तिवरेकर-येंडे कुटुंबीयांचे गोवा मुक्तिसंग्रामातील योगदान

0
250

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

कै. प्रभाकर तिवरेकर हे या कुटुंबातील एक नावाजते स्वातंत्र्यसैनिक. इ.स. १९५४ पासून कै. बाळा काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली भित्तीपत्रके लावणे, तिरंगी झेंडा फडकावणे, गुप्त बैठका घेणे आदी कार्यातून त्यांनी देशभक्त नागरिकांना सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. २६ जानेवारी १९५५ रोजी सत्याग्रहात सहभागी झाल्याबद्दल पोर्तुगीज सरकारने त्यांना अटक करून पाच वर्षांसाठी आग्वाद तुरुंगात पाठवले होते.

खोर्ली-कासारवाड्यावर तिवरेकर कुटुंबीयांचे मोठे माडीचे घर आहे. कै. काशिनाथ तिवरेकर व कै. रामा तिवरेकर यांचे हे कुटुंब. त्यांची मुलेही तांब्या-पितळेची भांडी घडवण्याच्या कामात तरबेज होती. कै. काशिनाथ तिवरेकर यांना कै. श्यामसुंदर, स्वा.सै. कै. प्रभाकर, कै. कमलाकर, कै. रघुवीर व श्री. नरेश असे पाच मुलगे, तर कै. रामा तिवरेकर यांना कै. चंद्रकांत, कै. मधुकर व कै. सदानंद असे तीन मुलगे होते. सर्वजणांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला वाहून घेतले होते.
तांब्या-पितळेची भांडी, समया घडवून स्वतःच्या आस्थापनातून ते त्यांची विक्री करत असत. कै. प्रभाकर यांना सुदेश, प्रसाद हे मुलगे व तनया ही मुलगी आहे. त्यांचे पुत्र बदलत्या काळानुसार इलेक्ट्रॉनिक व औद्योगिक कंपनीची तयार भांडी विकण्याचा व्यवसाय करतात. श्री. सुदेश हा तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा युवक असून ‘म्हापसा पिपल्स फोरम’ या अन्यायाविरुद्ध लढा देणार्‍या व सामाजिक समस्यांना वाचा फोडणार्‍या संघटनेचा कार्यकर्ता आहे. कै. श्यामसुंदर (शामू) यांना उमेश व महेश हे दोन मुलगे असून ते म्हापसा नगरपालिका बाजारपेठेत सौंदर्यप्रसाधने व तयार कपडे (रेडिमेड) विकण्याचा आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळतात. कै. चंद्रकांत यांना सिद्धार्थ व शैलेश अशी दोन मुले असून वडिलांचा तांब्या-पितळेची व रेडिमेड भांडी विकण्याचा व्यवसाय पाहतात.
कै. काशिनाथ तिवरेकर यांचे आज हयात असलेले कनिष्ट पुत्र श्री. नरेश यांनीही कालानुरूप आपल्या व्यवसायात किंचित बदल केलेला असून ते व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. बबिता म्हापसा नगरपालिका बाजारपेठेतील दुकान चालवतात व इलेक्ट्रॉनिक व कंपनीची तयार भांडी विकण्याचा व्यवसाय करतात. ते आमचे एक जवळचे मित्र असून त्यांना समाजकारण व राजकारणाची खूप आवड आहे. त्वष्टा ब्राह्मण (कासार) समाज संघटनेतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. खोर्ली येथील श्री देवी सातेरी संस्थानचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. पूर्वी श्री देवी सातेरीची पालखी उत्सवाच्यावेळी नगरप्रदक्षिणेस निघे तेव्हा ती खांद्यावर घ्यावी लागत असे. श्री. नरेश तिवरेकर देवस्थानचे अध्यक्ष असताना त्यांनी लाकडी व नक्षीदार रथ करून घेतला, त्यामुळे पालखी खांद्यावरून वाहून नेण्याचे त्रास वाचले. आता सुंदर अशा रथातून लालखी नगरप्रदक्षिणेस निघत असते. याशिवाय ते श्री देव बोडगेश्‍वर देवस्थानच्या कार्यकारी मंडळाचे अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. गोव्यातील संगीत क्षेत्राला वाहून घेतलेल्या ‘सम्राट इंटरनॅशनल’ या संस्थेचे ते म्हापसा शाखेचे अध्यक्ष होते. सध्या ते संस्थेच्या केंद्रीय समितीचे सदस्य आहेत.
