शरीफ पर्वाची अखेर

0
116

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ‘पनामा पेपर्स’ प्रकरणी तेथील सर्वोच्च न्यायालयाने आजीवन अपात्र ठरवल्याने काल त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांचे हुसेन आणि हसन हे दोघे मुलगे आणि त्यांची राजकीय वारसदार मानली जाणारी मुलगी मरियम यांच्यावरही या भ्रष्टाचार प्रकरणी खटले भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शरीफ यांच्याविरुद्धच्या या निवाड्यामुळे त्यांना तिसर्‍यांदा आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. मागील वेळी परवेझ मुशर्रफ यांनी लष्करी बंड करून त्यांना सत्तेवरून पायउतार करून विदेशात आश्रय घ्यायला भाग पाडले होते. पण २०१३ च्या निवडणुकीत शरीफ पुन्हा पाकिस्तानच्या राजकीय क्षितिजावर उदय पावले आणि पंतप्रधान बनले. आता पाकिस्तानची पुढील निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे, परंतु आजीवन अपात्रता उठवली न गेल्यास शरीफ पुन्हा निवडणुकीत उतरू शकणार नाहीत. तसे झाले तर ती त्यांच्या राजकीय कारकिर्दीची अखेर ठरेल. अर्थात, सध्या पाकिस्तानच्या मजलीस इ शूरामध्ये म्हणजे तेथील संसदेत त्यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पक्षाचे ३४२ पैकी २०९ असे प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे स्वतः पायउतार झाले तरीही शरीफ यांचा आपला उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार अबाधित आहे. न्यायालयाने निवाड्यात त्यांना लोकशाही प्रक्रिया सुरू राहील यासाठी पावले उचलण्यासही फर्मावलेले आहे, आता शरीफ जरी पंतप्रधानपदावरून पायउतार झाले असले तरी त्यांचाच उत्तराधिकारी पाकिस्तानची आणखी वर्षभर तरी धुरा वाहणार आहे. पनामा देशातील मोसाक फोन्सेका या कायदेशीर सल्ला देणार्‍या फर्मची साडे अकरा दशलक्ष कागदपत्रे उघड झाली आणि जेव्हा ७६ देशांतल्या १०० हून अधिक प्रसारमाध्यमांतील कसलेल्या पत्रकारांनी त्यांचे विश्लेषण करून विदेशांत काळा पैसा दडवणार्‍यांचा शोध चालवला, तेव्हा त्यातून देशोदेशीच्या असंख्य भ्रष्टासुरांचे बिंग फुटले. आयर्लंड, युक्रेन, ब्रिटन, चीन आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांपर्यंत गैरधंद्यांचे धागेदोरे पोहोचले. देशोदेशीचे धनाढ्य व्यावसायिक गोत्यात आले. परंतु पाकिस्तानात पंतप्रधानांना आरोपीच्या पिंजर्‍यात तेथील न्यायपालिकेेने उभे केले. यापूर्वीचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनाही राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारींविरुद्धच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुन्हा उघडण्याच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने अपात्र केले होते. पाकिस्तानातील न्यायालये १८४ (३) कलमाचा वापर करून कोणालाही अपात्र ठरवू शकतात असे सांगत मरियम शरीफ यांनी संसदेतच घटनादुरुस्ती करून न्यायालयाचे हे अमर्याद अधिकार काढून घेण्याचे सूतोवाच काल आपल्या प्रतिक्रियेत केले आहे. पण न्यायालयाच्या संयुक्त तपास समितीच्या अहवालात शरीफ व कुटुंबियांच्या मालकीच्या कंपन्यांचे व्यवहार, त्यांनी लंडनच्या पार्क लेन मध्ये खरेदी केलेली मालमत्ता वगैरे बाबी उघड झाल्याने हा एकमुखी निवाडा आलेला आहे. पाकिस्तानच्या घटनेनुसार नवाज शरीफ सादिक (सत्यनिष्ठ) नाहीत आणि अमीन (प्रामाणिक) ही नाहीत असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. शरीफ यांनी आपल्या ताज्या कारकिर्दीतही अनेक संकटांचा सामना केला. इम्रान खान आणि ताहिरुल काद्रीने शरीफ यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी प्रचंड मोठे मोर्चे काढले होते. दहशतवाद्यांनीही पेशावरसारखे भीषण हल्ले चढवून शरीफ यांना आव्हान दिले. पण त्यांनी देशात उत्पात घडवणार्‍यांना कठोरपणे हाताळले. चीन पाकिस्तान मैत्रीलाही त्यांच्या काळात बहर आला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये काम पुढे रेटण्यात आले. भारताशी मैत्रीचा देखावा करून विश्वासघाताची परंपराही त्यांनी पाळली. शरीफ यांच्या साळसूद चेहर्‍याआडच्या बदमाशीचे हे पर्व आता जवळजवळ संपले आहे.