स्वरयंत्राचा कॅन्सर

0
1137

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

निदानाच्या प्रक्रियेनंतर तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो आणि त्यानुसार त्यावर करण्यात येणारे उपाय निश्‍चित केले जातात.
स्वरयंत्राच्या गाठीचा आकार, कर्करोग जवळच्या ग्रंथींमध्ये पसरलेला आहे की नाही, कर्करोग शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरलेला आहे की नाही या गोष्टींनुसार कर्करोगाची श्रेणी ठरवली जाते.

सध्याच्या धावपळ आणि धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस बर्‍याच गोष्टींच्या आहारी जातो आहे. व्यसनाधीनता व अयोग्य आहार-विहार विविध कर्करोगांना आमंत्रित करत आहे. स्वरयंत्राचा कॅन्सर हा त्यातीलच एक प्रकार होय.

आयुर्वेदानुसार वात व कफ प्रकूपित झाले असता गळ्यामध्ये शोथ उत्पन्न होतो. त्यामुळे श्‍वासोच्छ्वासास त्रास होतो. तसेच व्याधी पसरत जाऊन हृदयात पीडा उत्पन्न करतो. हा मर्मनाशक असा विकार आहे तसेच चिकित्सेला अतिशय कष्टसाध्य! आधुनिक शास्त्रानुसार श्‍वासोच्छ्वासास त्रास हा स्वरयंत्राचा अर्बुद किंवा श्‍वासनलिकेचाअर्बुद यामुळे होतो.
स्वरयंत्र अर्बुद हे स्वरतंत्रिका किंवा स्वरतंत्रिकेवरील भागामध्ये आढळतात. हा अर्बुद लोंबणारा असतो.
फायब्रोमास – स्वरयंत्रातील श्‍लेष्मल त्वचेपासून हे अर्बुद निघून लोंबकळत राहतात. त्यामुळे स्वरामध्ये बदल होतो किंवा स्वराचा नाश होतो. कधी कधी यामुळे गिळताना त्रास होतो. हे अर्बुद सहसा एकाच स्वरतंत्रिकेला दुष्ट करतात. स्वरयंत्र घातकार्बुद हा ४० वर्षे वयानंतरच्या प्रौढांमध्ये विशेषतः पुरुषांमध्ये आढळतो. हा विकार अनुवंशिक आहे.
मांसतान – कंठामध्ये प्रतानयुक्त असा जो शोथ असतो त्याला मांसतान म्हणतात. हा हळुहळू वाढतो व तो जसा जसा वाढत जातो तसा तसा कंठाचा अधिकाधिक अवरोध होतो. त्यामुळे कंठावरोधाने उत्पन्न होणारी लक्षणे यात दिसतात. हा शोथ लोंबणारा असतो. तो प्राणहरण करणारा आहे. कारण श्‍वासमार्गाचा अवरोध झाल्याने प्राणहरण होतो. यामध्ये पाक झाल्यास कष्टसाध्य आहे.
विदारी – गळ्याच्या आतल्या बाजूने पित्तामुळे दाह व तोद यांनी युक्त व आरक्त वर्णाचा जो शोथ उत्पन्न होतो त्यास विदारी म्हणतात. त्या कुशीवर रोगी जास्त झोपतो त्या बाजूस हा रोग सामान्यतः होतो. त्यामध्ये पाक होतो व तद्नंतर गळ्यातील मांसाचे दारण होते. पाकास दुर्गंधी येते.
गलार्बुद – जिव्हा गुलाबी व कंठाचे सुरवातीस स्थिर रक्तवर्ण, वेदनारहित व अपाकी असा शोथ उत्पन्न होतो त्यास गलार्बुद म्हणतात. हा शोथ तिनही दोषाच्या दुष्टीमुळे होतो.
आधुनिक शास्त्रानुसार अशाप्रकारे आढळणार्‍या विद्रधी, अर्बुद व शोथाला स्वरयंत्राचा कॅन्सर म्हणतात.
प्रमुख कारणे –
– धूम्रपानाची सवय.
– अतिप्रमाणात मद्यपान.
– आवाजावर सतत पडणारा ताण.
– लाकडाचा भुसा किंवा रासायनिक वाफमिश्रित हवेशी सतत संपर्क
प्रमुख लक्षणे –
* आवाजातील घोगरेपणा (३ आठवड्यांपेक्षा जास्त)
* सतत खोकला
* श्‍वास घेताना त्रास व वेदना होणे.
* रक्तमिश्रित लालास्रव
* सतत कान दुखणे
* अतिउष्ण किंवा अतिशीत पदार्थांची असहिष्णुता.
* अन्न गिळताना ठसका लागणे
* स्वरयंत्रावर पुळीसारखी वाढ होणे
* वेदना सहसा एका बाजूला होतात व गिळताना वेदना वाढून कानापर्यंत व मानेपर्यंत पसरतात.
* गळ्यामध्ये वारंवार अडकल्यासारखे वाटणे.
कसे कराल निदान? –
स्वरयंत्राच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी व्हिडिओ लॅरिंगो स्ट्रोबोस्कोपी केली जाते. त्याद्वारे संपूर्ण स्वरयंत्र बघितलं जातं. स्कोपीदरम्यान रुग्णाला ‘ई’ म्हणण्यास सांगितलं जातं. जेणेकरून स्वरतारांची हालचाल, स्वरतारांवरील कंपनं आणि स्वरलहरींचं निरीक्षण करून त्यामध्ये होणारे, झालेले बदल नोंदवले जातात. स्वरतारांवरील/स्वरयंत्रावरील गाठ ही कॅन्सरची असल्यास वरील तिन्ही गोष्टींवर त्याचा विशिष्ट परिणाम आणि होणारा बदल दिसून येतो.
निराकरण प्रक्रिया –
प्रथम निदान प्रक्रियेमध्ये जर विशिष्ट बदल दिसून आले तर त्याचं योग्य निराकरण करण्यासाठी गाठीचा छोटा तुकडा काढून तो तपासणीसाठी पाठवला जातो. तपासणीनंतर तो तुकडा कर्करोगाचा आहे की नाही याची पुष्टी करता येते. ती गाठ कर्करोगाची असल्यास मान आणि गळ्यामध्ये असणार्‍या इतर ग्रंथीचीदेखील तपासणी करून कर्करोगाची वाढ किती मोठी आहे याचा अंदाज घेतला जातो.
एक्स-रे, सी.टी.स्कॅन, एम्.आर्.आय्.मधून देखील गाठीचा आकार आणि वाढ स्पष्टपणे दिसून येण्यास मदत होते. या सर्व निदानाच्या प्रक्रियेनंतर तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो आणि त्यानुसार त्यावर करण्यात येणारे उपाय निश्‍चित केले जातात.
स्वरयंत्राच्या गाठीचा आकार, कर्करोग जवळच्या ग्रंथींमध्ये पसरलेला आहे की नाही, कर्करोग शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरलेला आहे की नाही या गोष्टींनुसार कर्करोगाची श्रेणी ठरवली जाते.
स्वरयंत्राच्या कॅन्सरवरील उपचार पद्धती –
आधुनिक शास्त्रानुसार स्वरयंत्र समस्यांमध्ये स्वरयंत्राला विश्रांती व आर्द्र वातावरणाची आवश्यकता असते.
* स्वरयंत्रगत शस्त्रकर्म – प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने शस्त्रकर्म केले जाते.
* रेडिओथेरपी – याचाही स्वरयंत्राच्या विकारामध्ये उपयोग करतात.
* एक्स-रे उपचार – स्वरयंत्रागत अर्बुदामध्ये याचा उपयोग होतो. शिवाय याचा उपयोग शस्त्रकर्माशिवाय किंवा शस्त्रकर्मानंतर करता येतो.