गोवा मुक्तिलढ्यातही तिवरेकर कुटुंबीयांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. कै. प्रभाकर काशिनाथ तिवरेकर हे या कुटुंबातील एक नावाजते स्वातंत्र्यसैनिक. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९३५ रोजी म्हापसा येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण इंग्रजीतून झाले. ‘नॅशनल कॉंग्रेस, गोवा’चे ते सदस्य होते. कै. बाळा काकोडकर यांच्याबरोबर ते गोवा मुक्तिलढ्यात सहभागी झाले होते. इ.स. १९५४ पासून कै. बाळा काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली भित्तीपत्रके लावणे, तिरंगी झेंडा फडकावणे, गुप्त बैठका घेणे आदी कार्यातून त्यांनी देशभक्त नागरिकांना सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. २६ जानेवारी १९५५ रोजी सत्याग्रहात सहभागी झाल्याबद्दल पोर्तुगीज सरकारने त्यांना अटक करून पाच वर्षांसाठी आग्वाद तुरुंगात पाठवले होते. केंद्र सरकारने त्यांना इ.स. १९७२ साली ताम्रपत्र देऊन त्यांच्या गोवा मुक्तिलढ्यातील योगदानाचा सन्मान केला होता. सुरुवातीला नोकरी आणि गोवा मुक्तीनंतर त्यांनी व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक राष्ट्रीय सणाच्या दिवशी हुतात्मा चौकात हजर राहून ते तिरंग्याला मानवंदना द्यायचे. म्हापसा मतदारसंघात मी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर ज्या-ज्या वेळी निवडणूक लढवली, त्या-त्या वेळी माझ्या प्रचारासाठी ते माझ्याबरोबर खोर्ली विभागात फिरायचे. सध्याच्या राजकारणात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना अतिशय चीड होती. अधूनमधून भेटले तर म्हणायचे, ‘‘सुरेंद्र, तुमच्या-आमच्या वेळावेले दिस गेले रे आतां. आयज चोरांच्या हातीन राज्य पडलां!’’
व्यवसाय म्हणून त्यांनी खोर्ली भागात समया आदी पितळेच्या वस्तू तयार करण्याचा एक छोटासा कारखाना सुरू केला होता. आज त्यांचा व्यवसाय त्यांची मुलं सांभाळतात.
कधी आम्ही मित्रमंडळीत चाललेल्या गप्पांच्या ओघात श्री. नरेश तिवरेकर आपल्या बालपणीची एक गोष्ट सांगतात. त्यांचा भाऊ कै. प्रभाकर हा गोवा मुक्तिलढ्यात सहभागी झाल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा भोगत होता. त्यावेळी त्याची आई चकल्या, लाडू व इतर घरगुती खाणे घेऊन दर पंधरा दिवसांनी स्पेशल टॅक्सीने जाऊन आग्वाद तुरुंगाला भेट देत असे. त्यावेळी छोटा नरेशही आईबरोबर असायचा. गोरे पोर्तुगीज (पाखले) व काळे आफ्रिकन निग्रो (खाप्री) यांची आमच्याकडे त्यावेळी चांगली वागणूक असायची. कै. प्रभाकर याने तुुरंगात राहून शिक्षणही घेतले होते.
येंडे कुटुंबीयांचे मुक्तिलढ्यातील योगदान
कासारवाड्यावरील त्वष्टा ब्राह्मण (कासार) समाजातील दुसरे एक नावाजते घराणे म्हणजे येंडे कुटुंबीय. गोवा मुक्तिलढ्यातील या घराण्याचे योगदान वादातीत आहे. कै. शाबी येंडे, कै. सुब्राय येंडे व कै. गणपत येंडे या कुटुंबीयांपैकी कै. शाबी येंडे यांचे सुपुत्र कै. दीनानाथ (दिना) येंडे, श्री. प्रभाकर येंडे हे दोघेही गोमंतक मुक्तिसंग्रामात सहभागी होते, तर कै. सुब्राय येंडे यांचे सुपुत्र कै. नृसिंह येंडे यांचेही मुक्तिसंग्रामात योगदान होते.
