परिपत्रकाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा विधानसभेत गदारोळ

0
79

सरकारी अधिकार्‍यांना आमदारांच्या घरातील कार्यालयात बोलावण्यास बंदी घालणारे परिपत्रक सरकारने मागे घ्यावे, या मागणीसाठी विरोधी कॉंग्रेसने काल विधानसभेत आणलेल्या स्थगन प्रस्तावावर प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी चर्चा करण्यास सभापतींनी मान्यता न दिल्याने विधानसभेतील संपूर्ण प्रश्‍नोत्तराचा तास रोखून धरला. त्यामुळे सभागृहातील संपूर्ण वातावरण गोंधळाचे झाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या विषयावर तोडगा काढण्याची तयारी दाखविली. परंतु परिपत्रक मागे घेणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितल्याने विरोधी आमदार खवळले. या प्रश्‍नावर विरोधकांनी सभात्यागही केला.
सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेकदा आसनावरून उठून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला; परंतु स्थितीवर नियंत्रण ठेवणे त्यांना शक्य झाले नाही. गोंधळ चालू असतानाच कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी बाहेरून आणण्यात येणार्‍या गोमांसाची योग्य डॉक्टरकडून तपासणी केली जात नाही, हा प्रश्‍न विचारण्याचा व त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला; परंतु विरोधकांच्या गोंधळामुळे काहीही ऐकू येत नव्हते. सभागृह कामकाज नियमानुसार स्थगन प्रस्ताव प्रश्‍नोत्तराच्या प्रहरास चर्चेस घेणे शक्य नाही, असे सभापतींनी सांगितले. परंतु हा जनतेचा विषय आहे त्यामुळे त्याला अधिक महत्त्व आहे. जनतेने निवडून दिलेल्या आमदारांना हा विषय अधिक महत्त्वाचा असल्याचे विरोधी नेते बाबू कवळेकर, आमदार लुईझिन फालेरो, रवी नाईक यांच्यासह सर्वच विरोधी आमदारांनी सांगितले.
वरील परिपत्रकामुळे आपल्याही काही आमदारांनी सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रश्‍नोत्तराचा तास पूर्ण करून चर्चा केल्यानंतरच आपण उपाय काढणे योग्य होईल, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. गोंधळ चालूच ठेवल्याने सभापतींनी पंधरा मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब केले. मात्र नंतरही विरोधकांनी प्रश्‍नोत्तर रद्द करूनच या प्रस्तावावर चर्चा व्हावी असा आग्रह धरला. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी प्रश्‍नोत्तरानंतरच चर्चा करू, आपण उत्तर देण्यास तसेच परिपत्रकातील त्रुटी दूर करण्यासंबंधी आश्‍वासन देण्यास तयार असल्याचे सांगितले. सभापती सावंत यांनीही विरोधी आमदारांना संयम पाळण्याची विनंती करून नंतर चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. विरोधी आमदारांनी या विषयावर लक्षवेधी सूचनाही दाखल केली आहे. त्यावेळीही त्यावर चर्चा करणे शक्य असून आपण त्यासाठी आवश्यक तो वेळ देत असल्याचे सभापतींनी सांगितले. परंतु विरोधक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अपक्ष आमदार चर्चिल आलेमावही विरोधी कॉंग्रेसच्या बाजूने अखेरपर्यंत उभे राहून युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करीत होते. या गोंधळातच प्रश्‍नोत्तराचा तास संपला.
चर्चेच्या वेळी पर्येचे आमदार राणे यांनी मुख्यमंत्र्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा करू नये, असा सल्ला दिला होता. त्यावर पर्रीकर यांनी त्यांच्या ज्येष्ठतेचा आदर राखून आपण परिपत्रकात आवश्यक ती दुरुस्ती करून आमदारांची अडचण दूर करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
दुपारच्या सत्रानंतरही गोंधळ
वरील परिपत्रकाच्या प्रश्‍नावर जेवणानंतरच्या सत्रानंतरही विरोधी आमदारांनी परिपत्रक मागे घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनासाठी आग्रह धरला. परंतु सरकारने ते देणे टाळल्याने पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी सभात्याग केला. तत्पूर्वी राणे यांनी या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आश्‍वासन द्यावे, असे आवाहन केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले होते. या सत्रात सुरुवात होताच कॉंग्रेस आमदारांनी केलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सभापतींनी पंधरा मिनिटे तहकूब केले. काल दिवसभरात या एकाच मुद्यावर सभागृहाचे कामकाज सभापतींनी तीनवेळा तहकूब केले.

चर्चिलांचा कॅसिनोंना विरोध
कॅसिनोंमुळे गोमंतकीय व्यसनाधीन झाले आहेत, असे सांगून आमदार चर्चिल आलेमाव यांनी कॅसिनोंस तीव्र विरोध केला. विधानसभेत ते राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते. पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी रस्त्याच्या बाजूला नवीन क्रॉस, घुमट्या यांना सरकारने थारा देऊ नये, अशी मागणी केली.

स्थगन प्रस्ताव फेटाळल्याने
विरोधकांची सभापतींसमोर धाव
शुन्य प्रहर सुरू होताच सभापतींनी वरील विषयावर भाष्य सुरू केले. प्रश्‍नोत्तराचे कामकाज चालू ठेवण्यास विरोधी आमदारांनी सहकार्य न केल्याचे कारण देऊन डॉ. सावंत यांनी विरोधी आमदारांनी मांडलेला स्थगत प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे विरोधक खवळले. पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे व आलेमाव वगळता सर्व विरोधी आमदार सभापतींच्या आसनासमोर गेले व हा लोकशाहीवर अन्याय होत असल्याचे सांगून गोंधळ माजविला. त्यामुळे सभापतींनी त्वरित सभागृहाचे कामकाज २.३० पर्यंत तहकूब केले.