सरकारकडून विविध प्रश्‍नांवरून जनतेची फसवणूकच ः ‘आप’

0
99

प्रादेशिक आराखडा, कॅसिनो, नद्यांचे राष्ट्रीयीकरण आदी विविध प्रश्‍नी पर्रीकर सरकारने गोव्यातील जनतेची फसवणूकच केल्याचा आरोप काल आम आदमी पार्टीने केला. प्रादेशिक आराखडा २०२१ अधिसूचित न करता सरकार आता नवा प्रादेशिक आराखडा (२०३०) तयार करू पाहत आहे, असे एल्विस गोम्स व वाल्मिकी नाईक काल पत्रकार परिषदेत म्हणाले.
राज्यात प्रादेशिक आराखडा व्हावा यासाठी २००६ पासून लोक मागणी करीत आहेत. मात्र, नवा आराखडा तयार करण्याचे निमित्त करून सरकार प्रादेशिक आराखडा अधिसूचित करण्याचे टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कॅसिनो प्रकरणीही सरकारने लोकांची ङ्गसवणूक केलेली असून मांडवी नदीतील कॅसिनो तेथून हटवायचे सोडून आता तेथे आणखी कॅसिनो आणण्याची तयारी सुरू असल्याचे गोम्स व नाईक म्हणाले. नद्या राष्ट्रीयीकरणाचा जो वाद आहे त्या प्रकरणीही सरकार लोकांची केवळ दिशाभूल करीत असल्याचे आम आदमी पार्टीने स्पष्ट केले. माड हे गवत नसून ते झाड आहे हे जाहीर करण्यास तीन महिने का लागले असा सवाल त्यांनी केला.
किमान समान कार्यक्रम कधीपर्यंत मार्गी लागेल हे सरकारने स्पष्ट केलेले नसून त्यावरून सरकार त्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला.