स्त्रिया कॅन्सरविषयी जागरूक आहेत का?

0
151

– मनाली पवार ( गणेशपुरी म्हापसा)

स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याबाबत थोडीशी जरी जागरुकता ठेवली म्हणजे संसाराचे व्यवस्थापन करता करता स्वतःच्या आरोग्य तपासणीचे एक वेळापत्रक आखलं तर अशा प्रकारच्या कॅन्सरचे वेळीच निदान होऊन उपचार घेता येतात. खासगी दवाखान्यात जरी कॅन्सरवरचे उपचार न परवडणारे असले तरी, सर्व उपचार शासकीय रुग्णालयात कमी दरात उपलब्ध आहेत. कॅन्सर म्हणजेच मृत्यू हे समीकरण मांडून, आरोग्याची हेळसांड करू नका.

आज केवळ आपल्याच देशात नाही तर सर्वच प्रगत, अप्रगत, विकसित, अविकसित, विकसनशील देशात स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. स्त्री विशिष्ट असे स्तन कॅन्सर, गर्भाशय मुख कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर, अंडाशयाचा कॅन्सर यांची झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अंडाशयाचा कॅन्सर सोडल्यास इतर सर्व कॅन्सर प्रथमावस्थेत निदान करता येतात. मग योग्य उपचार, योग्य आहार-विहाराने या कॅन्सरपासून मुक्तता ही मिळू शकते. पण तरीही आजही स्त्रिया स्तनाच्या कॅन्सरने किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरने का मृत्युमुखी पडतात? उत्तर सोपं आहे ‘जागरूकता’. स्त्रीने स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोन व स्वतःच्या आरोग्याबद्दल असलेली जागरूकता!!
फक्त आजार जडल्यावर किंवा आजार तुमच्या शरीराला खाऊन टाकल्यावरच हॉस्पिटलची पायरी तुम्ही चढणार का? बर्‍याचवेळी स्त्रिया स्वतःच्या आरोग्याला दुय्यम महत्त्व देतात. बारीक-सारीक कारणांसाठी डॉक्टरकडे जाऊन का पैसे घालवायचे? असा विचार करतात. पण हीच निष्काळजी पुढे महागात पडते व स्त्रिला जीव गमवावा लागतो.
पूर्वी स्त्रिया निदाना अभावी मृत्युमुखी पडायच्या, पण आज परिस्थिती बदलली आहे. आज कॅन्सरसारख्या व्याधीवर संशोधन झाले. विविध तपासण्या विकसित झाल्या, जेणेकरून योग्य निदान होऊ शकते. फक्त गरज आहे ती स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडे डोळसपणे पाहून जागरूक राहण्याची. किरकोळ लक्षणे जरी शरीरामध्ये दिसायला लागली तरी ती अंगावर सोसून न धरता योग्य डॉक्टराचा सल्ला घेण्याची.
भारतात पूर्वी मुलींची लग्ने लवकर व्हायची, बाळंतपणं ही जास्त व्हायची व ती घरीच व्हायची, जंतुसंसर्गाचे प्रमाणही जास्त व असुरक्षित शरीरसंबंध या सर्वांचा परिणाम स्वरुपी गर्भाशय मुख कॅन्सर किंवा गर्भाशय कॅन्सरचा धोका जास्त होता. निदानाअभावी व उपचाराअभावी स्त्रियांना आपले प्राण गमवावे लागे. आजही परिस्थिती काही वेगळी नाही. फक्त कारणे बदलली. वयाच्या १८ व्या वर्षाआधी संभोग, बदलती लाईफस्टाईल, उशिरा गर्भधारणा, एकाहून अधिक पुरुषांबरोबर लैंगिक संबंध, योनिमार्गाची अस्वच्छता, तंबाखू सेवन, वंध्यत्व, मानसिक ताण, वारंवार हार्मोन्सच्या गोळ्यांचे सेवन. अशा प्रकारच्या वारंवार हेतू सेवनाने गर्भाशय मुख कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर किंवा अंडाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढू लागले आहे. धावत्या जीवनशैलीमुळे प्राथमिक निदान न होता कॅन्सरचे निदान शेवटी होते व उपचार करायलाही वेळ मिळत नाही.
पूर्वी स्तनाचा कॅन्सर त्या मानाने कमी प्रमाणात आढळायचा. आता भारतात स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळतो तो स्तनांचा कॅन्सर. महिला करिअर ओरिएन्टेड झाल्याने अविवाहित व अपत्यहीन स्त्रियांचे प्रमाण वाढले आहे. स्त्रियांचा विवाह उशिरा तसेच पहिले अपत्यही तिशीच्या पुढेच. त्यातच नोकरी-व्यवसायामुळे बालसंगोपन दुसर्‍याच्या हाती व ‘स्तनपान’ अगदी किरकोळ. परिणामी वंध्यत्वाचे प्रमाण वाढल्याने स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. वेळोवेळी स्तनांचे स्वतःच परिक्षण केल्यास व एखादी गाठ आढळल्यास त्याचे परीक्षण वेळीच केल्यास स्तनांमधील कॅन्सरचेही वेळीच निदान होवू शकते. स्तनाच्या कॅन्सरचा प्रसार होण्यापूर्वी रोखू शकतो.
अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्येही स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण भारताच्या तुलनेत जास्त आहे. पण मृत्यूदर मात्र भारतीय स्त्रियांच्या तुलनेत कमी. अमेरिकेमध्ये कॅन्सरचा क्यूअर रेट ८०-८५ टक्के तर भारतात फक्त पन्नास टक्के. असे का? कारण भारतीय स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे निष्काळजीपणा करतात. घरातील इतर व्यक्तींची काळजी घेण्यात व करण्यातच धन्य समजतात. पण जर संसाराचा कणाच जर वाकला तर संसार उभा कसा राहणार? हे साधं गणित स्त्रियांना मांडता येत नाही.
इतर प्रगत देशात जे उपचार व निदान करण्यासाठी तपासण्या, यंत्र-साधने आहेत ती भारतात सुद्धा उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा या आजारातील स्त्रियांचा मृत्यूदर भारतातच जास्त का? हे प्रत्येक स्त्रीने स्वतःला विचारावे व यावर विचार करावा.
या प्रश्‍नांची उत्तरे प्रत्येक स्त्रीकडेच आहेत. कारण आहे स्वतःकडे होणारं दुर्लक्ष्य, रोगांच्या प्राथमिक लक्षणांकडे केला जाणारा कानाडोळा, कॅन्सर झाला हे समजल्यावरही उपचारात होणारी दिरंगाई, नियमित तपासणी, फॉलोअपकडे केलं जाणारं दुर्लक्ष, अर्धवट उपचार.
स्त्रियांमध्ये आढळणार्‍या चार कॅन्सरपैकी तिन्ही कॅन्सरची प्राथमिक लक्षणं स्त्रिला जाणवतात. आपल्या शरीरात नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी घडतंय हे स्त्रिला सहज समजतं, कळतं पण पाय काही केल्या डॉक्टराकडे काय वळत नाही. अपवाद फक्त अंडाशयाच्या कॅन्सरचा. या कॅन्सरचे निदान बहुतांश स्त्रियांमध्ये कॅन्सरच्या तिसर्‍या किंवा चौथ्या टप्प्यातच होते. अंडाशयास गाठ झाली तरी, तिथली नियमित कार्ये चालू असतात. त्यामुळे तिथल्या गाठीला वाढण्यास वाव मिळतो, त्यामुळे रुग्णावर लक्षणेही फार उशिरा व्यक्त होतात व रुग्ण गाफील राहतो. पण स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर या तिन्ही कॅन्सरच्या लक्षणांकडे जर स्त्रियांनी दुर्लक्ष न करता योग्य वेळी प्राथमिक अवस्थेतच ओळखली तर या कॅन्सरचे निदान प्रथमावस्थेत होवून औषधोपचार लवकर सुरू करून, कॅन्सरपासून मुक्तता होवू शकते. अगदी केमोथेरॅपी किंवा रेडिओथेरॅपी घेण्याचीही गरज भासत नाही.
धोक्याची घंटा वाजवणारी लक्षणे –
– स्तनाच्या कॅन्सरमध्ये दिसणारी लक्षणे
१) स्तनांमध्ये गाठ किंवा स्पर्शास लागणे.
२) स्तनांच्या ठिकाणी ताठरता.
३) स्तनाच्या ठिकाणी सूज किंवा बारीक खळगा पडणे.
४) स्तनाच्या ठिकाणी न थांबणारी खाज.
५) स्तनाग्र किंवा त्याच्या बाजूच्या भागात पांढरेपणा किंवा तांबूसपणा.
६) स्तनाच्या आकारात लक्षणीय बदल.
७) स्तनाग्रातून स्त्राव होणे.
८) स्तन दुखणे.
