कर्मयोगी लोकमान्यांचे पुण्यस्मरण

0
188

– डॉ. गोविंद काळे

देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी म्हणून तरी टिळकांच्या कर्मयोगशास्त्राकडे भारतियांची नजर वळावी.
‘तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजळून देऊ दिशा दाही दाही’.

समाजाचा आणि राष्ट्राचा संसार सोडाच आपला व्यक्ति गत संसार सुखाचा होणे कठीण झाले आहे. अशा वेळी टिळकांचे गीतारहस्य हाती घेतले तर बिघडले कुठे? घरी असलेल्या कामधेनूचा परिचय नसल्यामुळे शेजार्‍याकडे जाऊन ताक मागण्याची पाळी आपल्यावर आली आहे.

दैनिक केसरीचे मुख्यालय असलेल्या टिळकवाड्यातील लोकमान्य संग्रहालयाला भेट देण्याचा योग आला तेव्हा श्रीमद् भगवद्गीतेतील..

कर्मणि एव अधिकारः ते मा फलेषु कदाचन
मा कर्मफलहेतुर्भूमा ते संगोऽस्त्व कर्मणि ॥

हा श्लोक ठसठशीतपणे लोकमान्यांच्या तैलचित्रावरील मोकळ्या जागेत लावण्यात आला आहे. लोकमान्यांचे नाव घेताक्षणी अथवा मनात येताक्षणीच भगवद्गीता – कर्मयोग आणि विशेषतः ‘कर्मणि एव अधिकारः ते’ हा गीतोपदेश आठवणे सहज अपेक्षित आहे. लोकमान्यांचे संपूर्ण आयुष्य निखळ कर्म करण्यातच गेले. जीवनाच्या अनेक क्षेत्रात अद्वितीय कर्म करूनही ‘न मे कर्मफले स्पृहा’ हेच तत्त्वज्ञान त्यांनी बुद्धीपूर्वक स्वीकारले. नाही म्हणायला देशाला स्वातंत्र्य मिळो हे स्वप्न त्यांनी पाहिले आणि स्वप्नपूर्तीसाठी देह झिजवला.परदास्याच्या शृंखला तोडून मातृभूमी मुक्त व्हावी या अत्युच्च विचजाराला स्पृहा म्हणणे कितपत् योग्य ठरावे? टिळक म्हणजे कर्मयोगी याची प्रखर जाणीव टिळक चरित्र अभ्यासकाला पदोपदी येते. मंडालेच्या कारागृहात लोकमान्यांनी गीतेवरील टीका समजला जाणारा ‘श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ लिहिला.

तस्माद् असक्तः सततं कार्यं समाचर
असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः ॥ ३.१९

