काश्मीर राखतोय एक मराठी ‘सिंघम’

0
87

चिनार डायरीज
परेश प्रभू

धुमसत्या काश्मीरचा केंद्रबिंदू आहे दक्षिण काश्मीर. राज्याच्या एकूण २२ जिल्ह्यांपैकी काश्मीर खोर्‍यात जे दहा जिल्हे आहेत, त्यातील दक्षिण काश्मीरमधील तीन जिल्ह्यांत दहशतवादाचे थैमान सुरू आहे. हे जिल्हे आहेत, अनंतनाग, पुलवामा आणि शोपियॉं.
दहशतवाद्यांच्या या बालेकिल्ल्यात एक मराठी ‘सिंघम’ त्याविरुद्ध लढतो आहे. या तरुण तडङ्गदार अधिकार्‍याचे नाव आहे श्रीधर पाटील. हा शाहुवाडी-कोल्हापूरचा गडी सर्वांत दहशतवादग्रस्त कुलगामचा पोलीस अधीक्षक आहे. या जिगरबाज अधिकार्‍याच्या भेटीचा योग आला आणि त्याने काश्मीरच्या दहशतवादाचा पटच माझ्यासमोर उलगडला. २०१० च्या आयपीएस बॅचचा हा मर्द गडी काश्मीर केडरमधून आयपीएस झाला. २०११ साली त्याने पदभार स्वीकारला. तीन वर्षे दहशतवादग्रस्त अनंतनाग जिल्ह्याची जबाबदारी त्याने सांभाळली. गेले वर्षभर काश्मीर ज्याच्या मृत्यूचे निमित्त होऊन धगधगते आहे. त्या बुरहान वानीचे गाव त्राल हे अवंतीपुर्‍याजवळ आहे. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर अवघे काश्मीर पेटले, पण या श्रीधर पाटील यांच्या रणनीतीमुळे खुद्द त्याच्या जिल्ह्यात एकाही नागरिकाचा बळी गेला नाही. या कार्यतत्परतेची पावती त्यांना मिळाली ती कुलगामच्या एस. पी. पदी बदली होऊन. गेले एक वर्ष श्रीधर पाटील कुलगामच्या दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्यात गुंतले आहेत. या तीनच जिल्ह्यांत दहशतवादाला एवढे जनसमर्थन का असा सवाल मी त्यांना केला तेव्हा त्यांनी तेथील दहशतवादाची कुंडलीच मांडली.
हे तिन्ही जिल्हे जम्मू-श्रीनगर
महामार्गापासून दूर आहेत. दुर्गम आहेत. या लोकांचा बाहेरच्या जगाशी ङ्गारसा संवाद नाही. मागासलेले ग्रामीण जीवन ते जगताहेत. या भागात सङ्गरचंदाच्या मोठमोठ्या बागा आहेत. एकेक बाग पंधरा-वीस किलोमीटर पसरलेली आहे. सङ्गरचंदाची ही झुडुपे घनदाट असतात. खाली तीन ङ्गूट मोकळी जागा असते, पण वरून काहीही दिसत नाही. अशा बागांमध्येच हे स्थानिक दहशतवादी आश्रय घेतात. सोशल मिडियावरून शस्त्रास्त्रांसह आपले व्हिडिओ जारी केले गेले ते याच दक्षिण काश्मीरमधून.
या जिल्ह्यात सङ्गरचंदापासून वर्षाला एक कोटींपर्यंत एकेकाची मिळकत असते. त्यामुळे जवळ पैसा भरपूर पण शिक्षणाला, शहरीकरणाला हे लोक वंचित आहेत.
अनंतनागमध्ये एक विद्यापीठ आहे. अवंतीपुर्‍यात इस्लामी विद्यापीठ आहे, पण कुलगाम, पुलवामा, शोपियॉंमध्ये विद्यापीठ सोडाच, जिल्ह्यात एकच महाविद्यालय आहे. त्यामुळे या शैक्षणिक मागासलेपणाचा ङ्गायदा उठवीत कट्टरतावाद्यांनी या भागात जम बसवला. विद्यार्थ्यांनाही त्यात ओढळले गेले. विकासाचा अभाव आणि हा कट्टरतावाद यातून दहशतवाद रुजला आहे.