गर्भाशयमुखांच्या कॅन्सरमधील लक्षणे –
१) योगिमार्गातून प्रमाणाबाहेर सफेद स्त्राव – अनेकदा दुर्गंधीयुक्त
२) योनिमार्गातून प्रमाणाबाहेर रक्त मिश्रित स्त्राव.
३) दोन मासिक पाळ्यांमध्ये होणारा रक्तस्त्राव.
४) संभोगानंतर रक्तस्त्राव.
५) मासिक पाळी थांबल्यानंतर रक्तस्त्राव.
गर्भाशय कॅन्सरमधील लक्षणे –
१) मासिक स्त्राव व्यतिरिक्त होणारा विकृत योनिगत रक्तस्त्राव.
२) दुर्गंधी श्‍वेतस्त्राव.
३) रजोनिवृत्तीनंतर होणारा योनिगत रक्तस्त्राव.
असा काही त्रास किंवा अशी काही लक्षणे जर तमच्या शरीरात आढळल्यास, तर अंगावर काढू नका. आजचं उद्यावर ढकलू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन शंकेचे समाधान करून घ्या. ही सर्वच लक्षणे कॅन्सर सूचक जरी नसली तरी काळजी घ्यायला काय हरकत आहे?
प्रथमावस्थेतच निदान व्हायला काय तपासणी कराल?
– वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीनं वर्षातून एकदा मॅमोग्राफी करावी आणि वयाच्या पच्चावन वर्षानंतर दर दीड वर्षाने मॅमोग्राफी करून घ्यावी. यातून स्तनांचा कॅन्सर प्राथमिक अवस्थेतच ओळखता येऊ शकतो.
– गर्भाशयमुखाच्या कॅन्सरसाठी पॅप तपासणी करावी. ही तपासणी ३० वर्षांवरील स्त्रियांमध्ये ३ वर्षांतून एकदा करून घ्यावी.
– गर्भाशयाच्या व अंडाशयाच्या कॅन्सरसाठी सोनोग्राफी दरवर्षी एकदातरी करून घ्यावी.
या तपासण्या लक्षणे दिसू लागल्यावर नव्हे तर निरोगी किंवा कोणताही त्रास नसला तरी करून घ्याव्यात.
तसेच बर्‍याच वेळा कॅन्सरमध्ये कारण अनुवंशिक असू शकते, त्यामुळे आपल्या कुटंबात जर आपल्या आईला, बहिणीला, मावशी किंवा आत्याला स्तनाचा, गर्भाशयाचा कॅन्सर झालेला असेल तर आपल्याला वयाच्या चाळीशीनंतर हालचाली करणे गरजेचे आहे. म्हणजेच नियमित तपासण्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हायलाच हव्या.
स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याबाबत थोडीशी जरी जागरुकता ठेवली म्हणजे संसाराचे व्यवस्थापन करता करता स्वतःच्या आरोग्य तपासणीचे एक वेळापत्रक आखलं तर अशा प्रकारच्या कॅन्सरचे वेळीच निदान होऊन उपचार घेता येतात. खासगी दवाखान्यात जरी कॅन्सरवरचे उपचार न परवडणारे असले तरी, सर्व उपचार शासकीय रुग्णालयात कमी दरात उपलब्ध आहेत. कॅन्सर म्हणजेच मृत्यू हे समीकरण मांडून, आरोग्याची हेळसांड करू नका.
कॅन्सर प्रतिबंध उपाय फक्त स्त्रियांसाठी –
– सकस घरचं जेवण.
– नियमित व्यायाम करून वजनावर लक्ष ठेवणे.
– ताण-तणावापासून मुक्त राहण्यास योग, प्राणायाम, ध्यानाचा अवलंब करणे.
– रजःप्रवृत्ती सुरू होईपर्यंत बालिकांमध्ये पोषक आहार, योग्य व्यायाम व संगीत, नृत्य, कला, खेळ यासारख्या मन प्रसन्न ठेवणार्‍या गोष्टी करणे.
– दिनचर्या, ऋतुचर्येचा अवलंब करून मासिकपाळी दरम्यान रजःस्वला परिचर्या पालन, गर्भधारणेपूर्वी शरीर शोधन, गर्भधारणेनंतर गर्भिणी परिचर्या पालन व प्रसुतीनंतर सुतिका परिचर्या पालन करावे.
– ३५ व्या वयानंतर वसंत ऋतूत वमन उपक्रम विशेषतः स्तनांचा कॅन्सर टाळण्यासाठी करावा.