श्रीमद्भगवद्गीतेचा अर्थ कर्मयोगपर लावण्यात लोकमान्यांची प्रचंड बुद्धीत्ता दिसून येते. ज्ञान – संन्यास – भक्ति आणि कर्म यांच्या मिलापातून कर्मयोगाचीच निवड मनुष्यमात्राने करावी असे आग्रही प्रतिपादन केले. परखड बुद्धीवादी विवेचन हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य मानण्यात येते. गीतेवरील अन्य टीकाकारांच्या परिणत प्रज्ञेचा आदर करून हे मुक्त स्वातंत्र्य टिळकांनी घेतले. म्हणूनच तर त्यांना अत्यादराने कर्मयोगी म्हणून संबोधावे लागते. केवळ गीतेचा अर्थ कर्मयोगपर लावला म्हणून नव्हे तर टिळकांचे संपूर्ण आयुष्य बारकाईने पाहिले, ग्रंथातून वाचले तर याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. ग्रंथ प्रस्तावनेत लोकमान्य टिळक म्हणतात…
‘‘केल्याविण कांही होत नाही’’ हा सृष्टीचा नियम लक्षात आणून तुम्ही मात्र निष्काम बुद्धीने कर्ते व्हा म्हणजे झाले. निव्वळ स्वार्थपरायण बुद्धीने संसार करून थकल्या भागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनही गीता सांगितलेली नसून संसारच मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारातले खरे कर्तव्य काय याचा तात्त्विकदृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ती झालेली आहे.’’ संन्यास व कर्मयोग या दोन्ही मोक्षमार्गाचा विचार करता टिळकांच्या लेखी कर्मयोगाची योग्यता विशेष आहे. हातून घडणारे कोणतेही कृत्य म्हणजे कर्मच असते म्हणून काही तो कर्मयोग ठरत नाही. महर्षी व्यासांनी श्रीमद्भागवत महापुराणामध्ये… ‘‘निद्रया हिृयते नक्तं दिवा च व्यर्थकर्मभिः’’ असे म्हटले आहे. रात्र झोपेत घालविली आणि दिवस व्यर्थ कर्म करण्यात घालविला. व्यर्थ म्हणजे अर्थहीन. अर्थहीन कर्माला कर्मयोग कसे म्हणावे. लोकमान्य टिळक एके ठिकाणी म्हणतात ‘‘वसुधैव कुटुंबकम्’ या न्यायाने पृथ्वीवरील सर्व देशातील लोकांबद्दल, त्यांच्या धर्मविचाराबद्दल अथवा आचाराबद्दल समताबुद्धी कायम ठेवून, त्यांचे कल्याण व्हावे, अथवा त्यांनी उर्जित दशेस यावे अशी मनापासून इच्छा बाळगून त्याकरिता आपल्या हातून होईल तेवढा उद्योग करणे हे सत्वशील विद्वानाचे लक्षण आहे.हा उद्योग म्हणजे टिळकांना अभिप्रेत असलेला कर्मयोगच मानावा लागेल. कर्मयोग म्हणजे ज्ञानमूृलक भक्तिप्रधान विहितकार्य. कर्मयोग म्हणजे केवळ कर्म असा लाक्षणिक अर्थ घेऊन चालणार नाही.
लोकमान्य टिळकांनी कर्मयोग हाच गीतेचा प्रतिपाद्य विषय असल्याचे निक्षून सांगितले आहे. पूर्वसूरींच्या मताचा आदर करून कर्मयोग सिद्धांत अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने मांडून मोठे कार्य केले आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव एवढा झाला आहे की गीता म्हणजे कर्मयोगसिद्धांत हाच अर्थ दृढमूल झाला आहे. श्रीमद् भगवद्गीतेची थोरवी व्यक्त करताना टिळक गीतारहस्यात लिहितात –
‘‘श्रीमद्भगवद्गीता हा आमच्या धर्मग्रंथापैकी एक अत्यंत तेजस्वी व निर्मल हिरा आहे. पिंडब्रह्मांड ज्ञानपूर्वक आत्मविद्येची गूढ व पवित्र तत्त्वे थोडक्यात पण असंदिग्ध रीतीने सांगून त्यांच्या आधारे मनुष्यमात्रास आपल्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची म्हणजे परम पुरुषार्थाची ओळख करून देणारा आणि त्याबरोबरच भक्तीची ज्ञानाशी व अखेर त्या दोघांचीही शास्त्रतः प्राप्त होणार्‍या व्यवहाराशी सोपपत्रिक व सुंदर जोड घालून संसारात भांबावून गेलेल्या मनास शांत आणि विशेषतः निष्काम कर्तव्याचरणास प्रवृत्त करणारा, यासारखा दुसरा बालबोध ग्रंथ संस्कृतातच काय, पण जगातील इतर वाङ्‌मयातही सापडणे दुर्मिळ होय.’’