या दहशतवाद्यांना स्थानिक जनतेचे समर्थन का मिळतेय या माझ्या प्रश्‍नावर ‘भीतीपोटी वा सहानुभूतीपोटी’ असे श्रीधर पाटील उत्तरले. स्थानिक तरुणांना असे शस्त्रे हाती घेऊन दहशतवादी बनणे हे प्रतिष्ठेचे वाटते हे श्रीधर पाटील यांचे निरीक्षण आहे. ‘हिरोगिरी’ पोटी स्थानिक तरुण दहशतवाद्यांना सामील होत आहेत. दगडङ्गेक करण्यानेसुद्धा ही मागास मुले त्यांच्या समाजात ‘हिरो’ ठरतात. त्यांची टोपणनावे देखील मग समीर ‘टायगर’ वगैरे असतात, असे पाटील यांनी सांगितले. आपली युवा ऊर्जा दाखवण्यासाठी समोर साधनेच नाहीत, आदर्शही नाहीत, त्यामुळे बुरहान वानीच त्यांचा आदर्श बनतो असे पाटील म्हणाले. गुन्हेगारी आणि दहशतवाद हातात हात घालून राहिले आहेत असेही पाटील यांनी सांगितले. त्यांचा स्वतःचा तो अनुभव आहे. आपण विविध गुन्ह्यांसाठी पकडलेले तरुणच दहशतवादाच्या मार्गाने चालल्याचे त्यांना अनुभवायला आले. गेल्या वर्षभरात शोपियॉंमधून २०, पुलवामातून १० आणि कुलगाममधून ६ जण दहशतवादी बनले, त्यातील बहुतेकांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची होती असे पाटील यांना आढळले. अलीकडेच
मारला गेलेला सबझार भट हा दहशतवादी मुळात ड्रग पेडलर होता, आपणच त्याला तीन वेळा पकडले होते असे पाटील म्हणाले. दहशतवादी बनताच या गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळते, ते हिरो ठरतात असे पाटील यांना वाटते.
काश्मिरी तरुणांमध्ये पोलीस भरतीचे आकर्षण आहे याला त्यांनी दुजोरा दिला. कुलगाम जिल्ह्याची लोकसंख्या ७ लाख आहे. जिल्ह्यात २० ज्ञात दहशतवादी आहेत, पण स्थानिकांतून दोन हजार तरुण पोलिसांत भरती झालेले आहेत अशी आकडेवारी त्यांनी सांगितली.
राज्यात पोलिसांना दहशतवादी लक्ष्य का करीत आहेत, पोलिसांच्या घरांवर हल्ले का होत आहेत, या प्रश्‍नावर ते म्हणाले, लष्कर जेव्हा दहशतवाद्यांविरुद्ध एखादी कारवाई करते तेव्हा त्यांच्यासंबंधीची ९९ टक्के माहिती पोलिसांनी लष्कराला दिलेली असते, कारवाईचे पूर्वनियोजन व तयारी स्थानिक पोलीसच करतात. कारवाईनंतर लष्कराला वाट मोकळी करण्याचे, कारवाईचे अवशेष नष्ट करण्याचे कामही पोलिसांचे असते. लष्कर प्रत्यक्ष कारवाई जरी करीत असले तरी तेथे पहिले येणारे व शेवटी जाणारे पोलीसच असतात, त्यामुळे दहशतवादी त्यांना लक्ष्य करीत असल्याचे श्रीधर पाटील
म्हणाले.
काश्मीरी लोक हे खरे तर इतरांना सामावून घेणारे लोक आहेत. इथला इस्लाम हा सूङ्गी परंपरेतून आला असल्याने सर्वांत उदारमतवादी इस्लाम असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्यत्र मुसलमान महिला बुरखा घालतात, पण काश्मिरी महिला बुरखा घालत नाहीत. येथे बुरख्यात जेमतेम एक टक्का महिला दिसतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. काश्मीरच्या सर्वांत जास्त दहशतवादग्रस्त जिल्ह्याच्या पोलीस दलाचे नेतृत्व करणार्‍या या ‘सिंघम’ने ‘काळजी करू नका, आम्ही तुमचे काश्मीर सुरक्षित ठेवू’ अशी ग्वाहीही यावेळी दिली.