झोजिला’च्या पलीकडे

0
212

चिनार डायरीज्
परेश वासुदेव प्रभू

धुमसत्या काश्मीरमध्ये पावलोपावली सशस्त्र जवान तैनात आहेत. पण सोनमर्गहून जरा पुढे गेले आणि अमरनाथकडे जाणारा बालटालचा मार्ग उजवीकडे सोडून झोजिला खिंड ओलांडली की वेगळेच चित्र दिसायला सुरूवात होते. झोजिला हे लेह – लडाखचे महाद्वार. लेह आणि लडाख हेही जम्मू काश्मीर राज्याचेच भाग, परंतु भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, संस्कृती हे सगळेच पूर्ण वेगळे आहे. अत्यंत बिकट मानला जाणारा झोजिलाचा खडतर घाट ओलांडला की सुरू होतो द्रास, कारगिलचा प्रदेश. कारगिल युद्धात जेथून आपल्या तोफा वरच्या डोंगरशिखरांकडे तोफगोळ्यांचा मारा करायचा तेच हे द्रास. सैबेरियानंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाचे वस्ती असलेले थंड ठिकाण म्हणून द्रासचा लौकीक आहे. दोन्ही बाजूंनी असलेल्या बर्फाळ पहाडांच्यामध्ये एखाद्या तबकासारखा हा सर्वांत थंड भाग वसलेला आहे. उंची आहे ३२८० मीटर म्हणजे सुमारे १०९९० फूट. त्यामुळे उन्हाळ्यातही थंडी कडाक्याचीच असते. बाजूच्या पर्वतशिखरांची उंची तर १६ ते २१ हजार फूट आहे.
हिवाळ्यात शून्याच्या खाली पंचेचाळीस अंशांपर्यंत येथला पारा जातो. कारगिलचे युद्ध खरे तर कारगिलमध्ये नव्हे, याच द्रासमध्ये लढले गेले. ज्याला आपण कारगिलचे विजय स्मारक म्हणून ओळखतो, ते स्मारकही खरे तर तोलोलिंग पहाडाच्या तळाशी याच द्रासमध्ये उभारले गेले आहे. तेथील वीरभूमी पाहताना आपलेही डोळे पाणावतात. द्रासच्या पर्यटक बंगल्याजवळून ‘टायगर हिल’ स्पष्ट दिसतो. काश्मीर खोर्‍याला लेह – लडाखला जोडणार्‍या याच राष्ट्रीय महामार्गावर पाकिस्तानने बाजूची शिखरे काबीज करून मारा चालवला होता. भारत – पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जवळच असल्याने हा रस्ता पाकिस्तानच्या मार्‍याच्या टप्प्यात येतो. त्यामुळे रस्त्याच्या त्या बाजूला भक्कम तटबंदी उभारली गेली आहे. मात्र, पाकिस्तानच्या तोफगोळ्यांच्या मार्‍यात तीही ठिकठिकाणी ढासळलेली आहे. प्राचीन ‘सिल्क रूट’ तो हाच. चीन, मध्यपूर्व आशिया ते अफगाणिस्तानपर्यंतचे तांडे येथून ये – जा करायचे.
द्रासहून द्रौपदी कुंड, भीमबट वगैरे पौराणिक ठिकाणे ओलांडल्यावर सुरू नदीच्या काठावरचे कारगिल येते. हीच नदी पुढे पाकिस्तानात जाऊन सिंधू नदीला जाऊन मिळते. लडाखी संस्कृतीच्या खुणा दिसायला लागतात. उघड्याबोडक्या पहाडांवर लेणी असावीत, तशा घरांच्या रांगा दिसू लागतात. स्थानिकांच्या चेहर्‍याची ठेवणही इतर काश्मिरींपेक्षा वेगळी दिसते.
कारगिलमध्ये लष्करी सुरक्षेचा लवलेश नाही, कारण येथे काश्मीरप्रमाणे अशांतता अजिबात नाही. काश्मीर खोर्‍यात सुन्नी मुसलमानांचे प्राबल्य आहे, तर येथे शियांचे. राष्ट्रीय वृत्तीचे येथे घडणारे दर्शन सुखावणारे आहे. पण तरीही वाटेत खोमेनीचे छायाचित्र दिसलेच. कारगिलमध्ये ‘द कारगिल’ या दोन महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या हॉटेलमध्ये आम्हाला काश्मीरप्रमाणेच जंगी मेजवानी दिली गेली. हॉटेलच्या आवारातच सुरक्षित बंकर आहे. पाकिस्तानी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून जवळ असल्याने ही आपत्कालीन प्रसंगासाठीची तरतूद! कारगिलच्या मंडळींनी आमच्यासाठी बाजूच्या सुरू खोर्‍याच्या सफरीचे आयोजन केले होते.
कारगिल ही केवळ विजयभूमी नाही. येथे त्याहून पुरातन आणि प्रेक्षणीय असे खूप काही आहे हे ही मंडळी आवर्जून सांगत होती. पण कारगिल म्हटले की ९९ चे युद्धच आठवते याची त्यांना खंत आहे. वैराण कारगिलच्या पार्श्वभूमीवर बाजूचे सुरू खोरे खरोखरच अतिशय प्रेक्षणीय आणि पहलगामची आठवण करून देणारे आहे. सुप्रसिद्ध झंस्कार खोर्‍याकडे जाणार्‍या रस्त्याने जाताना पेन्सी ला पर्यंत हे दीडशे किलोमीटरचे खोरे लागते. नुन आणि कूनच्या सुप्रसिद्ध हिमशिखरांचे दर्शन आपल्याला या सफरीत घडते. येथील कार्त्से खरचा प्राचीन मैत्रेय बुद्धाचा वा काहींच्या मते अवलोकितेश्वराचा कोरीव पुतळा पाहायचा असेल तर अत्यंत ओबडधोबड रस्त्याने आडबाजूला जावे लागते. अखंड दगडात कोरलेला अलंकारांनी सजलेल्या मैत्रेय बुद्धाचा हा पुतळा आज बामियॉंच्या मूर्ती उद्ध्वस्त झाल्यानंतर जगातील सर्वांत उंच बुद्धप्रतिमा ठरतो. मात्र, येथे पर्यटकांसाठी अद्याप सोयीसुविधा निर्माण झालेल्या नाहीत. परिसर मात्र दृष्ट लागण्यासारखा सुंदर आहे. विशेष म्हणजे या बुद्धप्रतिमेच्या परिसरात सारी मुसलमान वस्ती आहे, परंतु त्यांना त्याविषयी आस्थाच आहे. हा धार्मिक सलोखा कारगिलमध्ये सर्वत्र आहे. एके ठिकाणी तर एकाच भिंतीला जोडून मशीद आणि गुरूद्वारा आहेत. ‘हमें इसका फक्र है’ अशीच भावना स्थानिक याविषयी व्यक्त करतात. कारगिलच्या परिसरातील या सार्‍या समृद्ध व आपल्याला आजवर अपरिचित असलेल्या गोष्टींबद्दल विस्ताराने लिहायचे आहे. प्रस्तुत लेखमाला ही केेवळ काश्मीर समस्येसंबंधी लिहायला घेतली असल्याने येथे त्याविषयीचा अधिक तपशील अप्रस्तुत ठरेल.
पण अशांत काश्मीरला पर्याय म्हणून पर्यटक लेह – लडाखकडे वळू लागले असल्याने कारगिलच्या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा संकल्प स्थानिक जिल्हा प्रशासनाने आखलेला आहे. कारगिल स्पेस टुरिझमचे महंमद हमझा, काश्मीर विधानपरिषदेचे अध्यक्ष हाजी इनायत अली तसेच स्थानिक पर्यटनसंस्थांच्या प्रतिनिधींनी याविषयी सुरू असलेल्या प्रयत्नांची तपशीलवार माहिती दिली. हमझा यांनी तर कारगिलवरचे एकमेव माहितीपर पुस्तक लिहिले आहे.
कारगिलहून पदममार्गे मनालीपर्यंत रस्ता बनवला जाणार आहे. कारगिलमध्ये हवाई वाहतूक सुरू व्हावी असा प्रयत्न चालला आहे. येथील दूरसंचार व्यवस्थेची स्थिती अतिशय विदारक आहे, ती सुधारावी यासाठी हे लोक प्रयत्नशील आहेत. झोजिलाची वाट खडतर असल्याने कौटुंबिक पर्यटक सहसा या मार्गाने कारगिलला येत नाहीत आणि लेहला विमानतळ असला तरी तेथून कारगिल दूर आहे. त्यामुळे खुद्द कारगिलमध्ये छोटी विमाने उतरवता आली तर पर्यटन बहरेल असा या मंडळींना विश्वास आहे.
अमरनाथ यात्रेकरूंना सध्याचे काश्मीरमधून जाणारे बालटाल आणि चंदनवाडी हे दोन्ही मार्ग दहशतवादाने ग्रस्त असल्याने द्रासमधून अमरनाथ गुहेकडे जाणारा चढउतार नसलेला मार्ग विकसित करण्याचे प्रयत्न चालले आहेत. हा रस्ता झाला तर तेथून गुहा केवळ दहा किलोमीटरवर असेल अशी माहिती हाजी अनायत अलींनी दिली. हा रस्ता शांततामय असेल त्यामुळे यात्रेकरूंना तो सोयीचा ठरेल असेही त्यांनी सांगितले.
कारगिलच्या परिसरात, सुरू आणि इतर खोर्‍यांमध्ये साहसी पर्यटनाला फार मोठा वाव आहे. त्याला प्रोत्साहनाची जरूरी आहे.
कारगिलवासीयांमध्ये शिक्षणाविषयी आस्था दिसली. सुरू खोर्‍यात हिंडताना शाळेला चाललेली गोजिरवाणी मुले ठिकठिकाणी दिसत होती. त्यात मुलींचे प्रमाण अधिक दिसले. येथील कॉलेजमध्ये प्रवेशासाठी झुंबड उडते. पण सर्वांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने मुलींना तेथे प्रवेश दिला जातो आणि मुलांना काश्मीरमध्ये पाठवावे लागते, असे अनायत अलींनी सांगितले. आमच्याकडे लग्नात मुलीच्या घरच्यांना मुलाकडून हुंडा दिला जातो असेही त्यांनी सांगितले. कारगिलवासी स्वतःला लडाखी म्हणवून घेतात. खरे तर सहा – सात वंशांचे लोक या भागात राहतात, परंतु लडाखच्या समृद्ध संस्कृतीचा आपण भाग आहोत याचा अभिमानाने उल्लेख केला जातो. या भागात नऊ नद्या आहेत, ज्या पाकिस्तानात जातात. काही नद्यांचा प्रवाह तर एके ठिकाणी पाकिस्तानात जातो, पुन्हा भारतात येतो, पुन्हा पाकिस्तानात जातो, असा प्रकार आहे.
कारगिल – स्कर्दू मार्ग खुला करण्याचा विचार भारत सरकारकडून नेहमी बोलून दाखवला जातो, परंतु पाकिस्तानला ते झालेले नको आहे, कारण तसे झाले तर बाल्टीस्तानमधील त्या परिसरातील लोकांना कारगिलची समृद्धी आणि संस्कृती दिसेल आणि ते लोक बंड करतील अशी भीती पाकिस्तानला वाटते असे अनायत अलींनी सांगितले. त्यांचा हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे. काश्मीरमध्ये कितीही असंतोष दिसत असला, तरी येथील स्थिती नियंत्रण रेषेपलीकडील लोकांपेक्षा कितीतरी बरी आहे. परंतु पाकिस्तानच्या अपप्रचारात आणि धर्मांध विचारात हे सत्य झाकले गेले आहे.
चिनार डायरीज् ही गेल्या बुधवारी सुरू झालेली वृत्तमालिका आज बुधवारी येथे संपते आहे, परंतु काश्मीर प्रश्नाचे या दौर्‍यात जाणवलेले सर्व पैलू मांडणारा लेख लवकरच लिहायचा आहे. खोर्‍यातील आघाडीच्या राजकारण्यांपासून उद्योजकांपर्यंत, पर्यटन व्यावसायिकांपासून पोलीस व लष्करी अधिकार्‍यांपर्यंत, माध्यम सम्राटांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या स्तरांतील काश्मिरींचे म्हणणे ऐकून घेतल्यावर एका गोष्टीवर या सर्वांचे एकमत दिसले. सर्वांना खोर्‍यात शांतता हवी आहे. उगवणारा प्रत्येक दिवस आपल्या मुलाबाळांनी मृत्यूच्या छायेत घालवावा असे कोणालाही वाटत नाही. सुफी, उदारमतवादी इस्लामी परंपरेत वाढलेला काश्मिरी आजही आतिथ्यशील आहे. मूठभर देशद्रोह्यांनी त्याला वेठीस धरलेले आहे. तो पुरता कात्रीत सापडलेला आहे. वृत्तवाहिन्यांच्या विपर्यस्त वार्तांकनाने त्याची अहोरात्र मानहानी चालवली आहे. त्यातून त्याची अस्वस्थता वाढीस लागलेली आहे. याचा फायदा भारतविरोधी शक्तींना मिळायच्या आधी त्याच्याशी थेट संवादाची ठोस पावले उचलली जाण्याची नितांत जरूरी दिसते आहे. काश्मीर आपलेच आहे.. अजूनही!