माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंहांचा लोकसभेत दावा

0
74

>> चीनची भारतावर हल्ल्याची तयारी

भारत – चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल लोकसभेत माजी संरक्षणमंत्री असलेल्या मुलायमसिंह यादव यांनी भारतावर हल्ला करण्याची चीनची तयारी असल्याचा दावा केला. भारताला पाकिस्तानपेक्षाही चीनकडून अधिक धोका असून चीनपासून भारताने सतर्क रहायला हवे, असेही ते म्हणाले.
सिक्किम व भूतान काबीज करण्याचे चीनचे जोरदार प्रयत्न आहेत. या अनुषंगाने भारतावर हल्ला करण्याची त्यांची सज्जता आहे. या दृष्टीने चीन पाकिस्तानचीही मदत घेत असून त्यांनी पाकमध्ये अण्वस्त्रेही पाठविली असल्याचा दावा त्यांनी केला.
चीनसंदर्भात या स्थितीवर मुद्दा उपस्थित करूनही केंद्र सरकार ठोस भूमिका स्पष्ट करीत नाही. चीनविरुद्ध सरकारने कोणती पावले उचलली आहेत त्याविषयी सरकार का जाहीर भाष्य करत नाही असा सवाल यादव यांनी केला. भूतान व सिक्कीमच्या सुरक्षेची जबाबदारी भारतावर आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

चीनकडून तिबेटमध्ये
हजारो टन दारूगोळा
बीजिंग : चीनने तिबेटमध्ये हजारो टन दारूगोळा तसेच युद्ध सामुग्री आणून ठेवला असल्याचे वृत्त चीनी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. भारत, चीन व भूतानच्या सीमेवर डोक्काम भागात अलीकडे तणावग्रस्त स्थिती असून भारतावर दबाव आणण्याचे चीनचे प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनी सरकारचे अधिकृत वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानूसार पश्‍चिम कमांडकडून उत्तर तिबेटच्या कुनवूनच्या डोंगराळ भागात चीनने हजारो टन दारूगोळा पाठवला आहे. रस्ता व रेलमार्गाद्वारे हे साहित्य तिबेटच्या दुर्गम भागांमध्ये आणण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.