गुरू-शिष्य दोघांची पौर्णिमा ः गुरुपौर्णिमा

0
282
  • प्रा. रमेश सप्रे

गुरुपौर्णिमेसारखा हृदयस्पर्शी कार्यक्रम आता अनेक ठिकाणी साजरा केला जातो. पण त्यातला जिव्हाळा, ओलावा हरपून गेल्यासारखा वाटतो. मुळात ‘गुरुपौर्णिमा’ हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे. गुरूविषयी असलेला आदर, प्रेम, ऋणभावना व्यक्त करण्याचा उत्सव आहे. आपल्या देशातल्या गौरवशाली गुरू-शिष्य परंपरेला उजाळा देण्याचा दिवस आहे. त्याची पार्श्‍वभूमी आजही प्रेरणादायी आहे.

एका कीर्तनकाराला- जो चांगला व्याख्याता व प्रवचनकारही होता- एक आमंत्रण आलं. संस्कृत- संस्कृती- संस्कार मानणार्‍या शिक्षणसंस्थेतून आलेल्या त्या आमंत्रणाचं काय करावं, ते स्वीकारावं की नाही या विचारात कीर्तनकारबुवा पडले. कारण संस्थेचे प्रधानाध्यापक सांगत होते, ‘‘गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरुपौर्णिमा’ याच विषयावर बोला. पण त्यात आध्यात्मिक असं काहीही नको. सांस्कृतिक- ऐतिहासिक- सामाजिक दृष्टिकोनातून विषय मांडला जावा.’’ त्यांच्या स्वरात विनय होता, पण सांगणं विचित्र होतं. बुवा म्हणाले, ‘‘पौर्णिमा ही पंधरावी तिथी. या दिवशी आकाशात पूर्ण चंद्र दिसतो तो का दिसतो- तसा का दिसतो अशा रीतीनं भौगोलिक माहिती सांगता येईल. पण गुरूबद्दल काय सांगायचं. त्याच्याभोवती आध्यात्मिक वलय नसतं? गुरू काय फक्त शासनाकडून पगार घेणारा नोकर किंवा शिक्षक आहे? गुरू- शिष्य- गुरुशिष्य परंपरा याविषयी बोलताना आध्यात्मिक स्पर्श न करता बोलणं अशक्य आहे.’’ त्यांनी ते आमंत्रण नाकारलं हे सांगायला नको.
हल्ली सर्वत्र हा अनुभव येतो. पूर्वीचे उत्सव, सोहळे, समारंभ आता ‘इव्हेंट्‌स’ बनलेत. दुर्दैवानं पूर्वी शैक्षणिक संस्थांतून साजरे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आता त्यातली संस्कृती हरवून बसलेत. गुरुपौर्णिमेसारखा हृदयस्पर्शी कार्यक्रम आता अनेक ठिकाणी साजरा केला जातो. पण त्यातला जिव्हाळा, ओलावा हरपून गेल्यासारखा वाटतो. मुळात ‘गुरुपौर्णिमा’ हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे. गुरूविषयी असलेला आदर, प्रेम, ऋणभावना व्यक्त करण्याचा उत्सव आहे. आपल्या देशातल्या गौरवशाली गुरू-शिष्य परंपरेला उजाळा देण्याचा दिवस आहे. त्याची पार्श्‍वभूमी आजही प्रेरणादायी आहे.
प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती. अरण्यातल्या आश्रमातून विद्यादानाचं जे पवित्र कार्य चालू असे त्यातील गुरू, शिष्य, गुरुपत्नी, इतर सहाय्यक सेवक मंडळी यांचा एक विशाल परिवार एकत्र राहत असे. परस्परातील स्नेह, सेवाभाव, त्यागभावना यांनी ही सारी मंडळी एकसूत्रात बांधलेली असे.
एका व्यापक अभ्यासक्रमाची पूर्णता करण्यात गुंतलेल्या या गुरू-शिष्य परिवाराची शिक्षणसत्रं (टर्म्स) असत. त्यावेळच्या प्रथेनुसार आषाढी पौर्णिमेला एक शिक्षणसत्र संपून एका मासाचा अवकाश (व्हेकेशन) असे. पुढच्या म्हणजे श्रावणी पौर्णिमेला नवं शिक्षणसत्र आरंभ होत असे. या दोन्ही सत्रांना साजरं करण्यासाठी मोठे अर्थपूर्ण, प्रतीकात्मक असे समारंभ असत.
