हरपला शब्द-रेषांचा साधक

0
132

– शि. द. फडणीस (ज्येष्ठ व्यंगचित्रकार)

शब्दांशी सलगी असणार्‍या घरात रंगरेषांशी संधान साधलेला एक कलाकार घडला आणि त्याने व्यंगचित्रांकडे पाहण्याची निकोप दृष्टी रसिकांना दिली. मंगेश तेंडुलकरांच्या निधनामुळे एक साधक, कलासक्त माणूस आणि समाजभान जागृत असणारा नागरिक आपण गमावला आहे. कलाकारांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याविषयी त्यांची आग्रही भूमिका होती. आपल्या प्रभावी चित्रशैलीतून त्यांनी दिलेला संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांना विनम्र श्रद्धांजली…

शब्दांशी सलगी असणार्‍या घरात रंगरेषांशी संधान साधलेला एक कलाकार घडला आणि त्याने व्यंगचित्रांकडे पाहण्याची निकोप दृष्टी रसिकांना दिली. मंगेश तेंडुलकरांच्या निधनामुळे एक साधक, कलासक्त माणूस आणि समाजभान जागृत असणारा नागरिक आपण गमावला आहे. कलाकारांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याविषयी त्यांची आग्रही भूमिका होती. आपल्या प्रभावी चित्रशैलीतून त्यांनी दिलेला संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