* डायथर्मी – स्वरयंत्रातील सूक्ष्म ग्रंथी किंवा अर्बुदाचे दहन करण्यासाठी डायथर्मीचा उपयोग करतात.
* स्वरयंत्रामध्ये प्रत्यक्षतः औषधी द्रव्य लावण्यात येते. याकरिता द्रव द्रव्ये अथवा चूर्ण वापरतात. द्रव द्रव्ये वापरावयाची असल्यास विशिष्ट प्रकारची सिरींज वापरावी. चूर्णाकरिता आध्मापन यंत्राचा उपयोग करावा,
* किमोथेरपी – या प्रकारच्या कॅन्सरमध्ये किमोथेरपीचाही उपयोग केला जातो. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे रक्तमोक्षण, तीक्ष्ण नस्य, काढा यांचा उपयोग करावा.
* दारुहळद, कडुनिंब, रसांजन व इंद्रयन यांचा किंवा हरितकीचा काढा मध घालून द्यावा. (वातनाशक)
* कण्ठरोगहर क्वाथ – कुटकी, अतिविष, देवदारु, पाठा, नागरमोथा, इन्द्रजव यांचा गोमूत्रात काढा प्यावा (पित्तनाशक).
* कालक चूर्ण – ग्रहधूम, जवखार, पाठा, त्रिकटू, रसांजन, तेजवल, त्रिफला, लोहभस्म समभाग मधामध्ये मुखात धारण करावे. त्यामुळे दन्त, जिव्हा व मुखरोग नष्ट होतात.
* मृद्विकादिचूर्ण द्राक्षे, कुटकी, सुंठ, मिरे, पिंपळी, दारुहळद, रसांजन, दूर्वा, तेजबल यांचे एकत्र चूर्ण मध घालून द्यावे. कण्ठरोगावरील महत्त्वाचे औषध आहे.
* पिप्पलादि चूर्ण – छोटी पिंपळी, पिंपळीमूळ, चवक, चित्रक, सुंठ, सज्जेखार, जवखार यांचे समभाग चूर्ण मुखामध्ये धारण केल्याने गलरोग नष्ट होतात.
* पीतक चूर्ण – मनःभिला, यवखार, हरताळ, सैंधव, दारुहळद समभाग चूर्णामध्ये मध मिसळावे. यामध्ये घृत मिसळून मुखामध्ये धारण केल्याने कण्ठरोग नष्ट होतात.
* मेदा, त्रिकटू, दारुहळद, शतावरी, रसांजन, यवखार, पहाडमूळ, तेजबल व निंब यांचा कांजी व गोमूत्रात काढा करून कवल धारण करावे. तसेच या चूर्णाच्या गोळ्या करून प्रतिसारण करावे.
* दशमूल क्वाथादि – दशमूल क्वाथ किंवा भूपक मुळ्याचा काढा किंवा कुलत्थ यूष कोष्ण सेवन करावे. दोषाचा विचार करून दूध, उसाचा रस, गोमूत्र, दही, मस्तु, अम्लरस, कांजी, तेल, घृत, यापैकी एकाने गण्डूष करावा.
* क्षारगुडिका – पंचकोष, तालीसपत्र, छोटी वेलची, काळी मिरे, दालचिनी, पलाशक्षार, यवक्षार, जवखार, समभाग चूर्ण घेऊन दुप्पट गुळाच्या पाकामध्ये घालून बोलाएवढ्या गोळ्या कराव्या. या ७ दिवसांपर्यंत यवक्षारामध्ये ठेवून मुखामध्ये धारण कराव्या. कण्ठरोगात अमृतासमान लाभदायी आहे.
स्वरयंत्राच्या कॅन्सरमध्ये चिकित्सा करताना रुग्णाच्या सार्वदेहिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी. तसेच आवाज घोगरा झाल्यास तो प्राकृत होईल अशी चिकित्सा करावी. धूम्रपान, मद्यपान निषिद्ध आहे. कारण त्यामुळे गलभागाचा क्षोभ होतो. त्याचप्रमाणे धुलीयुक्त वातावरण किंवा अतिशीत/उष्ण वातावरणाचा संपर्क टाळावा. बरेचदा स्वरयंत्राला विश्रांती मिळण्याकरिता रुग्णाला बोलण्याचे टाळावयास सांगावे.