सत्रसमाप्तीला अर्थातच आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपूजन, गुरुदक्षिणा, गुरुसमर्पण करण्याचा कार्यक्रम असे. आषाढ मासातील पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ म्हणण्याचा प्रघात पडला, तर नव्या सत्राला सुरुवात होत असे श्रावण मासातील पौर्णिमेला, ज्या दिवशी गुरू मोठ्या प्रेमानं, विश्‍वासानं, अपेक्षेनं आपल्या शिष्याच्या मनगटावर सूत्र बांधून गुरु-शिष्य परंपरा अखंड राखण्याचा संदेश देत असे. याला ‘सूत्रपौर्णिमा’ (सुतां पुनव) म्हणण्याची प्रथा पडली. आज आपलं यज्ञोपवीत (जानवं) बदलणं आणि नंतरच्या काळात अस्तित्वात आलेल्या बहिणीनं भावाच्या मनगटावर राखी बांधून भाऊरायाला आपल्या बहिणीच्या रक्षणाची स्मृती करून देणार्‍या रक्षाबंधनाचं स्वरूप प्राप्त झालं. हे सारे संस्कार अतिशय प्रेरक नि तेजस्वी परंपरेचे प्रतीक बनले.
पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्ण अवस्थेची तिथी आहे. आपलं कालमापनाचं, कालनिर्णयाचं पंचांग हे चांद्रपंचांग आहे. आजचं व्यवहारातलं पंचांग हे सौरपद्धतीनं कालगणना करणारं पाश्‍चात्त्य कॅलेंडर आहे. सूर्य आणि चंद्र दोन्हीही पृथ्वीवरील सार्‍या सजीव-निर्जीव सृष्टीवर प्रभाव टाकणारे घटक आहेत. सार्‍या चराचरातील चैतन्यावर, ऊर्जेवर या दोघांचाही परिणाम सतत घडत असतो. गुरूसुद्धा सूर्यचंद्रासारखा असतो. विचार (ज्ञान) आणि भावना (भक्ती) यांचे संस्कार अभिषेकतत्त्वाने म्हणजे नित्यनिरंतर आपल्या प्रिय शिष्यांवर घडवत असतो. चंद्र हा सार्‍या रसांचा अधिपती मानला जातो. पृथ्वीवरील सार्‍या रसांवरच नव्हे तर रसस्रोतांवर म्हणजे रसांच्या उगमांवर चंद्राची जणू सत्ताच असते. पौर्णिमेला सागर पृथ्वीवर राहूनच उचंबळून आपल्या आकाशातील स्वामीची (चंद्राची) गळाभेट घेतो. अधिकाधिक सागरभरती पुनवेला असते. फळातले गर पौर्णिमेच्या अलीकडे-पलीकडे अधिक रसरशीत बनतात. गीतेत भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे, परमेश्‍वरच चंद्र बनून पृथ्वीवरील सर्व वनस्पतीतील रसांचं पोषण करतो. ‘पुष्णामि चौषधिः सर्वा सोमोभूत्वा रसात्मकः’ (अ. १५). फक्त वनस्पतीच नव्हे तर मानवाच्या शरीरातील सर्व प्रकारच्या रसांचा परिपोष (पोषण) चंद्रामुळे होते.
– अशा चंद्राची पूर्ण अवस्था म्हणजे पौर्णिमा. गुरूच्या प्रेमाची पूर्ण विकसित अवस्था जशी गुरुपौर्णिमा, तशीच पुत्रवत असलेल्या शिष्यांच्या भावाची परिपूर्ण फुललेली, मोहरलेली अवस्था म्हणजेही गुरुपौर्णिमाच! अशी गुरू व शिष्य अशा दोन्ही दिशांनी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. शिष्य गुरुचरणी समर्पित होतो त्याचवेळी त्याला उभारून, आपल्या हृदयाशी धरून गुरू त्याला आलिंगन देतो.
गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे (विशेषतः दूरचित्रवाणी, टीव्ही) गुरुपौर्णिमेसारख्या पारंपरिक उत्सवांचं पुनरुज्जीवन झालंय. अन् अलीकडे तर समाजमाध्यमांच्या (सोशल मीडिया) आश्‍चर्यजनक प्रसारामुळे (उदा. फेसबूक, ट्विटर, ब्लॉग्ज इ.) गुरुपौर्णिमेला एका अर्थानं ऊत आलाय. काहीसं दिखावटी स्वरूपही आलंय. यासंदर्भात एक प्रसंग जो दूरदर्शनच्या पडद्यावरून असंख्य लोकांनी पाहिला तो सांगण्यासारखा आहे. त्यावेळची एक उदयोन्मुख गायिका जी आता चांगल्यापैकी प्रसिद्ध झालीय- तिचा दूरदर्शनवरचा गायनकला सादरीकरणाचा पहिलावहिला कार्यक्रम. निमित्त होतं गुरुपौर्णिमा उत्सावाचं. तिचा एकच आग्रह- ‘मी माझ्या गुरुदेवांची साग्रसंगीत पूजा करूनच कार्यक्रमाला सुरुवात करणार.’ एका दृष्टीनं तो तिच्या गायकीच्या कारकिर्दीचा श्रीगणेशाच होता. दूरदर्शनच्या धोरणात अशी प्रत्यक्ष पूजा बसत नव्हती. तसं सागितलं गेल्यावर त्या गायिकेनं तो कार्यक्रमच नाकारायची इच्छा व्यक्त केली. नंतर पुनर्विचार केल्यावर कोणत्याही क्षेत्रातला गुरू (सद्गुरू) हा सर्वोपरी म्हणजे धर्म-पंथ-जात-वर्ण या सर्वांहून श्रेष्ठ असल्याचं ठरून तशी गुरुपूजा करण्यास अनुमती दिली गेली आणि एक सर्वांगसुंदर, भक्तिभावयुक्त, हृद्य कार्यक्रम सादर केला गेला. ज्यांनी तो पाहिला त्या भाग्यवंतांना गुरुपौर्णिमेचं रहस्य मनोमन कळलं.
तशी गुरुपूजा एकलव्य-निष्ठेनेही करता येते. साक्षात गुरूचं अवचित झालेलं दर्शन ही एकलव्याची गुरुपौर्णिमाच होती.
एखादा अर्जुन आपलं सर्व‘स्व’ गुरूच्या पायी समर्पण करून सर्वश्रेष्ठ धनुर्धारी वीर बनतो. त्याचवेळी प्रत्यक्ष गुरू ‘द्रोण’पुत्र अस्वत्थामा गुरूला आपला अहंकार अर्पण न करता विद्या मिळवतो नि पुत्रशिष्य असूनही सर्वश्रेष्ठ स्थानापासून दूरच राहतो. गुरुपौर्णिमा अशी दोघांचीही असते. पितास्वरूप गुरूची, तशीच पुत्ररूप शिष्याची!
सर्व गुरूंचे परात्पर गुरू दत्तात्रेय (गुरुदेव दत्त) आणि आदिगुरू महर्षी वेदव्यास यांच्या पूजनाचा कार्यक्रम असतो सर्वत्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तो त्या उत्सवाचाच एक महत्त्वाचा भाग असतो. गुरू-सद्गुरू यांचं असं काय महत्त्व आहे? याविषयी दासबोधात फार सुबोध वर्णन आलंय. गुरूचं स्वरूप, कार्य, रहस्य नि माहात्म्य यांच्याविषयी सांगताना ‘गुरुस्तवन’ नावाच्या समासात समर्थ रामदास स्वामी गुरूला (सद्गुरूला) निरनिराळ्या उपमा देऊन त्या कशा अयोग्य, अपूर्ण आहेत हे सांगून गुरू कसा अनुपम, निरुपमेय, एकमेवाद्वितीय आहे याचे वर्णन करतात-
परीस ः परीस आपणा ऐसे करीना| सुवर्णें लोहो पालटेना… पण
शिष्यास गुरुत्व प्राप्त होये| सुवर्णें सुवर्ण करितां न ये
सागर ः उपमे द्यावा सागर| तरी तो अत्यंतचि क्षार (खारट) …पण सद्गुरू अमृतमधुर असतो.
