‘कश्मिरियोंका दिल जितोगे, तो सब जितोगे!’’

0
132

चिनार डायरीज्
परेश वासुदेव प्रभू

काश्मीरमधील परिस्थितीचे अतिरंजित चित्र वृत्तवाहिन्यानी रंगवल्याने खोर्‍यातील पर्यटनाला प्रचंड फटका बसला आहे. सध्या पर्यटन हंगाम असूनही हॉटेलांमधील पर्यटकांचे वास्तव्य केवळ वीस टक्क्यांच्या आसपास आहे. ‘केसरी’ सारखी पर्यटन संस्था जेथे दिवसाला बारा पर्यटक बसगाड्या आणायची, तेथे केवळ जेमतेम दोन बसगाड्या दिसतात. या सार्‍या परिस्थितीचा जोरदार फटका केवळ पर्यटनावर अवलंबून असलेल्या काश्मिरींना बसला आहे.
काश्मीर, जम्मू आणि दिल्ली मधील ‘ग्रँड मुमताज’ सारख्या नावाजलेल्या हॉटेलांचा समूह असलेल्या ‘मुश्ताक ग्रूप ऑफ हॉटेल्स’चे संस्थापक अध्यक्ष मुश्ताक अहमद छाया यांची श्रीनगरमधील त्यांच्या ‘ग्रँड मुमताज’ या तारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली, तेव्हा खोर्‍यातील पर्यटनाच्या झालेल्या अवनतीचे दारूण चित्र त्यांनी समोर ठेवले.
हा सारा वृत्तवाहिन्यांच्या विपर्यस्त चित्रणाचा परिणाम असल्याचे मुश्ताक छाया यांनी सांगितले. काश्मीर पर्यटकांसाठी असुरक्षित नाही हा संदेश देशात गेला पाहिजे. पंतप्रधान नरेेंद्र मोदी ‘मनकी बात’ मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींवर बोलतात, पण त्यांनी काश्मीर सुरक्षित आहे असे त्यातून सांगितले तर त्यातून देशात निर्माण झालेले चुकीचे चित्र दूर होऊ शकेल अशी अपेक्षा मुश्ताक अहमद छाया यांनी व्यक्त केली.
काश्मीर ही परंपरेने धर्मनिरपेक्ष भूमी राहिली आहे. येथे पूर्वीपासून समन्वयाची परंपरा होती. कटरा येथे येणार्‍या वैष्णोदेवींच्या भक्तांसाठी आमच्या ग्रँड मुमताज समूहाचे ‘रानी मॉं’ हे हॉटेलही आम्ही उभारलेले आहे, असे छाया पुढे म्हणाले. वृत्तवाहिन्यांच्या अपप्रचारानंतर पर्यटनाला बसलेला फटका पाहून आपण स्वतः मुंबईला गेलो. तेथील टूर ऑपरेटरांना परिस्थिती समजावून दिली. त्यानंतर जेथे पर्यटकांचे प्रमाण सहा लाखांवर आले होते, ते पंचवीस लाखांवर गेल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय वृत्तवाहिन्या कसे विपर्यस्त वार्तांकन करीत असतात, त्याचा दाखला छाया यांनी दिला. ‘‘एक दिवस मी सकाळी चहा घेत असताना मला फोनमागून फोन येऊ लागले. सगळे माझी कसे आहात, काय चाललेय अशी चौकशी करू लागले. मलाही कळेना ही हे लोक माझी एकाएकी चौकशी का करीत आहेत. नंतर एक मित्र म्हणाला की जरा टीव्ही लावा. मी टीव्ही लावला तेव्हा त्यात माझ्यावर एनआयएने छापा मारल्याचे वृत्त दाखवले जात होते’’
छाप्यांची बातमी पूर्ण खोटी होती. एनआयएच काय, माझ्यावर आयकर अधिकार्‍यांचाही छापा पडलेला नव्हता. मी वर्षाला तीन कोटी कर भरत असतो असे छाया यांनी सांगितले.
माझ्यावर छापा पडल्याच्या बातमीसोबत ‘जीएसटी कौन्सिल’च्या श्रीनगरमध्ये झालेल्या बैठकीतील चहापानावेळचे माझे काही राजकारण्यांबद्दलचे दृश्यही टीव्हीवर दाखवले जात होते असेही त्यांनी हसत हसत सांगितले.
काश्मीरमध्ये दरवर्षी अमरनाथ यात्रेकरू येत असतात. जनतेकडून त्यांचे नेहमीच स्वागत होत आले आहे. आम्ही देखील त्यांच्यासाठी लंगरची व्यवस्था करीत असतो. ते आमचे पाहुणे आहेत हीच काश्मिरींची त्यांच्याप्रती भावना असते, परंतु अलीकडे वृत्तवाहिन्यांच्या अपप्रचारामुळे शत्रुत्वाची भावना वाढीस लागली असल्याची खंत मुश्ताक छाया यांनी व्यक्त केली. काश्मिरी जनता आणि उर्वरित देशातील जनता यांच्यात या चुकीच्या वार्तांकनाने दरी निर्माण केल्याचे मुश्ताक छाया म्हणाले. दूरचित्रवाणीच्या वार्तांकनाविषयीची ही तक्रार काश्मीरमध्ये प्रत्येक जण व्यक्त करतो. अगदी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींपासून सामान्य घोडेवाल्यांपर्यंत सारे हेच सांगतात.
जम्मू काश्मीर पर्यटन विभागाचे सचिव फारुख अहमद शाह (आयएएस) यांनीही खोर्‍यातील परिस्थिती जेवढी वृत्तवाहिन्या सांगतात तेवढी वाईट नसल्याचे सांगितले. आपण प्रत्यक्षच परिस्थिती पाहा आणि मत बनवा असे ते म्हणाले. काश्मीर खोर्‍यात ६५ हजार खाटांची क्षमता आहे. पस्तीस हजार खोल्या आहेत, परंतु या अपप्रचारामुळे त्या ओस पडल्याने आम्ही पन्नास टक्के सवलत जाहीर केलेली आहे असेही त्यानी सांगितले.
