चेतना ट्रस्ट ः विशेष मुलांसाठी

0
109

– अनुराधा गानू

दूरदूरच्या दुर्गम भागातून मुलं शाळेपर्यंत येणार कशी… ही समस्या होती. सरकारनं बालरथ देणं बंद केल्यामुळे संस्थेने स्वतःच्या गाड्या घेतल्या व मुलांना घरून शाळेत आणण्याची व परत घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे ही मुलं चेतना ट्रस्टच्या शाळेत सुरक्षित असतील व त्यांना प्रशिक्षित शिक्षकांकडून चांगलं शिक्षण मिळेल आणि पालकांच्या मनावरील ताण कमी होईल हे आश्‍वासन चेतना ट्रस्टने त्यांना दिलं.

संकल्प थिएटर सांस्कृतिक संस्था. कुडचडे येथील समविचारी व कलाप्रेमी लोकांनी येऊन १९९८ साली स्थापन केली. श्री. नंदेश वस्त यांच्या विचारसरणीतून ही कल्पना पुढे आली व त्याच विचारसरणीच्या कलाप्रेमी असलेल्या त्यांच्या मित्रांनी ही कल्पना सत्यस्वरूपात आणली. आजच्या तरुण मुलांचा अनेक विविध क्षेत्रात विकास व्हावा या दृष्टीने या संस्थेची पावलं उचलली गेलीत. गेली १८ वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करून या संस्थेने समाजाप्रती आपले लक्षणीय असे योगदान दिले आहे. कला, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, खेळ, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवलेला आहे.
२०१६ मध्ये या संस्थेने १२ दिवसांचा एक कोकणी नाट्यमहोत्सव आयोजित केला होता. अतिशय मानाच्या अशा मानल्या जाणार्‍या गोवा आणि अखिल भारतीय स्तरावर नाटकांच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसंही मिळवलीत. आपल्या नाटकाचे गोव्यामध्ये अनेक ठिकाणी प्रयोग करून निधी जमा केला आणि त्याचा उपयोग समाजकार्यासाठी केला हे उल्लेखनीय आहे. गेली अठरा वर्षे सातत्याने या संस्थेमार्फत आरोग्य शिबीरे व रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. दानाच्या प्रकारात रक्तदान महत्त्वाचे! कारण रक्ताशिवाय मनुष्य जगूच शकणार नाही. गेली १८ वर्षे रुग्णांना रुग्णवाहिका पुरविण्याचे कामही या संस्थेने सातत्याने केले आहे. आरोग्यसेवा पुरवण्याचे कामही तितकेच महान. माणसाचे आरोग्य चांगले असेल तर त्याच्या हातून चांगली कामं घडू शकतात. माणसांचं आरोग्य चांगलं असेल तर सबंध समाज आणि मग गाव, राज्यही सुदृढ बनेल आणि मग राष्ट्रही निरोगी बनायला वेळ लागणार नाही. पण संकल्पसारख्या विचारसरणीची माणसं मात्र समाजात असायला हवीत. कुडचडे येथील आरोग्य केंद्राच्या पुरुष वॉर्डाचे कामही यांनी हातात घेतले आहे.
फक्त आरोग्यक्षेत्रातच ही संस्था कार्यरत आहे असे नव्हे तर इतर सामाजिक क्षेत्रांत सुद्धा कार्यरत आहे. समाजातले अनेक मुलांचे पैलू ओळखून त्या त्या क्षेत्रात ही मुले पुढे यावीत असा त्यांचा प्रयत्न आहे. गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत करत असताना, कला क्षेत्रात नाटकं व एकांकिका स्पर्धेचे तसेच गायन स्पर्धेचे व क्रीडा-स्पर्धेचे महाविद्यालयीन स्तरावर आयोजन ही संस्था करत आहे. त्यासाठी संस्थेतर्फे शिबीरे आयोजित केली जातात. मुलं आणि शाळांना पुरस्काराने सन्मानित केलं जातं.
समाजासाठी आणखी एक मोठे पाऊल या संस्थेने उचलले आहे ते म्हणजे शारीरिकदृष्ट्या अपंग आणि विशेष मुलं (मतिमंद मुलं) यांच्या मदतीसाठी २००९ साली ‘‘चेतना ट्रस्ट’’ची स्थापना केली. मी त्यांचे सध्याचे चेअरमन नंदेश वस्त यांनी जेव्हा विचारलं की या विशेष मुलांसाठी काही करावं असं तुम्हाला का वाटलं?.. तेव्हा ते म्हणाले की ‘‘कोंकणी महोत्सवामध्ये संजय स्कूलच्या डान्सचा कार्यक्रम होता. त्यांनी तो कार्यक्रम अतिशय सुंदर रीत्या सादर केला. तेव्हा आम्हाला असं वाटलं की अशा मुलांना जर चांगलं शिक्षण मिळालं तर ती सुधारू शकतात. मग आपण अशा मुलांसाठी काहीतरी करायला हवं. वाटलं आणि आम्ही कामाला लागलो. सावर्डे, सांगे, केपे या भागातही अशी मुलं असतील. अशा मुलांना ‘‘संजय स्कूल’’मध्ये पाठवणे हे एकतर अंतराच्या दृष्टीनेही खूप लांब आणि खर्चिकसुद्धा. अशी मुलं मग घरातच बसून राहतात. पुष्कळ वेळा आपलं मूल मतिमंद आहे हे मुळी पालकांच्या लवकर लक्षात येत नाही. काही वेळा काही पालकांना असंही वाटतं की या मुलांना शिकवून ती सुधारतील कां? ही मुलं सामान्य आयुष्य जगू शकतील कां? मग यांना बाहेर पाठवण्यापेक्षा घरातच ठेवलेलं बरं. मग या भागातील अशा मुलांसाठी या भागातच काहीतरी करावं असं ठरलं.’’
ही मुलं तुमच्याकडे कशी आलीत… यावर ते म्हणाले, ‘‘आम्ही काही मुली या विषयातलं शिक्षण देऊन तयार केल्या. या मुली, सावर्डे, सांगे, केपे तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका आणि पंचायत सदस्य यांनी या भागातील दुर्गम गावातील घरोघरी फिरून अशी मुलं शोधून काढली. या मुलांना चांगलं शिक्षण, व्यावसायिक शिक्षण मिळालं, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, त्यासाठी त्यांना सर्व प्रकारची मदत केली तर या मुलांचं भविष्यही उज्ज्वल असेल. ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतील. समाजामध्ये निश्‍चितपणे सन्मानाने, आत्मविश्‍वासाने वावरू शकतील… असा आत्मविश्‍वास आणि खात्री आम्ही या मुलांच्या पालकांना दिली आणि ‘‘चेतना ट्रस्ट’’च्या शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
पण दूरदूरच्या दुर्गम भागातून मुलं शाळेपर्यंत येणार कशी… ही समस्या होती. सरकारनं बालरथ देणं बंद केल्यामुळे संस्थेने स्वतःच्या गाड्या घेतल्या व मुलांना घरून शाळेत आणण्याची व परत घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे ही मुलं चेतना ट्रस्टच्या शाळेत सुरक्षित असतील व त्यांना प्रशिक्षित शिक्षकांकडून चांगलं शिक्षण मिळेल आणि पालकांच्या मनावरील ताण कमी होईल हे आश्‍वासन चेतना ट्रस्टने त्यांना दिलं. अशा तर्‍हेने २००९ मध्ये शारीरिक व्यंग असलेली आणि मतिमंद असलेल्या अशा ३४ मुलांना घेऊन चेतना ट्रस्टने शाळा सुरू केली. आज त्या मुलांची संख्या ७८ झालीय. त्यांच्यासाठी सर्व सोयींनी युक्त आणि स्वप्न स्वयंपाकघर आहे. तिथे त्यांच्यासाठी वेगळा सात्त्विक आहार बनवला जातो. माध्यान्ह आहार मुलं तिथेच घेतात. जेवतातही तिथेच आणि तेही अतिशय स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात! या मुलांना तिथे स्वयंपाकघरातील कामं शिकवली जातात. टेबल मॅनर्स शिकवले जातात. जेवणा-खाण्याच्या चांगल्या सवयीही शिकवल्या जातात.