मेरुपर्वत ः उपमे द्यावा मेरू| तरी तो जड पाषाण कठोरू|
तैसा नव्हे सद्गुरू| कोमल दीनाचा (मनाचा)|
गगन ः उपमे म्हणो गगन| तरी ते असे निर्गुण… सद्गुरू मात्र सगुण साकार साक्षात् असतो.
जगत ः धीरपणे उपमू जगती| तरी ते खचेल कल्पांती|
म्हणून धीरतास दृष्टांती| हीण वसुंधरा|
सूर्य (गभस्ती) ः आतां उपमाना गभस्ती| तरी गभस्तीचा प्रकाश किती| ….गुरूचा प्रकाश तापहीन प्रचंड.
जळ ः उपमे द्यावें जळ| तरी ते काळांतरी आटेल सकळ| …पण सद्गुरू निश्‍चल शाश्‍वत.
अमृत ः सद्गुरूसी उपमावें अमृत| तरी अमर (अमृत पिणारे देव) धरती मृत्युपंथ|
सद्गुरूकृपा यथार्थ| अमृत करी॥
कल्पतरू ः सद्गुरूसी म्हणावे कल्पतरू| तरी सद्गुरू हा कल्पनातील विचारू| …अन् आपल्यालाही बनवले.
चिंतामणी ः चिंता मात्र नाहीं मनी| कोण पुसे चिंतामणी| …सद्गुरू चिंतामुक्त असतो.
कामधेनू ः कामधेनूची दुभणी| निःकामासी न लगती| …सद्गुरू कामना-वासनाशून्य असतो.
लक्ष्मीवंत ः सद्गुरू म्हणो लक्ष्मीवंत| तरी ते लक्ष्मी नाशिवंत|
ज्याचे द्वारी असे तिष्ठत| मोक्षलक्ष्मी|
ब्रह्मा-विष्णू-महेश ः हरिहर ब्रह्मादिक| नाश पावती सकळिक|
सर्वदा अविनाश येक| सद्गुरूपद|
अशा अनेक वस्तूंशी, व्यक्तींशी तुलना केल्यावर सद्गुरू या सर्वांपेक्षा कसे ज्येष्ठ-श्रेष्ठ असतात हे सांगताना समर्थ म्हणतात-
म्हणोनि सद्गुरू वर्णवेना| हे गे हेचि माझी वर्णना|
अंतरस्थितीचिया खुणा| अंतर्निष्ठ जाणती॥
हे एवढं विस्तारानं सांगण्याचा हेतू सद्गुरूंची महती, सद्गुरूपदाचं माहात्म्य आपल्या लक्षात यावे नि त्यायोगे गुरुपौर्णिमेला मनोभाव शरण जावे हाच आहे.
ही कितवी गुरुपौर्णिमा एकूण मानवी इतिहासातली, आपल्या जीवनातली असा विचार किंवा हिशेब करण्यात शहाणपणा नसतो. प्रत्येक गुरुपौर्णिमा ही आपली पहिलीच गुरुपूजनाची, व्यासपूजनाची संधी असं समजून सर्वभारे, मनोभावें सद्गुरूला पूर्ण व विनाशर्त शरण जावे…. गीतेत शेवटी शेवटी भगवंत सांगतातच ना-
ईश्‍वर ः
सर्वभूतानां हृद्देशेउर्जुन तिष्ठति| भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया॥
तमेव शरणं गच्छ… सर्वभावेन भारत॥
आत- हृदयात- ईश्‍वर (गुरूचं रूप घेऊन) सदैव उभा आहेच. एखादा चालक जसा आत बसून गाडीला चालवतो, ज्यात गाडीचं इंधन, पेट्रोल, डिझेल किंवा असंच काही असतं… पण शरीररथाचं इंथन असतं माया- प्रपंचाची आसक्ती, भोगांची इच्छा- आणि तो चालवणारा सारथी असतो परमेश्‍वर किंवा सद्गुरू किंवा परमेश्‍वरूपातला सद्गुरू! म्हणूनच तर सारं शिष्यविश्‍व (विद्यार्थिजगत) म्हणत आलंय व म्हणत राहील-
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः|
गुरूः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