जम्मू काश्मीर पर्यटन विभागाचे संचालक मेहमूद अहमद शाह यांनी काश्मीरच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाच्या स्थानाविषयी माहिती दिली. येथील सत्तर टक्के जनता या ना त्या प्रकारे पर्यटनावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. चार ते पाच लाख लोक तर प्रत्यक्ष पर्यटनावर अवलंबून आहेत असे ते म्हणाले.
काश्मीरमधील धार्मिक सलोख्याच्या परंपरेची माहिती त्यांनीही दिली. अमरनाथच्या गुंफेचा शोध अनंतनागच्या मलीक या मुसलमान कुटुंबाने लावला होता. गुलमर्गच्या मंदिराची देखरेख एका मुस्लीम व्यक्तीकडे आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्याला जागोजागी सापडतील असे शाह यांनी सांगितले. परंतु या गोष्टी माध्यमांमध्ये कधी येत नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
काश्मीरमधील पर्यटनविषयक विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आमच्यासाठी एक इफ्तार मेजवानीही दिली गेली. ‘‘क्या हम आपके लोग नही है?’’ असा सवाल अनेकांनी त्यात केला. काश्मीरची अर्थव्यवस्था ढेपाळावी यासाठी कोणी तरी षड्‌यंत्र आखलेले आहे असे या सार्‍यांचे म्हणणे होते. काश्मीरला ‘वॉर झोन’च्या म्हणजे युद्धक्षेत्राच्या रूपात सादर केले जात आहे अशी खंतही त्यांनी मांडली.
श्रीनगरच नव्हे, तर पहलगामसारख्या ठिकाणीही पर्यटकांची संख्या रोडावली आहे. नंदनवन काश्मीरच्या शिरपेचातील तुरा शोभावा असे पहलगाम हे लीडर नदीच्या काठावरचे सुंदर गाव. अरु खोरे, बेताब खोरे, दबियान, भैसरान हे सारे भाग विलक्षण सुंदर आहेत. आम्ही गेलो तेव्हा तर नुकताच पाऊस झाल्याने सारे वातावरण स्वर्गवत होते.
श्री अमरनाथ यात्रेच्या मार्गावर येणार्‍या या गावात यात्रेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. यात्रेकरूंसाठी लंगरचे सामान घेऊन जाणार्‍या ट्रकांची रांग लागली आहे.
यात्रेकरूंच्या स्वागताला पहलगाम उत्सुक आहे, पण बाकी पर्यटक नसल्याने हॉटेले ओस पडली आहेत. पहलगाम हॉटेल अँड गेस्टहाऊस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल रहमान गनाई, पहलगाम पर्यटक टॅक्सी संघटनेचे प्रमुख नझीर अहमद शेख, पहलगाम ट्रॅव्हल टूर असोसिएशनचे अध्यक्ष मुश्ताक पहलगामी आदींनी हीच वस्तुस्थिती मांडली.
पहलगामची जनता शांतताप्रेमी आहे. आतिथ्याची, ‘मेहमान नवाजी’ ची येथे परंपरा आहे. ९६ साली लीडर नदीला जेव्हा महापूर आला तेव्हा अडकलेल्या चाळीस ते पन्नास हजार पर्यटकांची सोय आम्ही आमच्या घरातच नव्हे तर आमच्या मशिदींतही मोफत केली होती, अशी आठवण अब्दुल गनाई यांनी सांगितली.
अमरनाथ यात्रा ही आम्ही आमची यात्रा मानतो. यात्रेकरूंना आम्ही खांद्यावर वाहून नेतो. यात्रेकरूंसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवतो. यात्रेकरूंची ही पिढ्यानपिढ्या सेवा करीत आलो आहोत, त्यामुळे ‘‘शिवजी भी हमारी इज्जत करते होंगे’’ अशी भावना मुश्ताक पहलगामीने व्यक्त केली. पहलगाममध्ये जन्माला येणार्‍या मुसलमान मुलांनाही अमरनाथचा धागा बांधला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पहलगामच्या तरूणांना पर्यटनाविना कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. येथे पदव्युत्तर पदवी मिळवलेले तरूणही घोडे फिरवण्याचा व्यवसाय करतात असे पहलगाम पोनी असोसिएशनचे प्रमुख महंमद जब्बार यांनी सांगितले.
आमच्या भागात मनोरंजनाची अन्य साधने नसल्याने लोक रात्री टीव्ही पाहतात. वृत्तवाहिन्या काश्मीरमधील दगडफेक चालल्याच्या भडक बातम्या दाखवून भीती निर्माण करतात, त्यामुळे काश्मिरी तरुणांना बाहेर ‘स्टोन पेल्टर्स’ म्हणून हिणवले जाते अशी खंत पहलगामीने व्यक्त केली. ‘‘कश्मिरियोंका दिल जितोगे, तो सब जितोगे’’ असे तो उद्गारला.
खरोखरच आज काश्मिरी जनता आणि उर्वरित देशाची जनता यांच्यातील दरी रुंदावत चालली आहे. त्याचा फायदा फुटीर आणि देशद्रोही शक्ती घेऊ लागल्या आहेत. अशावेळी ही दरी सांधणार्‍या पावलांची नितांत आवश्यकता आहे.