मंगेश तेंडुलकर यांचं दुःखद निधन ही चटका लावून जाणारी बाब आहे. या प्रसंगी त्यांच्या अनेक आठवणी दाटून येतात. माझी त्यांच्याशी ओळख झाली ती विजय तेंडुलकर यांचे बंधू म्हणून. नंतर त्यांनी खरी ओळख करून दिली ती व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर म्हणून. व्यंगचित्राला चित्रकलेची भाषा शिकणं आवश्यक असतं. तेंडुलकरांनी मात्र चित्रकलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं. रेषेची ही भाषा त्यांनी स्वप्रयत्नांनी जोपासली. व्यक्तिश: १९९३-९४ मध्ये त्यांची आणि माझी ओळख झाली. निमित्त होतं ‘कार्टुनिस्ट कंबाईन’चा मेळावा आणि प्रदर्शनाचं. त्यावेळी ‘कार्टुनिस्ट कंबाईन’चे अध्यक्ष ही भूमिका त्यांच्याकडे होती. त्यावेळी आम्ही चर्चा, प्रात्यक्षिकं, प्रदर्शनं यांचा एकत्र अनुभव घेतला. आजपर्यंत तेंडुलकरांची स्वत:ची ५० पेक्षा जास्त प्रदर्शनं झाली आहेत. त्यांच्या कामाचं वेगळेपण म्हणजे तीन प्रकारची नैपुण्यं त्यांना लाभली होती. त्यांनी व्यंगचित्रकाराचा कुंचला सङ्गाईने चालवलाच, त्याचबरोबर तेंडुलकर कुटुंबातून आलेलं शब्दमाध्यमही उत्तम प्रकारे अवगत केलं. याची प्रचिती त्यांच्या नाट्यसमीक्षेमध्ये दिसून येते. त्यांनी व्यंगचित्राबद्दलही अत्यंत उत्तम प्रकारे लिहिलं आहे. मला ‘मार्मिक’चा पुरस्कार मिळाला त्यावेळी लेख लिहून त्यांनी मला दिलेला प्रतिसाद आजही आठवतो आहे.
व्यासपीठावर असताना तेंडुलकरांची बोलण्याची शैली अत्यंत खेळकर आणि प्रसन्न असायची. त्यांची बरीच पुस्तकं प्रकाशित झाली. त्यांपैकी आठवणारं एक पुस्तक म्हणजे ‘संडे मूड.’ या पुस्तकाला चिं. वि. जोशी पुरस्कार मिळाला. तो माझ्या हस्तेच दिला गेला याचा विशेष आनंद आहे. दुसरं पुस्तक म्हणजे ‘तेंडुलकरी स्ट्रोक्स.’ या पुस्तकातील चित्र, चित्रांचे प्रकार यात पुष्कळ विविधता आढळते. त्यात काही निखळ विनोदी चित्रं आहेतच, पण काही सामाजिक विषय, शिक्षणासंबंधीच्या अडचणी, स्त्रियांचे प्रश्‍न, वाहतुकीचा प्रश्‍न या विषयांवरही आहेत. त्यांनी नुसती तटस्थपणे चित्रं काढली नाहीत, तर त्यांच्यात नेहमीच एक कार्यकर्ता दिसत असे. आपली मतं व्यक्त करण्यासाठी ते रस्त्यावर उतरत. ते बर्‍याचदा वाहतुकीसंबंधीचं व्यंगचित्र वाहनचालकांना देत. पोलिसांचा वाहतूक विभागही त्यांच्यावर खूश असे. त्यांनी राजकीय टीकाचित्रंही केली आहेत. निधनाच्या दुदैर्र्वी घटनेचा संदर्भ घेतला तर त्यांनी स्वत:च्या मृत्यूवरही अनेक व्यंगचित्रं काढली असल्याचं दिसतं. त्यांनी वृद्धाश्रमातील बिकट दिवसही रेखाटले आहेत. असे विषय साकारताना त्यांच्यातील तत्वज्ञ जागा असायचा. अशा चित्रांमधून जीवनाच्या क्षणभंगुरत्वाचं दर्शन घडतं.
तेंडुलकरांनी प्रथम शब्दांसह चित्रं काढली. नंतर चित्रकलेच्या नैपुण्याबरोबर नि:शब्द चित्रंही रेखाटली. बहुरंगी चित्रं, अर्कचित्रं आणि राजकीय टीकाचित्रं ही त्यांची खासियत होती. व्यासपीठावर बोलताना ते व्यंगचित्र माध्यमाबद्दल चिंता व्यक्त करत असत. अलीकडे होणार्‍या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या संकोचाबाबत त्यांना खंत वाटत असे. म्हणूनच त्यांनी सांस्कृतिक दहशतवादावर अनेक व्यासपीठांवरून निषेध नोंदवला. व्यंगचित्रांमुळे भावना दुखावल्या असं म्हणत जे आक्रंदन केलं जातं त्याला उत्तर देताना त्यांनी हा निषेध नोंदवल्याचं दिसून येतं.
विचारातील त्रुटी दाखवण्यासाठी, अन्यायाला वाचा ङ्गोडण्यासाठी व्यंगचित्र माध्यम शब्दापेक्षाही प्रभावी असतं. खरं तर ही लोकशाहीची भाषा असते. याची प्रचिती देशात आणि देशाबाहेर घडलेल्या अनेक घटनांमधून येते. त्यामुळे व्यंगचित्र निकोप मनानं, खुल्या दिलानं कसं पाहावं याचं शिक्षण देण्याची गरज आहे हे ते वेळोवेळी सांगायचे. आजपर्यंत व्यंगचित्रांची बरीच संमेलनं झाली. त्यातून व्यंगचित्र सर्वदूर पोहोचलं. पण आता समज वाढण्याची गरज आहे, असं ते म्हणायचे.
तेंडुलकरांनी विविध विषयांवर व्यंगचित्रं रेखाटली. त्यांच्या बर्‍याच चित्रांना रसिकमान्यता मिळाली. उदाहरणादाखल त्यांचं स्त्री-शिक्षणावर भाष्य करणारं एक व्यंगचित्र आहे. यात त्यांनी मास्टर ऑङ्ग सायन्सची पदवी घेतलेली एक युवती दाखवली आहे. पण चुलीवर स्वयंपाक करत असताना ती महिला त्या पदवीची सुरळी करून ङ्गुंकणीसारखी वापरताना ते दाखवतात. या चित्रामधून त्यांनी समाजातील एक विदारक वास्तव समोर आणलं. स्त्री कितीही शिकली तरी चूल आणि मूल यातून सुटलेली नाही, या कटूसत्यावर ते प्रकाश टाकतात. हे व्यंग त्यांनी नेमकेपणानं समोर मांडलं आहे. वाहतुकीच्या समस्यांसंदर्भातील त्यांची असंख्य चित्रं याच सजगतेचं उदाहरण ठरावीत.
