण्याची त्यांची योजना आहे. अशा प्रकारची घराणेशाही पाकिस्तानला नवी नाही. तिथल्या संसदेतील बहुतेक सदस्य पित्याचा राजकीय वारसा चालवीत संसदपटू बनले आहेत. त्यामुळे नवाज शरीफ यांच्या हकालपट्टीनंतर त्यांचे बंधू पंतप्रधानपदी येणे आणि पुतण्ये पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणे यात तेथील जनतेला काही वावगे वाटत नसावे. पाकिस्तान हे आपले शेजारी राष्ट्र आहे आणि भारतामध्ये आजवर ते कसा उत्पात घडवीत आले आहे हे जगजाहीर आहे, त्यामुळे तेथील या सत्तांतर प्रक्रियेवर भारताची नजर असणे आवश्यक आहे. नवाझ शरीफ यांनी आपल्या कारकिर्दीत भारतमित्र असल्याचा आव जरी आणला तरी प्रत्यक्षात जेव्हा भारताशी मैत्री निभावण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी कच खाल्ल्याचे दिसून आले. लष्करावर आपल्या नागरी सत्तेचा वरचष्मा ठेवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. शरीफ यांच्या जाण्याने पाकिस्तानच्या लष्करशहांकडून, विशेषतः आयएसआयकडून तेथील नागरी प्रशासनावर आपली पकड बनवण्याचा प्रयत्न होईल यात शंका नाही. या धोक्याचा सामना नवे पंतप्रधान कसे करतात हे पाहावे लागेल. नवाझ शरीफ हे पाकिस्तानमध्ये लोकप्रिय नेते होते. म्हणूनच तर ते तीनवेळा राखेतून फिनिक्सने भरारी घ्यावी तसे पुन्हा सत्तेवर येऊ शकले, संसदेत बहुमत मिळवू शकले, परंतु सध्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा पाहिला तर पाकिस्तानी जनता या निवाड्याच्या समर्थनात बोलू लागल्याचे दिसते. शरीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जनता त्यांच्यावर नाराज झाली आहे असा त्याचा अर्थ होतो. मग आगामी निवडणुकीमध्ये शरीफ यांचा पक्ष पुन्हा आपला वरचष्मा राखू शकेल का, सध्या विरोधी पक्षांचा सर्वांत प्रखर आवाज बनलेले इम्रान खान आपल्या तेहरिक इ इन्साफद्वारे कितपत वातावरणनिर्मिती निर्माण करू शकतील असे प्रश्न अनेक आहेत आणि ते केवळ पाकिस्तानसाठी नव्हे, तर भारतासाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत. शाहबाज जेव्हा निवडून येऊन पंतप्रधानपदाची धुरा वाहतील, तेव्हा आपल्या पक्षाला एकसंध राखण्याची आणि शरीफ यांच्या रिमोट कंट्रोलवर न चालता स्वतःच्या प्रज्ञेने पाकिस्तानचा डोलारा सांभाळण्याची जोखीम कितपत पत्करतील त्यावर त्या देशाचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. शरीफ यांच्या काळात चीनशी पाकिस्तानने चुंबाचुंबी चालवली. त्या आधारावर साधनसुविधा निर्मितीमध्ये पाकिस्तानची जोमदार पावले पडली. त्यातून पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीलाही ऊर्जितावस्था आल्याचे दिसते. पाकिस्तानचा पंतप्रधान जरी बदलला तरी चीन आणि पाकिस्तान यांच्यातील हा मधुचंद्र असाच चालू राहील असे दिसते आहे. नवी विटी असली तरी तोच डाव खेळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताला गाफील राहून चालणार नाही.