अशोक नाईकांची माघार

0
160

>> उमेदवार निवडीबाबत कॉंग्रेसचा पेच कायम

येत्या दि. २३ रोजी होणारी पणजी मतदारसंघातील पोटनिवडणूक कॉंग्रेसच्या तिकिटावर लढविण्यास कार्यकत्यार्र्ंनी नापसंती व्यक्त केल्याने पणजीचे माजी महापौर अशोक नाईक यांनी निवडणूक रिंगणात उतरण्यापासून माघार घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेस नव्या उमेदवाराच्या शोधात आहे.
महापौर असताना आपण पणजीचा कायापालट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरूवातीच्या काळात शहरासाठी कामे केली. परंतु नंतर त्यांनी पणजीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपण यावेळी निवडणूक लढविण्याचा विचार केला होता. आपले कार्यकर्ते हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. परंतु कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण कॉंग्रेस नेते चेल्ला कुमार व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांचीही भेट घेतली होती, असे ते म्हणाले. आपण निवडणूक पराभव पत्करण्यासाठी लढविण्यास तयार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणाकडूनही दबाव नाही
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून आपल्यावर निवडणूक लढवू नये म्हणून दबाव आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. भारतीय भाषा सुरक्षा मंचने प्रस्ताव दिल्यास आपली भूमिका काय असेल, असे विचारले असता, निवडून येऊ शकणार काय, असा प्रतिप्रश्‍न नाईक यांनी केला.
निवडणुकीत माघार घेतल्यामुळे तुम्ही कोणाकडून पैसे घेतल्याचा आरोप होण्याची शक्यता नाही काय असे विचारले असता नाईक यांनी ती शक्यता नाकारली. त्यांनी सांगितले की आपल्यावर पैसे घेतल्याचा आरोप होऊ शकत नाही. पाच वर्षांपर्यंत महापौर असतानाही आपण बँकेचे कर्ज फेडण्यासाठी घर विकल्याचे सर्वश्रूत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार पैसे वाटत होता. तसा पैसाही आपल्याकडे नाही, असे नाईक यांनी एक प्रश्‍नावर सांगितले.