तेंडुलकर हे उत्तम व्यंगचित्रकार होते, त्याचबरोबर उत्तम वक्तेदेखील होते. अनेक व्यासपीठांवरून मी त्यांची भाषणं ऐकली आहेत. नाट्यसमीक्षक म्हणूनही त्यांनी बरंच मोठं काम केलं. विजय तेंडुलकरांसारख्या ज्येष्ठ साहित्यिकाचे बंधू ही त्यांची ओळख होतीच, पण त्याचबरोबर चांगले लेखक म्हणूनही मी त्यांना ओळखत होतो. वस्तुत: त्यांचं शिक्षण या क्षेत्रामधील नव्हतं. ते बी.एस्सीचे पदवीधर होते. त्यांची कारकीर्द लष्करामध्ये घडली. त्यांच्यावर तंत्रज्ञानाचाही मोठा प्रभाव होता. आरोग्यक्षेत्रासाठी काही उपयुक्त अवजारं, उपकरणं बनवण्याच्या कारखान्यांशी त्यांचा बराच संबंध असायचा. म्हणूनच त्यांच्या चित्रांमध्ये तंत्रज्ञानाचे अनेक दाखलेही पाहायला मिळतात. म्हणजेच व्यंगचित्रांची साथ असतानाही त्यांनी या आवडीशी ङ्गारकत घेतली नव्हती. त्यामुळे कला आणि तंत्रज्ञानाची अनोखी जोड त्यांच्या काही व्यंगचित्रांमधून पाहायला मिळते.
तेंडुलकरांकडे चांगली वक्तृत्व कला होती. मुळात ते काहीसे अबोल होते. ङ्गारसे बोलायचे नाहीत. मात्र विविध व्यासपीठांवरून बोलताना ते अतिशय मुद्देसूद रीतीनं आणि सविस्तर पद्धतीनं विषयांचे विविध पदर उलगडून सांगत असत. अलीकडे तर ते अनेक विषयांशी संबंधित समारंभांना उपस्थिती नोंदवत असत. अगदी चित्रकारांपासून सामाजिक कार्यासंदर्भातील कार्यक्रम, क्रीडाविषयक कार्यक्रम यात ते सहभागी होत. थोडक्यात, माणसाला भिडणार्‍या प्रत्येक विषयाशी संबंधित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा त्यांचा प्रयत्न असे. अशा वेळी केलेली त्यांची काही उत्तम भाषणं आजही माझ्या स्मरणात आहेत.
व्यंगचित्रांवरून वाद होण्याचा एक मोठा इतिहास आपल्याकडे पाहायला मिळतो. या वादात तेंडुलकर व्यंगचित्रकारांची भूमिका खंबीरपणे मांडताना दिसत असत. केंद्रामध्ये कॉंग्रेसचं सरकार असताना एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकाला आक्षेप घेतला होता. ‘हिंदुस्तान टाईम्स’चे शंकर यांचं एक वादग्रस्त व्यंगचित्र छापलं असल्याचा त्यांचा दावा होता. मुळात हा सरकारचा भ्रम होता. ते पुस्तक १९५० मध्ये प्रकाशित झालं तेव्हा चित्राबद्दल काहीच वाद नव्हता. तेव्हा तर खुद्द नेहरू, आंबेडकर होते, पण त्यांनी चित्रातील व्यंग खेळकरपणे घेतलं होतं. पण ते पुनर्प्रकाशित झालं तेव्हा मात्र वादंग उठला. म्हणूनच पूर्वीच्या नेत्यांना व्यंगचित्रमाध्यमाची जाण होती तशी अलीकडच्या नेत्यांमध्ये का नाही अशी खंत तेंडुलकरांना जाणवायची. सध्या समाजातील कोणत्याही घटकामध्ये टीकेचा सामना करण्याची क्षमता राहिलेली नाही, छोट्याशा गोष्टीनेही लोकांच्या भावना दुखावल्या जातात याबद्दल ते असमाधान व्यक्त करायचे. चित्र समंजसपणे पाहण्याचं भान लोकांना यायला हवं, अशी त्यांची तळमळ होती.
कदाचित हे तेंडुलकरांसारख्या कलाकारांच्या कामाला मिळालेलं यशच आहे की आज शहरातूनच नव्हे तर खेड्यापाड्यांतूनही आम्हा व्यंगचित्रकारांना पत्रं येतात. याद्वारे खेड्यांमधील विद्यार्थांना व्यंगचित्रांबद्दल जाणून घ्यायचं असतं. स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रं आम्हाला दाखवायची असतात. ती छोट्या-मोठ्या ठिकाणी प्रकाशित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. थोडं मागे जाऊन पाहिलं तर दिसून येतं की, पूर्वी मोठ्या शहरांमध्येदेखील व्यंगचित्र या माध्यमाला विशेष प्राधान्य दिलं जात नसे. मासिकांमध्ये अगदी कोपर्‍यातील जागा (शिल्लक राहिली तर) व्यंगचित्रांसाठी दिली जायची. पण या काळापासून आजपर्यंत घडून आलेलं हे परिवर्तन स्वागतार्ह आहे. ते घडवून आणणार्‍या कलाकारांमध्ये मंगेश तेंडुलकरांचं नाव घ्यावं लागेल.
तेंडुलकरांना अन्य कलाकारांविषयी नितांत आदर होता. यासंबंधीची एक आठवण आहे. मुंबईच्या आयआयटीमधील एका मुलीने डिग्री कोर्सच्या वेळी माझ्या कामावर एक प्रोजेक्ट केला होता. त्यावेळी तिने माझ्या कामाबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी तेंडुलकरांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत खूपच रंगली होती. ‘पुलोत्सवा’मध्येदेखील आम्ही प्रात्यक्षिकं आणि चर्चा या माध्यमातून एकत्र काम केलं आहे. मी, वसंत सरवटे आणि तेंडुलकर ही त्रयी यावेळी एकत्र येताना रसिकांनी पाहिली आहे. आम्ही काही चित्रकला शिबिरंदेखील एकत्र घेतली होती. एकंदरच कलेवर नितांत प्रेम करणारा, श्रद्धा असणारा कलासक्त माणूस आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.