किंकर्तव्यमूढता काय एकट्या अर्जुनालाच आली होती? हे करू का ते करू अशी साशंकता तर मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकाच्याच वाट्याला हरक्षणी येते. किंकर्तव्यमूढतेच्या मागे मोह असतो, माया असते. आपपर भाव असतो. हे माझे गुरू आहेत, हे सारे नातेवाईक आहेत त्यांचा वध करून मी काय बरे साध्य करणार? ‘‘स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव’’. स्वजनांचा वध करून मला कोणते सुख मिळणार. मी कसा बरे सुखी होणार? ‘विसृज्य सशरं चाप शोकसंविग्नमानसः’ अर्जुन शोकयुक्त झाला. गांडिव धनुष्य टाकून रथामध्ये बसून राहिला. म्हणूनच तर गीतेच्या पहिल्या अध्यायाचे नाव ‘अर्जुनविषाद योग’ असे आहे. अर्जुनाला विषाद झाला नसता तर गीतेचा जन्म झाला असता कां? भगवंतांनी अर्जुनाला जो ‘ततो युद्धाय युज्यस्व’ हाच कर्मयोग सांगितला. कर्तव्य सांगण्यासाठी गीता आहे. महाभारतीय युद्धामध्ये लक्षावधी सैनिकांच्या मधोमध भगवंतांनी अर्जुनाचा रथ उभा केला आहे आणि गलितगात्र झालेल्या अर्जुनाला कर्मयोगाचे दिव्य बोधामृत पाजले आहे. ‘करिष्ये वचनं तव’ असे म्हणून अर्जुन भगवंतांना शरण गेला आहे. ‘शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्’’. मला निश्चित काय ते सांग. आपण सारेच आजच्या घडीला अर्जुन आहोत. ‘भ्रमतीव च मे मनः’ आपले मन पण भ्रमित झाले आहे. अशा वेळी आपले सारथ्य करणारा कृष्ण आपल्याला मात्र भेटत नाही. विहित कर्म करावेच लागते. त्यापासून मुक्ती नाही. युद्ध काय शस्त्रास्त्रांचेच असत नाही. तुकोबांच्या भाषेत ‘‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग/अंतर्बाह्य जग आणि मन’’. संसारातील आपणच आपल्यालाही कराव्या लागणार्‍या नित्य युद्धावर उपाय कोणता नि औषध कसले? म्हणूनच अर्जुनाचे निमित्त करून साक्षात् भगवंताच्या मुखातून अवतरलेली गीता आणि त्यातील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे. आजही गीतेची आवश्यकता आहेच आहे.
बेताल वागणार्‍या, प्रसंगी आत्मनाश करून घेणार्‍या तरुणाईला सावरायचे कसे? हातपाय गळाटून बसलेल्या तरुणाईला मानसिक धक्क्यातून कसे बाहेर काढायचे? यासाठी तरी गीतेचा अल्प-स्वल्प अभ्यास होणे आवश्यक बनले आहे. समाजाचा आणि राष्ट्राचा संसार सोडाच आपला व्यक्तिगत संसार सुखाचा होणे कठीण झाले आहे. अशा वेळी टिळकांचे गीतारहस्य हाती घेतले तर बिघडले कुठे? घरी असलेल्या कामधेनूचा परिचय नसल्यामुळे शेजार्‍याकडे जाऊन ताक मागण्याची पाळी आपल्यावर आली आहे. ‘यथेच्छसि तथा कुरु’ हे स्वातंत्र्य तर गीतेत दिलेले आहेच. त्यातील इच्छा म्हणजे योग्य. योग्य शब्द महत्त्वाचा. सामान्याला योग्यायोग्य कळत नाही. कळले तर वळत नाही. अशावेळी लोकमान्यांचे कर्मयोगशास्त्र हाती घ्यावे. फारच विद्वत्‌जड वाटले अथवा समजायला कठीण वाटले तर विनोबांची गीताप्रवचने आहेतच. गीतारहस्य आणि गीताप्रवचने दोघाही ग्रंथांचा जन्म कारागृहातच झाला आहे. साने गुरुजी होते म्हणून विनोबाजींची तुरुंगातील प्रवचने लिखित झाली आणि आपल्यापर्यंत पोहोचली. हे सारे अक्षर वाङ्‌मय आहे. कालातीत. विनाश न पावणारे. क्षराचा हव्यास धरणार्‍यांना अक्षराची महती कशी कळणार? अर्जुन भगवंताला शरण गेला म्हणून श्रेयस काय आहे ते त्याला समजले. आजच्या काळात शरण जाण्याची भाषा कोण बोलतच नाही. जग कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ‘न कश्चित् श्रुणोति माम्’ ही खंत तर महर्षी व्यासांनीही व्यक्त केली होती.
‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’’ ही लोकमान्यांची घोषणा सर्वपरिचित आहे. परंतु किंकर्तव्यमूढ जनतेला अचूक मार्ग दाखविणारे कर्मवीर आणि राष्ट्रसूत्रधार हा त्यांचा परिचय ‘श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ या ग्रंथातून दृढ होतो. टिळकांची ही कामगिरी अद्वितीयच ठरली आहे. जगद्विख्यात मान्यवरांनी टिळकांना स्तुतीसुमनांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यामध्ये सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, बाबू अरविंद घोष, सरोजिनी नायडू, देशबंधू बॅ. दास, बॅ. जिना, सर एम् विश्‍वेश्‍वरय्या, लाला लजपतराय, दादासाहेब खापर्डे, जॉर्ज लान्सबेरी, कर्नल वेजवुड, रॅम्से मॅकडोनल्ड यांचा समावेश आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी म्हणून तरी टिळकांच्या कर्मयोगशास्त्राकडे भारतियांची नजर वळावी.
‘तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजळून देऊ दिशा दाही दाही’.
दिव्य टीका-मौक्ति क
‘‘माझ्या बालपणीच आयुष्यात मोहाच्या आणि कसोटीच्या प्रसंगी अचूक मार्गदर्शन करणार्‍या शास्त्रग्रंथाची गरज मला भासली. मी कोठेतरी वाचले होते की अवघ्या सातशे श्लोकांच्या मर्यादेत गीतेने सार्‍या शास्त्रांचे व उपनिषदांचे सार ग्रथित केले आहे. माझ्या मनाचा निश्चय झाला. गीता वाचता यावी म्हणून मी संस्कृत शिकलो. आज गीता माझे बायबल किंवा कुराण तर काय परंतु त्यापेक्षाही अधिक, माझी माताच झाली आहे. माझ्या लौकिक मातेस मी फार पूर्वीच अंतरलो; परंतु तेव्हापासून या गीतामाऊलीने माझ्या जीवनात तिची जागा पूर्ण भरून काढली आहे. आपत्काली मी तिचाच आश्रय घेतो.
कै. लोकमान्य टिळकांना आपल्या अभ्यास व विद्वत्ता यांच्या ज्ञानसागरातून गीताप्रसादामुळेच हे दिव्य टीकामौक्ति क मिळाले. बुद्धीने शोधावयाच्या व्यापक सत्याचे भांडारच त्यांना गीतेत गवसले. गीतेवरील टिळकांची टीका हीच त्यांचे शाश्‍वत स्मारक होय. स्वराज्याची लढाई फत्ते झाल्यानंतरही ते टिकूनच राहील. तेव्हा देखील टिळकांचे निष्कलंक चारित्र्य आणि गीतेवरील त्यांची महान टीका त्यामुळे त्यांची स्मृति चिरप्रेरक राहील. त्यांच्या हयातीत किंवा आतासुद्धा टिळकांपेक्षा अधिक व्यापक किंवा सखोल शास्त्रज्ञान कोणाचेही सापडणे कठीण. त्यांच्या गीतेवरील अधिकारी टीकेपेक्षा जास्त चांगला ग्रंथ अद्याप झाला नाही व लवकर होणारही नाही. गीता आणि वेद यांतून निर्माण होणार्‍या प्रश्नांचे टिळकांनी केले त्यापेक्षा जास्त व्यवस्थित संशोधन कोणीही केलेले नाही. अगाध विद्वत्ता, अमर्याद स्वार्थत्याग व आजन्म देशसेवा यामुळे जनताजनार्दनाच्या हृदयात टिळकांनी अद्वितीय स्थान मिळविले आहे.’’
महात्मा गांधी