दूरातील इंद्रनिळे…

0
163

>> हृदयस्पंदन
– सौ. पौर्णिमा केरकर

बोरकरांची आनंदयात्रा कामतानी त्यांच्या सहवासात अनुभवली. हा त्यांच्यासाठी सहज योगायोग असेलही; परंतु आमच्या पिढीला या सांस्कृतिक संचिताचे नुसते अनुभव जरी ऐकता आले तरी त्याच्यातील सार्थकता जगणे उन्नत करणारी ठरते.

‘१९६८ चे ते साल असले पाहिजे. लहानपणात गुरे राखणे हा माझा खूप आवडता छंद होता. पावसाळ्याच्या दिवसांत तर गुरे राखता राखता माझ्या घरासमोरच्या नदीत पडणारी पावसाची थेंबफुले पाहता पाहता देहभान हरपून जात असे. अस्नोड्यातील पार नदीच्या उजव्या किनारी असलेले आमचे घर माझ्या भावाने काढलेल्या ‘मांडवी’ मासिकाचे कार्यालयही होते. या मासिकाच्या निमित्ताने साहित्यक्षेत्रातील दिग्गज मंडळी आमच्या घरी यायची. त्या तारुण्यसुलभ वयात आमच्या घरात भिंतीवर टांगलेले सूर्यनारायणाचे रथारूढ आणि सात घोडे असलेले चित्र मला खूप भावायचे. त्या चित्राकडे मी पाहत राहायचो. नेमके असेच चित्र मला ‘दुदनी सड्या’वर तिन्हीसांजेच्या वेळेला गुरांना घरी घेऊन येताना दिसायचे. पश्‍चिमेला डोंगररांगात अस्ताला जाणारा सूर्य, बदलणारे ढगांचे रंग आणि माझ्या घरातील त्या चित्रातील घोड्यांची तुलना मी सतत करायचो. आमच्या घरी आलेल्या अनेक साहित्यिकांना मी ते चित्र दाखवले. त्यांत रा. रा. देशपांडे, श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर वगैरे साहित्यिक होते. पण कोणीच ते दृश्य पाहून काहीच शब्दबद्ध केले नव्हते. दिवस असेच गेले. गुरांना घेऊन चरण्यासाठी मी कोठेही माळरानावर गेलेलो असलो तरी तिन्हीसांजेला मात्र हमखास ‘दुदनी सड्या’च्या ठिकाणी सूर्यास्त पाहण्यासाठी यायचो. पुढे मग कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर यांचा निकटचा संबंध आमच्या घराशी जुळला. त्यांची मुलगी माझा भाऊ श्रीराम कामतांची पत्नी बनून आली आणि आमचे घर साहित्यिक, सांस्कृतिक मैफिलीनी सजू लागले. एके संध्याकाळी मी, मंगेश पाडगावकर, स्वतः बोरकर पत्ते खेळण्यासाठी बसलो होतो. बाहेर पाऊस सुरू होता आणि आमचा पत्त्यांचा खेळही ऐन रंगात आला होता. एवढ्यातच पाऊस थांबला. आम्ही फिरायला गेलो. मी बोरकरांना दुदीन सड्यावरील सूर्यास्ताचे ते नयनरम्य दृश्य दाखवले. बोरकरांनी ते दृश्य पाहिले मात्र, त्यांनी डोळे किंचित किलकिले केले. एक सिगारेटचा मस्तपैकी झुरका घेतला. एक क्षण त्यांची तंद्री लागली आणि दुसर्‍याच एका जादुई क्षणी त्यांच्या ओठातून झर झर शब्द बाहेर पडले…
दुरातील डोंगर इंद्रनिळे
जवळातील हिरवेगार मळे
तू दूर सखे, शहरात तिथे
नवलाख दिव्यांची आरास तिथे….