त्यांना पेंटींग, चित्रकला, नृत्य, गाणी सर्व गोष्टी शिकवल्या जातात. मुलं सबंध दिवस त्यामध्ये आवडीने रमून जातात. त्यांच्या अनुभवाप्रमाणे म्युझिक थेरपी जास्त परिणामकारक आहे. कला आणि हस्तकलेच्या तज्ज्ञ शिक्षकांकडून मुलांना व्यावसायिक शिक्षण दिले जाते. मेणबत्त्या बनवणे, पतंग तयार करणे, पाकीटे, राख्या तयार करणे, आकाशदिवे, फुले बनवणे इ. गोष्टी तिथे शिकवल्या जातात. मुले त्या वस्तू तयार करतात. या वस्तूंच्या विक्री-व्यवस्थेचं काम शाळा करते. विक्रीतून येणारे पैसे त्या मुलांनाच दिले जातात. मुलांनी स्वावलंबी होण्यासाठी व त्याच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी काही ठिकाणी स्टॉल्स उभारून शिक्षकांच्या मदतीने ही मुलं वस्तूंची विक्रीही करतात.
याशिवाय तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुलांची तपासणी नियमितपणे केली जाते. त्यांचं समुपदेशनही केले जाते. याशिवाय ट्रस्टतर्फे सुपर स्पेश्यालिटी हेल्थ कँप – जसे नवीनच प्रगत झालेली स्टेम सेल थेरपी, ऑर्थोसिस अशा शिबिरांचे आयोजन केले जाते. पालकांसाठी समुपदेशन शिबिरे घेतली जातात. त्यामुळे मुलं घरी गेल्यावरसुद्धा शाळेत शिकवलेल्या गोष्टींचा सराव घरी पालक घेऊ शकतात. त्यामुळे या मुलांची प्रगती, विकास लवकर होण्यास मदत होते.
सध्या ही शाळा भाड्याच्या घरांत सुरू आहे. ७-८ मुलं अपंग होती. त्यातील दोन मुलं चालू लागली आहेत. २ मुलं मुकी-बहिरी आहेत व बाकीची मुलं मतिमंद आहेत. सध्या ड्रायव्हर व कर्मचार्‍यांचा आणि शिक्षकांचा पगार, माध्यान्ह आहार, गणवेश हा सगळा खर्च दिलेल्या देणग्यांमधून भागतो आहे. सरकारी नियमांमुळे २१ वर्षांवरील मुलांसाठी सरकारकडून काहीही मदत मिळत नाही. इतर गोष्टींसाठी सरकारी मदत मिळते पण ती फारच अपुरी आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. अजून खूपकाही या मुलांसाठी करायचं आहे. अशा मुलांच्या पालकांच्या चेहर्‍यावर हसू बघायचं आहे. ही मुलं स्वावलंबी होऊन सन्मानाने जगताना बघायचे आहे. यासाठी अर्थातच संस्थेचे सध्याचे चेअरमन श्री. वस्त आणि त्यांचे सहकारी, कार्यकारिणीचे सदस्य अविरत प्रयत्न करत आहेत. शिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून २२ लोकांचे हात याच कामात गुंतलेले आहेत. पण तरीही हे शिवधनुष्य पेलण्यासाठी हात अपुरे पडताहेत. शिवाय आर्थिक सहाय्याची गरज पण मोठी आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो? एक तर पूर्ण बिल्डिंगचा खर्च किंवा एखाद्या मजल्याचा खर्च, एखाद्या खोलीचा खर्च आपण करू शकतो. नाहीतर एक स्क्वेअर मीटरचा निदानपक्षी एक स्क्वेअर फूटाचा तरी कर्च करू शकतो किंवा रोख आर्थिक मदतही करू शकतो. आपण दिलेल्या देणगीच्या रकमेवर ८० जी कलमाखालीआयकर सूट मिळते हे लक्षात ठेवा. एकदा का या इमारतीचे काम पूर्ण झाले की या मुलांसाठीच वसतूीगृह सुरू करण्याचा चेतना ट्रस्टचा विचार आहे.
चला तर मग, आता वेळ घालवू नका. या मुलांच्या डोळ्यांतलं स्वप्न साकार करण्यासाठी, त्यांच्या चेहर्‍यावर हसू बघण्यासाठी आणि या मुलांना समाजात मानानं जगताना बघण्यासाठी चेतना ट्रस्टच्या हातात हात मिळवून कामाला लागू या. चलताय ना!
अधिक माहितीसाछी संपर्क – नंदेश वस्त – ९४२२०५७३८३; राजू नाईक – ८००७७३८००७; सतीश लोटलीकर – ९४२३०६०२५१
व सुनील नाईक – ९८२२८१७१३६.