कोविंद आणि व्यंकय्या

0
92

राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्यासारख्या देशाला आजवर विशेष परिचित नसलेल्या व्यक्तीची उमेदवारी जाहीर करणार्‍या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी व्यंकय्या नायडू या आपल्या ज्येष्ठ नेत्याची उमेदवारी जाहीर केली आहे. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्षही असतो. राज्यसभेमध्ये अजूनही राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमतात नाही. त्यामुळे गेली तीन वर्षे मोदी सरकारने अनेक विषयांत अध्यादेशांचा मार्ग अनुसरला. राज्यसभेत बहुमत प्राप्त होण्यासाठी अद्याप थोडा वेळ लागेल. त्यामुळे तेथील कामकाज हाताळू शकणारा अनुभवी संसदपटू या पदावर असावा या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हा निर्णय घेतला असावा. शिवाय कोविंद हे उत्तर भारतीय आणि नायडू हे आंध्र प्रदेशमधील नेल्लोरचे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारताचा समतोलही या उमेदवारीद्वारे साधला गेला आहे. मात्र, व्यंकय्या हे चारवेळा राज्यसभेवर निवडले गेले होते. ते लोकांनी निवडलेले नेते नव्हेत. आंध्र प्रदेशमध्ये त्यांना तसा जनाधार नाही. परंतु तरीही एका दाक्षिणात्य नेत्याची निवड एवढ्या महत्त्वाच्या पदासाठी केली गेली याचा राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष दक्षिण भारतात निश्‍चित करेल. व्यंकय्या नायडू हे सत्तर सालापासून राजकारणात आहेत. अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये ते ग्रामीण विकास मंत्री होते. लालकृष्ण अडवाणींच्या जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होई. पण नरेंद्र मोदी यांची हवा येताच नायडूंनी बदलत्या वार्‍याची साथ धरली. मोदी हा ईश्वरी अवतार असल्याचे जाहीर विधान त्यांनी केले होते. नायडू हे अत्यंत अनुभवी नेते आहेत यात शंकाच नाही. सर्व राजकीय पक्षांशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे अशा या अनुभवी, ज्येष्ठ नेत्याचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठीही चर्चेत होते, परंतु आपण केवळ ‘उषापती’ असल्याचे सांगत व्यंकय्या यांनी आपण त्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले होेते. राष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव पुढे केले गेले नाही, परंतु उपराष्ट्रपतीपदासाठी व्यंकय्यांचे नाव पुढे करण्यात आले. भारतीय जनता पक्षातर्फे आजवर उपराष्ट्रपतीपदासाठी वेळोवेळी अत्यंत अनुभवी नेत्यांची नावे पुढे करण्यात आली होती. भैरोसिंह शेखावत, नजमा हेपतुल्ला, जसवंतसिंह अशा ज्येष्ठ नेत्यांच्या या मांदियाळीत व्यंकय्या यांना स्थान देण्यात आले ही त्यांच्यासाठी सन्मानाची बाब आहे. मागील निवडणुकीत हमीद अन्सारींनी यश मिळवले होते, परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतरही राज्यसभेचे कामकाज हाताळताना त्यांनी निष्पक्षतेचे दर्शन घडवले. व्यंकय्या यांनीही निवडून आल्यानंतर सत्ताधारी पक्षाची तळी न उचलता त्याच परंपरेचे पालन करणे अपेक्षित असेल. विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार असलेल्या गोपाळकृष्ण गांधी यांनी मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला होता याची आठवण करून देत शिवसेनेने त्यांच्याविरोधात ब्रह्मास्त्र सोडले आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच गांधी यांची प्रतिमा वादात अडकली आहे. या पार्श्वभूमीवर व्यंकय्या नायडूंची उमेदवारी शेवटच्या क्षणी जरी जाहीर झालेली असली तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला उपकारक ठरेल. बहुमत असल्याने रालोअचे दोन्ही उमेदवार सहजपणे निवडून येतील असे सध्या चित्र आहे, त्यामुळे प्रथमच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोन्ही पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दोन ज्येष्ठ स्वयंसेवक पदारूढ होतील. एका सुसंघटित विचारधारेच्या व्यक्ती देशातील सर्व प्रमुख पदांवर येण्याची ही घटना देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाची बाब असेल. देशाच्या भावी वाटचालीवर त्याचा काय परिणाम संभवतो, देशात त्याची काय प्रतिक्रिया उमटते हे प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहेत.