कुडचड्यात दुकानाला लागलेल्या आगीमुळे १५ लाखांचे नुकसान

0
66

कुडचडे बाजारातील सागर कांगुरी व सूरज कांगुरी यांच्या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री आग लागल्याने आतील सर्व माल भस्मसात झाला. कांगुरी यांनी यामुळे आपल्याला सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. या दुकानात बॅगा, छत्र्या, रेनकोट अशा प्रकारचा माल होता. या प्रकरणी अग्निशामक दलाकडून हलगर्जीपणा झाल्याचाही दावा केला. मात्र अग्निशामक दलाने हा दावा ङ्गेटाळून लावला आहे.
याबाबत वृत्त असे की, मंगळवारी रात्री १२ वा. च्या सुमारास काही युवकांना सदर दुकानाला आग लागल्याचे दिसून आल्याने त्यांनी
अग्निशामक दलाशी संपर्क साधला. मात्र त्यांना प्रतिसाद न मिळाल्याचे युवकांचे म्हणणे आहे. कार्यालयाच्या खिडक्यांवर दगड मारून कर्मचार्‍यांना उठविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र अग्निशामक दलाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या कार्यालयात आगाविषयी माहिती देणारा ङ्गोन कॉल रात्री ११.५५ वा. आला. लगेच दलाचे जवान घटनास्थळी गेले व आग नियंत्रणात आणली.
दरम्यान, या दुकानाला लागून असलेल्या दुसर्‍या दुकानाच्या छतावर पत्रे बसवण्याचे काम चालू होते व यासाठी वेल्डिंगचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. त्यावेळी कांगुरी यांच्या दुकानाच्या पत्र्यावरही वेल्डिंग करावे लागले. त्यानंतर उडालेल्या ठिणगीमुळे शॉर्टसर्कीटमुळे आग भडकली. त्यानंतर जवळील
हॉटेलमधून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न उपस्थितांनी केला व त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या वेल्डिंगच्या कामाची माहिती दुकान मालकाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे दुकान मालक सागर कांगुरी यांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार काब्राल यांनी घटनास्थळी धाव घेतली व संबंधितांना धारेवर धरले. कुडचडे पोलीस स्थानकात आग दुर्घटनेची तक्रार नोंद करण्यात आली आहे. कुडचडे पोलीस स्थानकाचे प्रशल देसाई, अनिल चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे उपसंचालक नितीन रायकर यांनी काल (बुधवार) दुपारी येथील कार्यालयाला भेट दिली व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनीही कार्यालयावर दगड मारून जवानांना उठवल्याच्या गोष्टीला ‘अङ्गवा’ असल्याचे सांगून दलाने वेळेवर सेवा बजावून आपले कर्तव्य पार पाडले असल्याचे म्हटले आहे.