प्राप्ती कर विवरण भरण्यास ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

0
99

प्राप्ती कर खात्याने एका आदेशान्वये २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी प्राप्ती कर परतावा भरण्यासाठीची मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. यासाठीची मुदत काल दि. ३१ जुलै रोजी संपली होती. प्राप्ती कर खात्याकडे आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दोन कोटीहून अधिक जणांनी प्राप्ती कर परतावे सादर केले आहेत. दरम्यान केंद्र सरकारने आधार व पॅन कार्ड जोडण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.
याआधी प्राप्ती कर खात्याने देशातील विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन कर दात्यांनी आपले उत्पन्न अचूक जाहीर करून ३१ जुलैपर्यंत आयटी रिटर्नस् फाईल करावेत, असे कळविले होते. कोणत्याही व्यक्तीचे एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेवर असेल त्याने प्राप्ती कर परतावा फाईल करणे बंधनकारक आहे.
या पार्श्‍वभूमीवर आता प्राप्ती कर खात्याने रिटर्नस् फाईल करण्याची मुदत वाढविली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ई फाईलिंगमुळे खात्याच्या वेबसाईटवर कामाचा बोजा वाढल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे कारण खात्याने दिले आहे.
आधार-पॅन जोडण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ
केंद्र सरकारने आता आधार व पॅन कार्ड जोडण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. आधार व पॅन कार्डचे क्रमांक एकमेकांशी जोडल्याशिवाय प्राप्तीकर विवरण पत्रावर पुढील कार्यवाही होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्राप्ती कर विवरण पत्र ऑनलाईन भरताना आधार क्रमांक किंवा आधार कार्ड मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाचा क्रमांकही नमूद करणे बंधनकारक केले आहे. या संदर्भात केंद्र सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून जागृती केली होती. नागरिकांची ओळख म्हणजेच आधार कार्ड व आर्थिक ओळख म्हणजे पॅन कार्ड जोडून सरकारचा डेटाबेस भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना सुविधा देण्याबरोबरच बोगस पॅन कार्ड व आधार कार्ड तसेच कर चुकवेगिरी करणार्‍यांवर वचक निर्माण होणार आहे. मात्र या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्यावर न्यायालयाने सरकारला निर्देश दिले होते की सरकारने आधार्ड कार्ड सुरक्षित करावे. नागरिकांची माहिती उघड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही सूचित केले होते. पॅन कार्डची बनवेगिरी रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावी, असे न्यायालयाने निर्देश दिले होते.