सहावे कॅसिनो जहाज मिरामार समुद्रात रूतले

0
132

>> किनार्‍यावर तेलगळतीच्या संकटाची भीती; पर्यावरणालाही बाधा शक्य

हरयाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा यांच्या मालकीचे एमव्ही लकी सेव्हन हे कॅसिनो जहाज शनिवारी रात्री मांडवी नदीत व्यवसायासाठी आणण्याच्या प्रयत्नात असताना प्रतिकूल हवामानामुळे मिरामार समुद्रात भरकटले व किनार्‍यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर येऊन वाळूच्या पट्ट्यात रूतले. यामुळे मिरामार ते करंजाळेपर्यंच्या सागरी पट्ट्यात धोका निर्माण झाला असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शनिवारी रात्री काळोख, भरती व खराब हवामान यामुळे जहाजावरील कर्मचार्‍यांना किनार्‍यावर आणणे शक्य नव्हते. त्यामुळे रविवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मिरामार समुद्रावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर दाखल झाले व त्यावरील चार कर्मचार्‍यांना किनार्‍यावर आणून सोडण्यात आले. अजूनही जहाजावर १२ कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. हे जहाज भरकटत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नातील काही कर्मचारी जखमी झाले होते.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जहाजातून तेल गळती होऊ शकेल व त्यामुळे मिरामार ते करंजाळपर्यंत किनार्‍यावर परिणाम होईल, असे माडगांवकर सॅल्वेजचे प्रमुख व या क्षेत्रातील तज्ज्ञ आनंद माडगांवकर यांनी सांगितले.
भरती असल्याने अपघात जखमी झालेल्यांना मध्यरात्री वाचविणे शक्य झाले नाही, सुदैवाने ते जीवंत राहिले. काल सकाळी त्यांना काढण्यात आल्याचे माडगांवकर यांनी सांगितले. आपण घटना स्थळाची पहाणी केल्याचे ते म्हणाले.
वरील जहाज आणण्याची घाई का केली हे कळणे कठीण आहे. बंदर कप्ताननी वरील भागातील जलवाहतूक बंद ठेवली आहे. पणजी बंदर सप्टेंबरमध्ये खुले होईल, असे माडगांवकर यांनी सांगितले. या जहाजामध्ये १२ टन इंधन असून गळती सुरू झाल्यास संपूर्ण मिरामार किनार्‍यावर परिणाम होईल. रिव्हर प्रिन्सेस कांदोळी समुद्रात रूतल्याने कांदोळी किनारा नष्ट झाल्याचे ते म्हणाले. आपल्या मते जहाजावरील १२ खलाशांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील पंधरा दिवस जहाज काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणे शक्य होणार नाही, मुरगांव बंदरावरच हे जहाज सुरक्षित होते, असे माडगांवकर यांनी सांगितले.
तेलगळतीचे संकट शक्य : कुंकळकर
पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळेकर यांनी बंदर कप्तानांना दोष दिला आहे. जलवाहतुकीस बंदी असताना वरील जहाज आणण्याचा प्रयत्न करणे चुकीचे होते. बंदर कप्तानने परवाना दिला होता की नाही, याची कल्पना नसल्याचे ते म्हणाले. उच्च न्यायालयाने वरील जहाजास मान्यता दिली होती. न्यायालयानेच आता त्यावर नियंत्रण ठेवणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले. तेल गळतीचे संकट मिरामार किनार्‍यावर येऊ शकेल, अशी भीती कुंकळेकर यांनी व्यक्त केली.
वरील जहाज मांडवीच्या पात्रात आणण्यास सरकारने मान्यता दिल्याने अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव गिरीश चोडणकर यांनी सद्याच्या हवामानात जहाजाला धोका असल्याचे सांगून ते रूतल्यास पुढील सप्टेंबरपर्यंत काढणए शक्य होणार नाही, असा गेल्या दि. ६ रोजी पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला होता.

जहाज सप्टेंबरपर्यंत बाहेर
काढणे कठीण
या भागात वाळूचे पट्टे वाढत आहेत. त्यामुळे हे जहाज तळापर्यंत रूतले आहे. मध्यभागी आले असते तर जहाजाला जलसमाधी मिळाली असती. पुढील पंधरा दिवसात ते काढणे कठीण आहे. पावसाचा जोर वाढल्यास सप्टेंबरपर्यंत ते काढणे कठीण होईल, असे माडगांवकर यांचे म्हणणे आहे. आपल्या माहितीनुसार बंदर कप्तानने वरील जहाज आणणे धोक्याचे असल्याचे सांगितले होते. मुरगांव बंदरावर हे जहाज सुरक्षित होते. खलाशांच्या जीवाला धोका असताना जहाज आणण्याची गरजच नव्हती, असे ते म्हणाले.