ते दृश्य पाहून घरी परतेपर्यंत ही लोभस कविता पूर्ण झाली होती. एक सुंदर चित्र रेखाटावे तशी ही कविता जन्मली होती. निळाईतले डोंगर, गुलाबी ढग, शेतमळे… सारे सारे काही त्यांनी अवघ्याच क्षणात चित्रमयरीतीने शब्दबद्ध केले. कवित्व म्हणजे काय… ती एक दिव्यत्वाची अनुभूती… निसर्गाच्या रंग, रस, गंधादी संवेदनानुभूतीबरोबरच त्यांच्या अंतरंगाशी तन्मय होत गेलेल्या त्या काव्यनिर्मितीच्या अभुतपूर्व क्षणाचा मी साक्षीदार ठरलो आणि माझ्याकडे असलेल्या थोड्याफार कवित्वाला मी पूर्णतः विसर्जित करून टाकले…’
ही एक निःस्तब्ध, भावरूप, चैतन्यपूर्ण जीवनप्रवासाची सोबतीण असलेली बा. भ. बोरकरांविषयीची कथाकार जयराम पांडुरंग कामत यांची आठवण. ‘दूरातील इंद्रनिळे’सारख्या कवितेची निर्मिती. त्या क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य जयराम कामतांना लाभले. ज्या परिसरात त्यांना हे काव्य स्फुरले त्याच परिसरात आमचे उच्च माध्यमिक विद्यालय आहे. त्यामुळे जीवनातील आदर्श व्यक्त करण्यासाठी अशा आठवणी, असे प्रसंग आणि या आठवणींचे साक्षीदार असलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या तोंडून तो प्रसंग ऐकणे यासारखे आणखी दुसरे भाग्य नाही.
गेली पंचवीस वर्षे अस्नोड्याच्या पुलाकडील पार नदीच्या काठावर असलेल्या कामतांच्या या घराला मी पाहत आलेले आहे. विश्‍वचरित्रकोशाची निर्मिती या घरातूनच झाली. पदरमोड करून साहित्यिक अभिरुची साहित्यप्रेमींत रुजविणारे ‘मांडवी’ मासिक ही याच घराची देणगी आहे. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर यांची मुलगी सून म्हणून याच घरात वावरली. पु. ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, कुसुमाग्रज वगैरेंच्या साहित्यिक- सांस्कृतिक चर्चानी हे घर पूर्वी गजबजलेले असायचे. कविश्रेष्ठांच्या काव्यमैफिलीनी पार नदीला साक्षी ठेवून रात्री सजवल्या हे ऐकून माहीत होते. त्यामुळे पूर्वीपासूनच या घराविषयी एक आदराची भावना निर्माण झाली होती. अकरावीच्या विद्यार्थ्यांना ‘दुखरं सुख’ शिकविताना कथाकाराला आवर्जून भेटायची इच्छा व्हायची. पण ते धाडस त्या काही वर्षांत मुळीच झाले नाही. परंतु विद्यार्थ्यांना मात्र सांगणे व्हायचे की पारावर बससाठी उभे असता तिथे नदीच्या पल्याड उभी असलेली वास्तू पहा. मध्यंतरी ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाअंतर्गत कथाकार जयराम कामत यांची मुलाखत खास विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली. साहित्यिक वर्तुळात मोठं नाव असलेल्या व्यक्तीशी कसं आणि काय बोलायचं हा मोठाच पेच माझ्यासमोर होता. म्हणूनच अगदी मोकळेपणाने इतक्या वर्षांत त्यांच्याशी कधी बोलता आले नाही. परंतु २ जुलैला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा थोरला मुलगा अतुल याच्या कल्पनेतून माहितीपटाची निर्मिती साकारली. त्यासाठीचे लिखाण माझ्यावर सोपविले. त्या निमित्ताने निसर्गाशी जडलेल्या आपल्या सख्य भावातून शांत, संयततेने आणि तेवढ्याच शिस्तबद्धतेने जीवनप्रवास करणारे कथाकार अगदी सहजपणाने मोकळे होत गेले. आठ दशकांचा हा प्रवास. त्यात कळणारी… दशके सात निश्‍चितच आहेत. एवढ्या प्रवासात मुक्तीपूर्वीच्या आणि मुक्तीनंतरच्या गोव्याचे चित्र ते सांगत असलेल्या आठवणीतून प्रतिबिंबित होत होते. प्रसिद्धीपासून अलिप्त राहूनच नेकीने व्यवसाय करताना समाजभान बाळगणार्‍या या कुटुंबवल्सल कथाकाराच्या आठवणी ऐकताना सांस्कृतिक-साहित्यिक दस्ताऐवजाने माझ्याही मनाला उन्नत केले. खरे तर अशी माणसे आणि त्यांच्याकडे असलेल्या अभिजात आठवणींचा खजिना ऐकणार्‍याच्या जीवनाला व्यापकता आणि खोली बहाल करतात. मोकळेपणाने कसे गायचे, स्वच्छंदी जगायचे, मुक्तपणे विहरायचे- गाणे, फिरणे, चांदणे आणि आपल्या जवळच्यांशी जीवाभावाने बोलणे ही बोरकरांची आनंदयात्रा कामतानी त्यांच्या सहवासात अनुभवली. हा त्यांच्यासाठी सहज योगायोग असेलही; परंतु आमच्या पिढीला या सांस्कृतिक संचिताचे नुसते अनुभव जरी ऐकता आले तरी त्याच्यातील सार्थकता जगणे उन्नत करणारी ठरते.