स्वा.सै. कै. दीनानाथ शाबी येंडे
कै. दीनानाथ शाबी येंडे हे ‘दिना येंडे’ या नावाने सर्वपरिचित होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९३० रोजी म्हापसा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीतून व त्यापुढील शिक्षण इंग्रजीतून झाले. इ.स. १९४६ पासून ‘नॅशनल कॉंग्रेस, गोवा’शी ते संलग्न होते. आपल्या इतर बारा सहकार्‍यांसह ६ एप्रिल १९५५ रोजी म्हापसा येथे केलेल्या सत्याग्रहामुळे पोर्तुगीज सरकारने त्यांना अटक केली होती. पुढे मग पोर्तुगीज लष्करी न्यायालयापुढे सुनावणी होऊन त्याना नऊ वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याचबरोबर पंधरा वर्षांसाठी त्यांचे नागरी हक्क हिरावून घेण्यात आले होते. अटकेनंतर चार वर्षांनी म्हणजे ऑगस्ट १९५९ मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून सुटका झाल्यावरही त्यांनी गोवा मुक्तिलढ्यातील आपला सहभाग सुरूच ठेवला होता. केंद्र सरकारने ताम्रपट प्रदान करून त्यांचा सन्मान केला होता. कै. सिद्धेश्‍वर लांजेकर आणि कै. श्रीपाद साप्ते हे त्यांचे गोवा मुक्तिलढ्यातील सहकारी होते.
कै. नृसिंह सुब्राय येंडे
कै. नृसिंह सुब्राय येंडे यांचा जन्म म्हापसा येथे २७ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. गोवा मुक्तिलढ्यातील इतर स्वातंत्र्यसेनानींप्रमाणेच ते ‘नॅशनल कॉंग्रेस, गोवा’चे सदस्य होते आणि इ.स. १९५४ पासून त्यांनी गोवा मुक्तिलढा, ‘नॅशनल कॉंग्रेस, गोवा’ यांच्या प्रचारात सहभागी होण्यास सुरुवात केली. ६ एप्रिल १९५५ रोजी म्हापसा येथे गोवा मुक्तिलढ्यातील एक रणरागिणी कै. सुधाताई जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात सहभागी झाल्याबद्दल पोर्तुगीज प्रशासनाने त्यांना तुरुंगात डांबून जबरदस्त मारहाण केली होती. पुढे मग दहा महिन्यांच्या कालावधीनंतर पोर्तुगीज लष्करी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. लष्करी न्यायालयाने सुनावणीनंतर त्यांना नऊ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. चार वर्षे कारावास भोगून झाल्यावर २८ नोव्हेंबर १९५८ रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
श्री. प्रभाकर शाबी येंडे
श्री. प्रभाकर शाबी येंडे हे कै. दीनानाथ शाबी येंडे यांचे बंधू होत. आपल्या बंधूच्या पावलावर पाऊल टाकून तेही गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी झाले होते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३६ रोजी म्हापसा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले. इ.स. १९५५ पासून ते ‘नॅशनल कॉंग्रेस, गोवा’चे सदस्य होते. स्वातंत्र्यसैनानी कै. पीटर आल्वारिस यांच्या नेतृत्वाखाली ते भूमिगत कार्य करीत होते. पोर्तुगीज प्रशासनाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. स्वा.सै. सिद्धेश्‍वर लांजेकर, शांबा हेदे, खुशाली मडकईकर, श्यामसुंदर कळंगुटकर, जयसिंगराव व्यंकटराव राणे, शिवाजी देसाई या समाजवादी विचारसरणीच्या सहकार्‍यांबरोबर त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामात भरीव योगदान दिले आहे. आजही हुतात्मा चौकात नगरपालिका व उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत साजरा होणार्‍या राष्ट्रीय कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने ते सहभागी होतात. दरवर्षी हुतात्मा चौकात मशाल प्रज्वलित करण्याचा मान त्यांना देऊन त्यांच्या मुक्तिसंग्रामातील योगदानाची कदर केली जात होती. केंद्र सरकारतर्फे इ.स. १९७२ मध्ये ताम्रपट देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. कै. बाजीराव बेलवलकर, कै. श्रीपाद साप्ते, कै. दीनानाथ येंडे, कै. जयवंत बुर्ये, कै. प्रभाकर धोंड हे त्यांचे गोवा मुक्तिसंग्रामातील सहकारी होते. तांब्या-पितळेची भांडी विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता.
कै. शाबी येंडे यांचे एक सुपुत्र कै. रामनाथ येंडे हे उच्चशिक्षित तर होतेच, परंतु ‘दि म्हापसा अर्बन को-ऑप. बँक लि.’ या म्हापशातील प्रथम नागरी सहकारी बँकेचे ते पहिले सर-व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. कनिष्ठ चिरंजीव आपल्या कुटुंबीयांसह सध्या धुळेर-म्हापसा येथे वास्तव्यास आहेत. त्याच ठिकाणी ते जनरल स्टोअर चालवतात.