कलावंत हा मनस्वीपणा आणि कलंदर वृत्ती घेऊनच पुढे पुढे जात असतो. तिथे निव्वळ पैसा, प्रतिष्ठा यासाठी ती कला नसते तर त्यात आत्मानंद सामावलेला असतो. जे साहित्यात अवतरते ते जगण्यातही मुरवावे लागते तेव्हाच कोठे अनुभवांचे सररशीतपण जीवनात उत्साह निर्माण करते. गुलमोहराच्या सदासतेज लावण्यातून ते प्रतिबिंबित झालेले आहेच. त्याबरोबरीने असे एक घर ज्या घराला भक्ती-प्रीती आणि रूप-रंग-रस-गंधादी संवेदनानुभूतीचा बोरकरांच्या माध्यमातून स्पर्श झालेला आहे. त्या आठवणींत जेव्हा कान-मन आतूर होते तेव्हा पार नदीकाठावर स्थित असलेल्या घरातील जयराम कामतांच्या सहवासातील भर दुपारसुद्धा सांजबावरी होते. नदीच्या झुळझुळत्या पाण्यावर जणू काही बोरकरांच्या आठवणींच्या चांदणवेलीच हालत-झुलत असल्याचा भास होत होता. बोरकरांच्या काव्यगायनाची बेहोशी जयराम कामतांनी प्रत्यक्षात अनुभवली. त्यांच्या आठवणी माझ्यासमोर जागवताना मी मात्र त्या भावचित्रात समरस व्हायचा प्रयत्न करीत होते. गाणं आणि चांदणं यावर मनसोक्त प्रेम करणारे ‘पोएट बोरकर’ त्यांच्या लकबीसह जयराम कामत आपल्यासमोर उभे करतात तेव्हा मला तो काळ आठवतो.
अशा किती किती म्हणून सरस्वतीच्या उपासकांची पावले या घराला लागली असतील. तिन्हीसांजेला पाडगावकर- बोरकरांची सुरू झालेली काव्यमैफल सकाळी साडेचार वाजता संपलेली या घराने पाहिलेली आहे. कवितेचा आस्वाद, तिचे संगीतातील मुलरेपण या घराने अनुभवलेले आहे. या काव्यमैफलीनी घराला सळसळता उत्साह बहाल केला आहे. तो उत्साहाचा, नितळ मोकळेपणाचा प्रवाह या घरातील प्रत्येक व्यक्तिमत्वात त्याचसाठी तर स्थिरावलेला आहे! नितळ, पारदर्शी होत कुटुंबवाल्सल्य जतन करताना आपुलकी, जिव्हाळ्याने अनुबंध कसे जुळवायचे हे या घराला त्यामुळेच तर जमले. संस्कार, संस्कृती, परंपरा यांचा समन्वय साधताना घराच्या घरपणाला तेवढ्याच प्रेमाने स्वीकारते. भावगंधीतही करते. दूरातील इंद्रनिळ्याची किमया साधते.